प्रेमळ स्वभावामुळे सर्वांशी जवळीक साधणार्या आणि तळमळीने प्रसाराची सेवा करण्यार्या ६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या पुणे येथील सौ. मंदाकिनी वसंत कदम (वय ७६ वर्षे) !
‘चैत्र कृष्ण अष्टमी (१३.४.२०२३) या दिवशी पुणे येथील सौ. मंदाकिनी कदम यांचा ७६ वा वाढदिवस आहे. मी आणि सौ. मंदाकिनी वसंत कदम आम्ही दोघी ५ वर्षे सनातन संस्थेच्या मार्गदर्शनाखाली धर्मप्रसाराची सेवा करत होतो. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
सौ. मंदाकिनी वसंत कदम यांना ७६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून नमस्कार !
१. सौ. मंदाकिनी कदम यांच्यातील गुणांमुळे पहिल्याच भेटीत त्यांच्याशी जवळीक होणे :
‘सौ. मंदाकिनी कदम यांच्यामध्ये अनेक गुण आहेत. त्यांचे मन पुष्कळ निर्मळ आहे. त्यांचे व्यक्तीमत्त्व निगर्वी आणि नम्र आहे. त्यांच्यातील संयम, सहनशीलता आणि स्वयंशिस्त हे गुणही वाखाणण्यासारखे आहेत. आम्ही संभाजीनगरला ज्या भागात रहात होतो, त्या ठिकाणी जवळजवळ सर्वच लोक त्यांना ओळखत होते. त्यांचा स्वभाव बोलका आहे. त्यामुळे त्यांची अनेक जणांशी पुष्कळ जवळीक आहे. त्या सर्वांना साहाय्य करतात. त्यामुळे माझी पहिल्याच भेटीत त्यांच्याशी पुष्कळ जवळीक झाली.
२. व्यवस्थितपणा : त्या घरी असतांनासुद्धा व्यवस्थित रहातात. त्यांचे घर टापटीप असते.
३. कष्टाळू स्वभाव : त्या घरातील सर्व कामे स्वतःच करतात. त्यांचा स्वभाव कष्टाळू आहे.
४. इतरांना साहाय्य करणे
अ. शेजारी कुणी रुग्णाईत असेल, तर त्या त्यांना जेवणाचे डबे आणि खाऊ स्वतः नेऊन देत असत. त्या काळात अनेकांकडे दूरध्वनी नव्हते. त्या शेजारी रहाणार्यांना स्वतःचा दूरध्वनी क्रमांक द्यायच्या आणि काही निरोप असल्यास त्या स्वतः त्यांच्या घरी जाऊन देत असत.
आ. त्यांच्याकडे काम करणार्या बाई वयस्कर झाल्या होत्या. त्यांना कामही करता येत नसे, तरी ताई त्यांना घरी बोलावून पैसे आणि खाऊ देत असत.
५. सनातन संस्थेशी संपर्क
५ अ. संपर्काला गेल्यावर सौ. मंदाकिनी कदम यांनी सामाजिक कार्याच्या बैठकीला बोलवणे आणि बैठक झाल्यानंतर बोलण्याची संधी दिल्यामुळे त्यांच्या सदस्यांना सनातन संस्थेच्या कार्याचा परिचय करून देणे : वर्ष १९९४ मध्ये संभाजीनगर येथे सनातनचे कार्य चालू झाले. त्या वेळी मला सौ. मंदाकिनी कदम यांची आठवण आली; कारण तेव्हा त्या समाजकार्य करायच्या, तसेच दुपारच्या वेळेत पाककला आणि भरतकाम यांचे वर्गही घेत होत्या. त्यांच्या समाजात पुष्कळ ओळखी होत्या. त्यामुळे ‘त्या आपल्याला प्रवचन घेण्यासाठी एखादे ठिकाण निश्चितच सांगतील’, असा विचार माझ्या मनात देवाने घातला. मी त्यांच्याकडे संपर्काला गेले. एकदा त्यांनी मला त्यांच्या सामाजिक कार्याच्या बैठकीला बोलावले. बैठक झाल्यानंतर त्यांनी मला बोलण्याची संधी दिली. तेव्हा मी त्यांच्या सदस्यांना सनातन संस्थेच्या कार्याचा परिचय करून दिला.
५ आ. सौ. कदमताईंच्या ओळखीतील एका ताईंनी भजनी मंडळाचा संपर्क देणे आणि देवाच्या कृपेने त्या ठिकाणी सनातन संस्थेचे पहिले प्रवचन होणे : सौ. कदमताईंच्या ओळखीतील एका ताईंनी आम्हाला एकादशीला होणार्या भजनी मंडळाचा संपर्क दिला. देवाच्या कृपेने त्या ठिकाणी सनातन संस्थेचे पहिले प्रवचन झाले. प्रवचन झाल्यानंतर मी सौ. कदमताईंना भेटायला गेले. तेव्हा त्यांनी मला त्यांना आलेली कुलदेवतेच्या नामजपाची अनुभूती सांगितली. अशा प्रकारे देवानेच त्यांना सनातन संस्थेत आणले.
५ इ. सत्संगासाठी संपर्क केल्यावर सत्संगाला येऊ लागणे त्यानंतर त्यांना सत्संगाची ओढ वाटू लागणे आणि नियमितपणे सत्संगाला जाऊ लागल्यावर पुष्कळ वर्षांपासून असलेला पित्ताचा त्रास १५ दिवसांत न्यून होणे : वर्ष १९९५ मध्ये प.पू. भक्तराज महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी अर्पण आणण्यासाठी मी सौ. कदमताई यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी लगेचच अर्पण दिले. त्या वेळी त्यांनी ‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण’ हा ग्रंथही विकत घेतला. प.पू. भक्तराज महाराज यांच्या पंचाहत्तरीच्या कार्यक्रमानंतर आमच्या घरी सत्संग चालू झाला. त्यासाठी मी त्यांना संपर्क केल्यावर त्याही सत्संगाला येऊ लागल्या. त्यांना सत्संगाची ओढ वाटू लागली. सत्संगाला येऊ लागल्यावर त्यांचा पुष्कळ वर्षांपासून असलेला पित्ताचा त्रास १५ दिवसांत न्यून झाला होता. त्यानंतर त्या नियमितपणे सत्संगाला येऊ लागल्या.
६. सेवाभाव :
त्या जिज्ञासू असल्याने प्रवचन आणि सत्संग घेण्यासाठी, तसेच प्रचार करण्यासाठी लगेच सिद्ध झाल्या. त्यांना वयोमानानुसार शारीरिक त्रास होत असे, तरीही त्या तळमळीने चालत जाऊन प्रचार करायच्या. त्या साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे, साप्ताहिक आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ यांचे वर्गणीदार बनवणे, विज्ञापने अन् अर्पण आणणे, सत्संग घेणे, अशा सर्व सेवा करू लागल्या. त्या त्यांच्या दुखण्याविषयी कधीच बोलत नसत. त्या त्रास सहन करून परिपूर्ण आणि भावपूर्ण सेवा करत असत. त्यांच्या पुष्कळ ओळखी असल्यामुळे त्यांना धर्मप्रचार करतांना पुष्कळ लाभ झाला.
७. ‘भीती वाटणे’ या स्वभावदोषावर मात करणे :
आधी त्यांना संध्याकाळी प्रचार करायला जाण्यास भीती वाटायची. नंतर त्या एकदम निर्भय झाल्या. त्या प्रचार करून रात्री एकट्यासुद्धा घरी येऊ लागल्या.
८. अहं अल्प असणे :
त्या प्रत्येक कृती भावपूर्ण आणि प्रार्थना करून करतात. त्यांना कर्तेपणा किंवा अहं यांचा लवलेशही नाही. त्यांचे कुटुंब उच्च विद्याविभूषित आहे. याचा त्यांना जराही अहं नाही.
९. जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सुटणे :
सौ. कदमताई संभाजीनगर सोडून पुण्याला स्थायिक झाल्यावर त्यांनी तेथेही सनातन संस्थेच्या कार्याचा प्रचार केला. त्यांच्यातील दैवी गुणांमुळे देवाने त्यांना जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून सोडवून अलौकिक भेट दिली.
१०. प्रार्थना आणि कृतज्ञता :
वर्ष २०२२ मध्ये त्यांची आध्यात्मिक पातळी ६८ टक्के झाली. लवकरच ‘देव त्यांना संत पदावर विराजमान करो’, अशी देवाच्या चरणी प्रार्थना करते. देवाने मला असे अनेक दैवी गुण असलेली सहसाधिका दिली आणि तिचे गुणवर्णन करून घेतले, त्याबद्दल देवाच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करते.’
– श्रीमती जयश्री मुळे (वय ७६ वर्षे), ढवळी, फोंडा, गोवा. (१०.९.२०२२)