जळगावच्या एस्.टी. स्थानकाची स्वच्छतामोहीम केवळ कागदावरच आहे का ? – ‘सुराज्य अभियाना’चा एस्.टी. च्या अधिकार्यांना प्रश्न
|
जळगाव – महाराष्ट्र शासनाने सर्व राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात् एस्.टी.च्या सर्व बसस्थानकांवर स्वच्छता मोहीम राबवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला ४ मास झाल्यानंतरही जळगाव एस्.टी. बसस्थानकात प्रचंड अस्वच्छता, प्रसाधनगृहे आणि मुतारी यांची दुरवस्था, परिसरात कचर्याचे साम्राज्य, भित्तीपत्रकांमुळे विद्रूप झालेल्या भिंती, तुटलेली बाकडी, जळमटांनी माखलेले छत, परिसरातील खड्डे आदींची छायाचित्रे हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’कडून थेट एस्.टी.चे जळगाव येथील विभागीय नियंत्रक भगवान जगनोर यांच्यापुढे सादर करण्यात आली. या वेळी हिंदु राष्ट्र सेनेचे उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख श्री. मोहन तिवारी, हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रशांत जुवेकर, श्री. निखिल कदम उपस्थित होते. ‘एस्.टी. महामंडळाने ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ घोषित केली होती. तथापि जळगावच्या बसस्थानकाची दुरवस्था पहाता ही मोहीम केवळ कागदावरच आहे का ?’, असा प्रश्न ‘सुराज्य अभियाना’कडून एस्.टी. च्या अधिकार्यांना विचारण्यात आला. प्रशासनाने आता तरी बसस्थानकाची त्वरित स्वच्छता करावी आणि प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा तरी द्याव्यात, अशीही मागणी सुराज्य अभियानाकडून करण्यात आली.
गेल्या मासापासून दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये राज्यातील विविध एस्.टी. बसस्थानकांच्या दुरवस्थेविषयी वृत्तमालिका प्रसिद्ध केली जात आहे. त्याची नोंद घेत सुराज्य अभियानाने ही अभिनंदनीय कृती केली.
याविषयी राज्याचे परिवहनमंत्री तथा मुख्यमंत्री मा. एकनाथ शिंदे, तसेच एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडेही कागदपत्रे सुपुर्द करण्यात येणार आहेत. ७५ वर्षे पूर्ण होत असल्यानिमित्त एस्.टी. महामंडळाने वर्ष २०२३ हे अमृत महोत्सवी वर्ष घोषित केले असून त्यानिमित्त ‘बसस्थानक स्वच्छता मोहीम’ घोषित केली आहे. याविषयी स्वत: मुख्यमंत्री आणि एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांनी बैठकाही घेतल्या; मात्र मोहीम चालू होऊन ४ मास होऊनही जिल्ह्यातील मुख्य बसस्थानकांसह सर्वच बसस्थानकांची स्थिती विदारक आहे.
निवेदनातील मागण्या !
बसस्थानकाच्या परिसरात अनावश्यक वाढलेली झुडुपे काढून टाकण्यात यावीत, अनावश्यक फाटलेले आणि लोंबणारे फ्लेक्स काढण्यात यावेत, प्रसाधनगृहाची स्वच्छता करण्यात यावी, तुटलेली बाकडी काढून चांगली बाकडी बसवण्यात यावीत, आवारात पडलेल्या कचर्याचे योग्य ते नियोजन करावे, दुचाकी वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात यावी, स्थानकातील रस्ता दुरुस्त करण्यात यावा आदी विविध कृती तातडीने करण्यात याव्यात, अशा मागण्या निवेदनाच्या माध्यमातून करण्यात आल्या आहेत.
‘आज नफा-तोटा यांचा विचार न करता एस्.टी. रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी अखंडपणे धावते. एस्.टी.चा उत्कर्ष करायचा असेल, तर प्रथम बसस्थानकाच्या स्वच्छतेसह प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा तरी चांगल्या प्रकारे दिल्या पाहिजेत, तसेच केवळ मोहिमेपुरती बसस्थानके स्वच्छ न ठेवता कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना आखण्यात यावी’, असेही आवाहन सुराज्य अभियानाकडून शासनाला करण्यात आले आहे.