स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जाज्वल्य राष्ट्रप्रेम लवकरच महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोचणार !
मुंबई – महाराष्ट्रातील घराघरात लवकरच स्वातंत्र्यवीर सावरकर यांची महती पोचवण्याचा स्तुत्य निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यासाठी राज्यशासन लवकरच ‘हर घर सावरकर’ अभियान हाती घेणार आहे. या अभियानाद्वारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे जाज्वल्य राष्ट्रप्रेम लवकरच महाराष्ट्रातील घराघरापर्यंत पोचवले जाणार आहे.
या अभियानाचे स्वरूप निश्चित करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी एक महत्त्वपूर्ण बैठक आयोजित केली होती. या बैठकीला राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प. चारुदत्त आफळे, ज्येष्ठ लेखक आणि व्याख्याते डॉ. सच्चिदानंद शेवडे, स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या साहित्याचे अभ्यासक श्री. दुर्गेश परूळकर, व्याख्याते श्री. पार्थ बाविस्कर, अधिवक्ता श्रीराम ठोसर, वैद्य परीक्षित शेवडे आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी हे अभियान राज्यभर राबवण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्र्यांनी सर्वांशी चर्चा केली.
या वेळी ह.भ.प. चारुदत्त आफळे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक घरात स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे कार्य पोचवण्यासाठी प्रवचनकार, कीर्तनकार, व्याख्याते, अभ्यासक सिद्ध करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. लवकरच निश्चित आराखडा सिद्ध करून अभियान राबवण्याचे या वेळी ठरवण्यात आले.