भारत खरोखरच जगाचा विश्वगुरु ! – युक्रेनच्या उपपरराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा
नवी देहली – जागतिक समस्यांविषयी भारताने घेतलेली भूमिका पहाता भारत खरोखरच जगाचा विश्वगुरु आहे. मूल्ये आणि न्याय यांसाठी लढणार्या युक्रेनमध्ये आम्हाला हेच जाणवले, असे विधान युक्रेनच्या उपपरराष्ट्रमंत्री एमीन झापरोवा यांनी येथे केले. त्या चार दिवसांच्या भारत दौर्यावर आहेत. ‘ज्या भूमीने अनेक ऋषि, संत आणि गुरु यांना जन्म दिला, त्या भारतभूमीला भेट देऊन मला आनंद झाला. आज भारताला विश्वगुरु, वैश्विक शिक्षक आणि मध्यस्थ बनण्याची अवश्यकता आहे. युक्रेनला पाठिंबा देणे, हा खर्या ‘विश्वगुरु’साठी योग्य पर्याय आहे, असेही झापरोवा यांनी म्हटले आहे.
सौजन्य: TIMES NOW Navbharat
झापरोवा यांनी परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव संजय वर्मा यांची भेट घेतली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेंस्की यांच्या शांतता सूत्र आणि धान्य उपक्रम यांमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी भारताला निमंत्रित केले. रशिया-युक्रेन युद्ध चालू झाल्यानंतर कोणत्याही पूर्व युरोपीय देशाच्या प्रतिनिधीने भारताला दिलेली ही पहिली अधिकृत भेट आहे. झापरोवा भारताच्या परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री मीनाक्षी लेखी आणि उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार विक्रम मिस्त्री यांची भेट घेऊन त्यांच्याशी महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करणार आहेत.