हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्याची हत्या करणार्याची माहिती देणार्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस घोषित !
बेंगळुरू – हिंदुत्वनिष्ठ संघटनेचे कार्यकर्ते रुद्रेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील प्रमुख आरोपी महंमद गौस नयाझी (वय ४१ वर्षे) याची माहिती देणार्याला ५ लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येईल, असे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) घोषित केले आहे.
१. १६ ऑक्टोबर २०१६ या दिवशी सकाळी ९ वाजता शिवाजीनगर येथील श्रीनिवास मेडिकल स्टोअरच्या समोर मित्रांसह थांबलेले रुद्रेश यांना २ दुचाकी गाड्यांवरून आलेल्या जिहाद्यांनी धारदार शस्त्रांनी भोसकून त्यांची हत्या केली होती.
२. एन्.आय.ए.चे अधिकारी या प्रकरणातील प्रमुख आरोपी महंमद गौस नयाझी याचा अनेक वर्षांपासून शोध घेत आहेत; परंतु अजूनही त्याचा सुगावा लागलेला नाही.
३. नयाझी हा बंदी घालण्यात आलेल्या पी.एफ्.आय. या आतंकवादी संघटनेशी जोडला गेला होता, असे समजते. या प्रकरणात सहभागी असलेल्या इतर सर्व आरोपींना कारागृहात डांबण्यात आले आहे. हिंदूंवरील आक्रमणांच्या अनेक घटनांमध्ये नयाझी याचा हात असल्याचा संशय व्यक्त होत आहे.