दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध झालेल्या सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या लेखामध्ये दिलेला त्वचेवरील ‘नागीण’ हा विकार दूर होण्यासाठीचा नामजप केल्यावर १० दिवसांत बरे वाटणे
‘माझ्या नाभीपासून मागे पाठीपर्यंत चट्टे उमटले होते. त्या वेळी मी २ दिवस माझ्याकडे असलेले त्वचेवर लावायचे मलम त्या चट्ट्यांवर लावले; पण मला त्याचा काही लाभ झाला नाही. ‘माझ्या पोटाला कुणीतरी सतत चावत आहे’, असे मला वाटत होते आणि तेथे खाजही सुटायची. तेव्हा ‘हे काहीतरी वेगळे आहे’, असे मला वाटले आणि मी एका आधुनिक वैद्यांना ते दाखवले. ते पाहून त्यांनी मला ‘नागीण’ हा विकार झाल्याचे सांगितले. त्यांनी मला औषधे आणि मलम लिहून दिले अन् सांगितले, ‘‘२ दिवसांत बरे न वाटल्यास त्वचारोग तज्ञांकडे जाऊन दाखवून घ्या.’’ मला बरे न वाटल्यामुळे मी त्वचारोग तज्ञांना दाखवले. तेव्हा त्यांनीही ‘नागीण’ असल्याचे सांगून १० दिवसांची औषधे लिहून दिली.
दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळकाकांनी सांगितलेले विकार दूर होण्यासाठी नामजप प्रसिद्ध झाले होते. त्यात त्यांनी ‘नागीण होणे’, या विकारासाठी ‘श्री दुर्गादेव्यै नमः । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय । ॐ नमः शिवाय ।’, हा नामजप प्रतिदिन १ घंटा करावा’, असे सांगितले होते. त्यानुसार मी हा नामजप करू लगलो.
मी औषधोपचारांसह हा नामजपही नियमित करू लागलो. मी प्रतिदिन गुरुदेवांना ‘मला हा त्रास सहन करण्याची शक्ती द्या’, अशी प्रार्थना करायचो. मी नामजप भावपूर्ण करण्याचा प्रयत्न करत होतो. मला नामजप करतांना ग्लानी यायची. तेव्हा मी उभा राहून अथवा फेर्या मारत १ घंटा नामजप पूर्ण करायचो. त्यानंतर केवळ १० दिवसांत मला खाज यायची थांबली आणि पुरळ सुकून त्यांना खपली आली.
‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे हा विकार बरा झाला’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. सतीश बांगर, ठाणे सेवाकेंद्र (१७.१.२०२३)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |