लोणंद (जिल्हा सातारा) येथे आढळून आली १७ गावठी बाँबसदृश स्फोटके !

बाँबशोधक पथकाकडून स्फोटके नष्ट

बाँबशोधक पथकाकडून स्फोटके नष्ट

सातारा, १० एप्रिल (वार्ता.) – येथील लोणंद गावच्या रेल्वेस्थानक परिसरात गावठी बाँबसदृश स्फोटके डुकराने खाल्ल्यामुळे स्फोट झाला. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. या वेळी पोलिसांनी बाँबशोधक पथकाकडून गावठी बाँबचा शोध घेऊन १७ गावठी बाँब नष्ट केले. यामुळे लोणंद परिसरामध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

लोणंद येथील रेल्वेस्थानक परिसरामध्ये डुकरांच्या उपद्रवाला कंटाळून एका अज्ञात व्यक्तीने चेंडूच्या आकाराची गावठी बाँबसदृश स्फोटके सिद्ध करून ठेवली. ही स्फोटके खाल्ल्याने एका डुकराचा मृत्यू झाला. या स्फोटकाचा रेल्वेस्थानक परिसरामध्ये मोठा आवाज झाला. यामुळे स्थानिक नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. बाँबशोधक पथकाने रेल्वेस्थानक परिसरामध्ये कसून अन्वेषण केले असता त्यांना १७ गावठी बाँबसदृश स्फोटके आढळून आली. पोलिसांनी ही स्फोटके नष्ट केली असून रेल्वेस्थानक परिसरामध्ये गावठी बाँब ठेवणार्‍या अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.