शेट्येनगर (रत्नागिरी) येथील झालेल्या स्फोटप्रकरणात कोणत्याही स्फोटक पदार्थांचे नमुने मिळाले नाहीत
कोल्हापूर ‘फॉरेन्सिक लॅब’चा अहवाल पोलिसांना सादर
रत्नागिरी – शहरातील शेट्येनगर येथील भीषण स्फोटाच्या घटनास्थळावरून कोणतेही स्फोटक पदार्थांचे नमुने मिळालेले नाहीत, असा अहवाल कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅबकडून येथील पोलिसांना सादर करण्यात आला आहे.
१८ जानेवारीच्या पहाटे ४ वाजून ५६ मिनिटांनी शहरातील शेट्येनगर येथील ‘आशियाना’ इमारतीमध्ये जोरदार स्फोट झाला होता. या स्फोटात इमारतीचा स्लॅब आणि भिंतही कोसळली होती, तसेच सदनिकचे मालक अशफाक काझी, त्यांची पत्नी कनिज आणि सासू नुरूनीसा अल्जी असा ३ जणांचा मृत्यू झाला होता. अश्फाक यांचा मुलगा अमार हा या स्फोटात घायाळ झाला होता.
हा भीषण स्फोट नेमका कशामुळे झाला ? याच्या कारणांचा शोध पोलिसांकडून घेण्यात येत होता. प्राथमिक स्तरावर प्रथम घायाळ झालेल्या अशफाक काझी यांच्या जबानीवरून गॅस सिलिंडच्या ‘लिकेज’मुळे हा स्फोट झाला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली होती. कोल्हापूर येथील फॉरेन्सिक लॅबचे पथक आल्यानंतर त्या पथकानेही ‘हा स्फोट गॅसमुळेच झाला असावा’, असा प्राथमिक निष्कर्ष काढला होता; मात्र त्याच वेळी ‘प्रयोगशाळेतील अन्वेषणानंतरच अंतिम अहवाल तयार करण्यात येईल’, असेही स्पष्ट केले होते.