राज्यातील गावागावांत मिळणार वड-पिंपळ वृक्षांची छाया !
महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम !
मुंबई, ११ एप्रिल (वार्ता.) – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राज्यात पंचायतन वन उद्यानांची निर्मिर्ती करण्याचा निर्णय राज्यशासनाने अर्थसंकल्पात घोषित केला होता. ही उद्याने प्रत्येक जिल्ह्यातील २५ गावांमध्ये निर्माण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये निवड करण्यात आलेल्या गावांमध्ये वड, उंबर, पिंपळ, बेल, कडुलिंब आणि देशी आंबा या वृक्षांच्या पंचायतन वन उद्यानाची निर्मिती केली जाणार आहे.
मोठ्या प्रमाणात प्राणवायूची निर्मिती करून प्रदूषण न्यून करणे, दाट सावली देणे, औषधी गुणधर्म या वैशिष्ट्यांमुळे पंचायतन वन उद्यानासाठी या वृक्षांची निवड करण्यात आली आहे. या उद्यानांची निर्मिती करण्यासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’प्राप्त गावे, ‘संत तुकाराम वन ग्राम पुरस्कार’प्राप्त गावे, ‘निर्मल ग्राम पुरस्कार’ प्राप्त गावे, ‘संत गाडगेबाबा ग्राम पुरस्कार’प्राप्त गावे, स्वयंस्फूर्तीने अर्ज करणारी गावे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ क्षेत्र असलेली गावे आणि लागवडीस सिद्ध असलेल्या वृक्ष प्रेमी संस्था यांचा प्राधान्याने विचार केला जाणार आहे. यासाठी ग्रामपंचायतीकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. ७ वर्षांपर्यंत या उद्यानाचे जतन आणि संवर्धन वन विभागाकडून करण्यात येणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्था, सेवाभावी संस्था, महामंडळ आदींना हमीपत्र घेऊन उद्यानांचे हस्तांतर करण्यात येणार आहे.