भारतात धर्मसत्ता आणि राजसत्ता एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक ! – जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार, विदर्भ रुक्मिणी पीठ, कौंडण्यपूर
विदर्भातील १६ संघटनांतील १०० हिंदुत्वनिष्ठांचा सहभाग
अमरावती, ११ एप्रिल (वार्ता.) – कलियुगात हिंदूंसमोर असणार्या अनेक समस्यांसमोर ‘संघटन शक्ती’ हा एकमेव उपाय आहे. देशात ४ लाख मंदिरे आहेत. त्यांच्या माध्यमातून किमान ४ लाख युवकांना रोजगार मिळून रुग्णालये, शाळा, गुरुकुल उभारू शकतो. त्यासाठी मंदिरांचे व्यवस्थापन योग्य पद्धतीने व्हावे, यादृष्टीने पावले उचलायला हवीत. धर्मसत्ता आणि राजसत्ता यांनी एकत्र येऊन आदर्श राष्ट्र निर्माण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन कौंडण्यपूर येथील विदर्भ रुक्मिणी पिठाचे जगद्गुरु रामराजेश्वर माऊली सरकार यांनी केले. येथे हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनात बोलत होते.
इस्लामी कट्टरवादाच्या विरोधात हिंदूंनी संघटित व्हावे ! – गोपालजी गुप्ता, हिंदु जागरण मंचचे विदर्भ प्रांतपालक
भारत हे हिंदु राष्ट्र आहे, हे शाश्वत सत्य आहे; मात्र हिंदूंनी जागृत होऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे. भारतात अनेक वाद कार्यरत आहेत, जसे साम्यवाद, जातीयवाद, भाषावाद, माओवाद; पण त्यात अधिक धोकादायक इस्लामी कट्टरवाद. यासाठी हिंदूंनी जागृत आणि संघटित होऊन प्रतिकार करणे आवश्यक आहे.
साधनेच्या बळावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होईल ! – पू. अशोक पात्रीकर, सनातन संस्था
हिंदु राष्ट्राची स्थापना संख्याबळावर होऊ शकणार नाही, त्यासाठी साधनेच्या बळाचीच आवश्यकता आहे. आपण भक्त झालो, तरच देव आपल्या रक्षणासाठी निश्चित धावून येईल. साधनेच्या बळावरच हिंदु राष्ट्राची स्थापना होणार आहे.
पाश्चिमात्य संस्कृतीमुळे प्रभावित झालेल्या हिंदूंना जागृत करणे आवश्यक ! – पू. संतोषकुमार महाराज, शिवधारा आश्रम, अमरावती
भारतीय संस्कृतीला नष्ट करण्यासाठी विविध प्रकारे आघात केले जात आहेत. दूरचित्रवाहिन्यांवरील संस्कृतीहीन मालिका, चित्रपट, विज्ञापने यांद्वारे हिंदूंचा बुद्धीभेद करण्यात येत आहे. हिंदूंची मंदिरे अधिग्रहित करून त्यातील प्रथा-परंपरा नष्ट करण्यात येत आहेत. शाळांमधून हिंदु मुलांचा बुद्धीभेद करण्यात येत असून त्यांना धर्मापासून दूर केले जात आहे. या सर्व समस्यांचे समाधान केवळ हिंदु राष्ट्रच आहे. त्यामुळे पाश्चिमात्य संस्कृतीमुळे प्रभावित झालेल्या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.
सर्व संप्रदायांना एकत्रित करणे ही हिंदु राष्ट्राची पहिली पायरी ! – मानव बुद्धदेव, योग वेदांत सेवा समिति
संघटितपणे विरोध केल्यास धर्मावर होणारे आघात परतवून लावू शकतो, याची अनेक उदाहरणे आहेत. हिंदु राष्ट्र धर्माच्या आधारे येणार आहे आणि तेच समस्यांचे
समाधान असणार आहे.
हिंदूंसाठी अभ्यासक्रमात ‘धर्मशिक्षण’ समाविष्ट होणे आवश्यक ! – अधिवक्ता सतीश उपाध्याय, अमरावती
‘इस्लामिक स्टडी’ असा पदवी अभ्यासक्रम मुसलमानांसाठी उपलब्ध आहे. हिंदूंसाठीही असा पदवी अभ्यासक्रम असायला हवा.
साधना वाढल्यास धर्माचे रक्षण होणार आहे ! – प्रकाश सिरवानी, सिंधू युवा सभा
सनातन धर्म विभागला जात आहे. एकत्रितपणे प्रयत्न केल्यास धर्मांतराला आळा बसू शकतो. हिंदूंना साधनेसमवेत शारीरिक आरोग्याकडेही लक्ष द्यावे लागेल.
भारताला विश्वगुरु करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे संघटन आवश्यक ! – डॉ. सुरेश चिकटे, विदर्भ प्रांत प्रमुख, विश्व हिंदु परिषद
‘भक्तावर संकट आले, तर भगवंत धावून येणारच आहे’, हे वचन श्रीकृष्णाने दिलेले आहे; म्हणूनच हिंदु धर्मावर सध्या आलेले संकट दूर करण्यासाठी निश्चितच भगवंत धावून येणार आहे. केवळ आपण संघटित रहाणे आवश्यक आहे. सर्व हिंदु समाजाला एकत्र आणण्यासाठी आणि जागृत करण्यासाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र राहून धर्मकार्य करावे.