‘येणार्‍या आपत्काळात सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी दिलेल्या नामजपादी उपायांच्या माध्यमातून साधकांचे रक्षण होणारच आहे’, याविषयी ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. रामचंद्र (दादा) कुंभार यांना आलेली अनुभूती !

१. एका व्यक्तीच्या खोट्या सांगण्यावरून शेजार्‍याने घरी येऊन कुटुंबियांना दमदाटी करणे

श्री. रामचंद्र कुंभार

‘२०.९.२०२२ या दिवशी आमची गुरे दुपारी नेहमीप्रमाणे घरी न येता थेट एका शेजारच्या जागेत चरायला गेली. हे पाहून वाडीतील एका व्यक्तीने त्या शेजार्‍याला जाऊन सांगितले, ‘‘दादा कुंभारांच्या गुरांनी तुझ्या शेतीची हानी केली आहे.’’ त्याच्यावर विश्वास ठेवून शेजार्‍याने प्रत्यक्षात न पहाता आमच्या घरी येऊन कुटुंबियांना दमदाटी केली.

२. ‘शेतीची हानी झाली आहे’, असे सांगणार्‍या शेजार्‍याने ‘मी असे काही सांगितलेच नाही’, असे खोटे बोलणे

काही वेळाने कुटुंबियांनी शेजार्‍याच्या शेतात जाऊन पाहिल्यावर ‘गुरांनी भातशेतीची काहीच हानी केलेली नव्हती’, असे त्यांच्या लक्षात आले. हे पाहून माझे कुटुंबीय त्या दुसर्‍या व्यक्तीकडे गेले आणि ‘तू शेजार्‍याला ‘दादा कुंभारांच्या गुरांनी तुझ्या शेतीची हानी केली आहे’, असे का सांगितलेस ?’, असे त्याला विचारले. त्या वेळी ती व्यक्ती ‘मी असे काही सांगितलेच नाही’, असे खोटे बोलू लागली.

३. श्री. दादा कुंभार यांच्या मुलांनी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप केल्यावर खोटे बोलणार्‍या व्यक्तीने पोलीस पाटलासमोर चूक मान्य करून क्षमा मागणे

रात्री ९.१५ वाजता वरील प्रसंग कुटुंबियांनी मला भ्रमणभाषवर सांगितला. मी त्याच वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी लघुसंदेश पाठवला आणि झोपलो. सकाळी ५.३५ वाजता सद्गुरु गाडगीळकाकांनी पाठवलेला नामजपादी उपाय मी कुटुंबियांना करायला सांगितला. त्याप्रमाणे माझ्या दोन्ही मुलांनी एक घंटा ‘महाशून्य’, हा नामजप केला. नंतर गावच्या पोलीसपाटलांनी शेतीची वस्तूस्थिती पाहिली. माझे कुटुंबीय पोलीसपाटलाला घेऊन वाडीतील त्या दुसर्‍या व्यक्तीकडे गेले. त्या वेळी पोलीसपाटलाने त्या व्यक्तीला विचारले, ‘शेतीची हानी झालेली नसतांना तू अन्यांना उगाच खोटे सांगून त्रास का देतोस ? कुंभार कुटुंबियांनी हे प्रकरण पोलिसांकडे नेले, तर तुला महागात पडेल. काय करायचे ?’, ते सांग.’ तेव्हा त्या व्यक्तीने ‘माझे चुकले’, असे सांगून क्षमा मागितली.

खोटे बोलून त्रास देणार्‍या व्यक्तीने स्वतःची चूक मान्य केली. त्यामुळे पोलीस ठाण्यात जाण्याचा त्रास टळला आणि ‘आपत्काळात सद्गुरु गाडगीळकाकाच नामजपादी उपायांच्या माध्यमातून साधकांचे रक्षण करणार आहेत’, याची मला निश्चिती झाली’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– श्री. रामचंद्र सखाराम कुंभार (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के, वय ६० वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (२५.९.२०२२)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक