हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजमन घडवणारा ‘सनातन प्रभात’ !
‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त मनोगत
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्तीचा ९ एप्रिल या दिवशी २४ वा वर्धापनदिन सोहळा पार पडला. या सोहळ्यात ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर श्री. अरविंद पानसरे यांनी केलेले भाषण येथे देत आहोत.
दैनिक ‘सनातन प्रभात’ २४ व्या वर्षात पदार्पण करत आहे. हे एका ध्येयनिष्ठ पत्रकारितेची मोठी वाटचाल आहे. आजचा हा वर्धापनदिन सोहळा तर आहेच; पण खर्या अर्थाने त्याला ‘कौटुंबिक सोहळा’ म्हणावे लागेल ! कारण ‘सनातन प्रभात’ आणि त्याचे वाचक यांचे नाते ‘वृत्तपत्र अन् वाचक’ इतक्या संकुचित संकल्पनेत कधीच अडकलेले नव्हते, त्याही पलीकडे जाऊन ते कौटुंबिक नाते आहे. ‘सनातन प्रभात’चे वाचक, वितरक, हितचिंतक, विज्ञापनदाते, हिंदुत्वनिष्ठ आदी सनातन परिवाराचा एक अविभाज्य घटकच आहेत ! या सोहळ्याच्या निमित्ताने विचारांची होणारी आदान-प्रदान ही आपल्यासाठी वर्षभराच्या ज्ञानाची शिदोरी आहे.
१. आरंभीपासून हिंदु राष्ट्राशी वैचारिक बांधीलकी !
आज यत्र-तत्र-सर्वत्र हिंदु राष्ट्राची चर्चा होत आहे. केवळ भारतभरातच नाही, तर जागतिक स्तरावरही हिंदु राष्ट्राची नोंद घेतली जात आहे. आजपासून २४ वर्षांपूर्वी ‘हिंदु राष्ट्र’ असा शब्द उच्चारणे, हा अघोषित गुन्हा आणि जणू सामाजिक अपराध होता. अशा काळात ‘ईश्वरी राज्य’, ‘हिंदु राष्ट्र’, हे शब्द जर समाजात खर्या अर्थाने कुणी रूढ केले असतील, तर ते ‘सनातन प्रभात’ने ! याचे एकमेव कारण म्हणजे उच्च आध्यात्मिक पातळी असलेले सनातन प्रभात नियतकालिक समुहाचे संस्थापक-संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले ! काळाची पावले ओळखण्याची दूरदृष्टी ठेऊन आणि प्रचंड विरोध सहन करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून हिंदु राष्ट्राचे विचार समाजापर्यंत अव्याहतपणे पोचवले. ‘सनातन प्रभात’ने हिंदु राष्ट्राशी वैचारिक बांधीलकी आरंभीपासून जोपासली. ‘सनातन प्रभात’चे ब्रीदवाक्यच आहे – ‘हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी दैनिक सनातन प्रभात !’ यावरून आपल्याला लक्षात येईल की, ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्रासाठी सदैव कटीबद्ध आहे. आपण सर्व जण हिंदु राष्ट्राचे समर्थक आहातच. त्यामुळे ‘ज्योतसे ज्योत जगाते चलो’, याप्रमाणे आपल्याला हिंदु राष्ट्राच्या या ज्योतीचे मशालीत रूपांतर करायचे आहे !
२. हिंदु राष्ट्राची आध्यात्मिक संकल्पना
हिंदु राष्ट्राची संकल्पना केवळ राजकीय नाही, तर ती आध्यात्मिक आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आपल्याकडे हिंदु राष्ट्राची संकल्पना नवीन नाही. भारत हे स्वयंभू हिंदु राष्ट्रच आहे. प्रभु श्रीरामांचे रामराज्य, भगवान श्रीकृष्णांनी केलेली धर्मसंस्थापना, आद्यशंकराचार्यांनी केलेले हिंदु धर्माचे पुनरूत्थान, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य, अशी आजच्या भाषेत ‘हिंदु राष्ट्राची’च मूर्तीमंत उदाहरणे आहेत. या सर्व धर्माधिष्ठित राजसत्तांचे अवलोकन केले, तर ‘त्यांचा पाया हा ब्राह्म आणि क्षात्र तेज हाच होता’, हे लक्षात येईल. याच मार्गावर ‘सनातन प्रभात’ वाटचाल करत आहे.
‘केवळ बातम्या नाही, तर दृष्टीकोन’ (Not only news, but views), हे ‘सनातन प्रभात’चे प्रमुख वैशिष्ट्य आहे. बातम्या देणारी अनेक वृत्तपत्रे आहेत; पण ‘या बातम्यांमधून वाचकांनी काय बोध घ्यायचा ?’, याचे दिशादर्शन ‘सनातन प्रभात’मधून केले जाते. समस्येचे केवळ वरवर निराकरण करण्याऐवजी त्याच्या मूळाशी जाऊन त्याचे समूळ उच्चाटन केले पाहिजे, हे आम्ही सांगतो. केवळ ‘वाचक संख्या जमवणे’, हा ‘सनातन प्रभात’चा उद्देश नाही, तर ‘कृतीशीलता’ हा आमचा मापदंड आहे. याचे उदाहरण म्हणजे ‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक, विज्ञापनदाते, हितचिंतक यांचे हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात यथाशक्ती दिले जाणारे योगदान आहे. अशा प्रकारे वाचकांचीही समष्टी साधना करवून घेणारे हे वृत्तपत्राच्या इतिहासातील एकमेव वृत्तपत्र असावे !
३. राष्ट्र आणि धर्महितैषी विचार निर्भीडपणे मांडणारे ‘सनातन प्रभात !’
३ अ. खलिस्तान्यांचा बिमोड करण्याविषयी ‘सनातन प्रभात’ने मांडलेली निर्भीड भूमिका ! : ‘सनातन प्रभात’ने नेहमीच राष्ट्रहिताला अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. त्या दृष्टीकोनातून ‘सनातन प्रभात’ची पत्रकारिता कार्यरत आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले, तर गेल्या २-३ वर्षांपासून देशात विशेषतः पंजाबमध्ये खलिस्तानवादाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. वेगवेगळ्या घटनांमागे खलिस्तानवाद्यांचा हात असल्याचे समोर आले आहे. त्या वेळी ‘सनातन प्रभात’मधून ‘खलिस्तानवादाच्या समस्येने पुन्हा उग्र रूप धारण करण्यापूर्वीच खलिस्तान्यांचा बिमोड करा’, अशी भूमिका वारंवार मांडली. देहलीतील शेतकरी आंदोलनात खलिस्तान्यांनी केलेली घुसखोरी, पंजाबमधील हिंदुत्वनिष्ठ नेत्यांच्या हत्येत खलिस्तान्यांचा सहभाग आणि आता ऑस्ट्रेलिया, कॅनडा, ब्रिटन आदी देशांमध्ये खलिस्तानावाद्यांच्या भारतविरोधी कारवाया, असे खलिस्तानवादाने उग्र रूप धारण केले आहे. आता सरकारने धडक कारवाई करत खलिस्तान्यांच्या मुसक्या आवळण्यास प्रारंभ केला आहे.
३ आ. ‘सर तन से जुदा’च्या (डोके शरिरापासून वेगळे करण्याच्या) घोषणेविरोधात ‘सनातन प्रभात’मधून रोखठोक मागणी ! : आज हिंदूंसमोर जिहादी आतंकवाद, लव्ह जिहाद, धर्मांतर, दंगली आदी समस्या आहेतच; परंतु यंदाचे वर्ष विशेष लक्षात राहिले, ते धर्मांधांनी हिंदूंना ‘सर तन से जुदा’च्या दिलेल्या धमक्यांमुळे ! राजस्थानमधील उदयपूर, महाराष्ट्रातील अमरावती अशा अनेक ठिकाणी धर्मांधांनी ‘सर तन से जुदा’ ही घोषणा प्रत्यक्षात कृतीत आणली. याविषयीचे वृत्त प्रसारित करतांना ‘सनातन प्रभात’ने कुणाचीही भीडभाड न बाळगता जिहादी प्रवृत्तीवर घणाघात केला आणि हिंदूंसमोर पुन्हा एकदा हिंदूसंघटनाची अपरिहार्यता स्पष्ट केली. या देशात १५ मिनिटे पोलिसांना बाजूला केल्यास ७५ कोटी हिंदूंना मारण्याची प्रथम धमकी दिली गेली आणि काही वर्षांनी ‘सर तन से जुदा’च्या रूपात ती प्रत्यक्षात अस्तित्वातही आणली ! अन्य वृत्तपत्रांनी याविषयीच्या बातम्या प्रसारित केल्या; परंतु ‘धर्मांधांवर कठोरात कठोर कारवाई करा’, अशी मागणी केवळ ‘सनातन प्रभातने’च केली.
३ इ. धर्मांध ‘पी.एफ्. आय’वर बंदीची मागणी ! : आतापर्यंत देशभरात झालेल्या अनेक दंगली, हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या आदी हिंदूविरोधी घटनांमागे बंदी असलेल्या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’ या जिहादी संघटनेचा हात असल्याचे वेळोवेळी उघड झाले आहे. विशेषतः कर्नाटकमधील अनेक हिंदूविरोधी घटनांमध्ये या धर्मांध संघटनेचा हात असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच काही वर्षांपूर्वीच ‘सनातन प्रभात’ने या संघटनेवर भारतात बंदी घालण्याची मागणी केली होती. अशी मागणी अन्य एकाही वृत्तपत्राने केल्याचे ऐकिवात नाही.
ही उदाहारणे सांगण्यामागे अन्य कुठल्या प्रसारमाध्यमांशी तुलना करण्याचा उद्देश नाही, तर त्यातून ‘सनातन प्रभात’ची हिंदुत्वनिष्ठ विचारांशी असलेली बांधीलकी अधोरेखित करण्याचा प्रामाणिक हेतू आहे.
३ ई. लव्ह जिहादविरोधी समाजमन घडवले ! : ‘सनातन प्रभात’मधून फार पूर्वीपासून ‘लव्ह जिहाद’ची दाहकता मांडण्यात येते; परंतु समाजाने या दाहकतेचा खर्या अर्थाने अनुभव घेतला तो श्रद्धा वालकर प्रकरणात ! काही मासांपूर्वी देहलीत या तरुणीची तिच्या धर्मांध प्रियकराने ३५ तुकडे करून अत्यंत अमानुषपणे हत्या केली. लव्ह जिहादच्या विरोधात ‘सनातन प्रभात’ने आतापर्यंत अनेक विशेषांक काढून जनजागृती केली आहे. जेव्हा समाजाला ‘लव्ह जिहाद’ हा शब्दही ज्ञात नव्हता, तेव्हापासून ‘सनातन प्रभात’ त्याविषयी सातत्याने जागृती करत आहे. परिणामस्वरूप आज देशातील ९ राज्यांनी धर्मांतरविरोधी कायदा केला आहे. लव्ह जिहादविरोधी समाजमन घडवण्यात, तसेच हिंदूंना धर्मशिक्षणाचे महत्त्व पटवून देण्यात ‘सनातन प्रभात’चा मोलाचा वाटा आहे.
३ उ. गड-दुर्गांच्या रक्षणकार्यात मावळ्याची भूमिका ! : जशी मंदिरे ही चैतन्याचा स्रोत आहेत, तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे गड-दुर्ग ही हिंदूंसाठी ऊर्जेची केंद्रे आहेत. हे गड-दुर्ग जाज्ज्वल्य इतिहासाचे साक्षीदार आहेत. त्यामुळेच या गड-दुर्गांचे पर्यायाने इतिहासाचे रक्षण करणे तुमचे-आमचे, आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे. या गड-दुर्गांची झालेली दुरवस्था, त्यांवर झालेले इस्लामी अतिक्रमण आदींच्या संदर्भात ‘सनातन प्रभात’ने नेहमी मावळ्याची भूमिका घेतली आहे. ‘सनातन प्रभात’ने याविषयी प्रसिद्ध केलेले लेख अन् बातम्या, तसेच त्यांना लाभलेली हिंदुत्वनिष्ठ, शिवप्रेमी, गड-दुर्गप्रेमी आदींच्या प्रयत्नांची जोड यांमुळे या गड-दुर्गांच्या रक्षणासाठी महाराष्ट्र शासनाने स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची घोषणा नुकतीच केली आहे.
३ ऊ. शिक्षणाच्या इस्लामीकरणाच्या विरोधात जागृती ! : काही मासांपूर्वी कर्नाटकमधील शिक्षण संस्थांत मुसलमान विद्यार्थिनींना हिजाब (मुसलमान महिलांचे डोके झाकण्याचे वस्त्र) घालू दिला जाण्याची आग्रही मागणी केली गेली. यावर ‘सनातन प्रभात’ने धर्मांधांची स्वतंत्र धार्मिक ओळख जोपासण्याची मानसिकता, शिक्षणाचे इस्लामीकरण आणि पुरोगाम्यांचा तथाकथित सर्वधर्मसमभाव समाजासमोर आणला. याच कालावधीत इराणमध्ये मात्र हिजाबविरोधी आंदोलन चालू होते, हेही ‘सनातन प्रभात’ने आवर्जून समाजासमोर आणले.
३ ए. वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘गजवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण) करण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात जागृती ! : आपल्याला एक ना अनेक संकटांनी एकाच वेळी घेरण्याचे सुनियोजित षड्यंत्र रचले जात आहे. ‘वर्ष २०४७ पर्यंत भारताचे ‘गजवा-ए-हिंद’ करण्याचे अर्थात् भारताचे संपूर्ण इस्लामीकरण करण्याचे धर्मांधांचे मनसुबे आहेत. अन्वेषण यंत्रणांना या संदर्भातील ‘ब्लू प्रिंट’ही (विस्तृत योजनाही) धर्मांधांकडे आढळून आली. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय स्तरावरही भारताच्या विरोधात अनेक ‘टूल किट्स’ (उद्देशपूर्तीसाठीची साधने) कार्यरत आहेत. ‘सनातन प्रभात’ने २३ वर्षांपूर्वीच हिंदु राष्ट्राचा उद्घोष का केला होता ? आणि तो किती योग्य होता ? हे या सर्वांतून लक्षात येईल !
‘सर तन से जुदा’ किंवा ‘गजवा-ए-हिंद’ काय, हा सर्व आतंकवादाला प्रोत्साहनच देण्याचा प्रकार नव्हे का ?
३ ऐ. ‘सनातन प्रभात’च्या समाज, संस्कृती, राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या भूमिकेचे परिणाम ! अशा प्रकारे ‘सनातन प्रभात’ने आतापर्यंत सातत्याने समाज, संस्कृती, राष्ट्र आणि धर्म रक्षणाची भूमिका मांडली. त्याचे परिणाम आज अनेक राज्यांत दिसून येत आहेत. गोव्यातही सरकारकडून येथील प्राचीन मंदिरांचा जीर्णाेद्धार करण्याची घोषणा करण्यात आली. प्राचीन श्री सप्तकोटीश्वर मंदिरातही या संदर्भातील नुकताच एक भव्य कार्यक्रम पार पडला. याखेरीज शैक्षणिक संस्थांना क्रांतीकारकांची नावे देणे, आयुर्वेदाला प्रोत्साहन देणे आदी अभिनंदनीय निर्णय सरकारकडून घेण्यात आले.
४. उपासना बळाची आवश्यकता !
थोर संत समर्थ रामदासस्वामी यांनी म्हटलेच आहे की, ‘सामर्थ्य आहे चळवळेचें । जो जो करील तयाचें । परंतु येथें भगवंताचें । अधिष्ठान पाहिजे ।।’ (दासबोध, दशक २०, समास ४, ओवी २६) (अर्थ : प्रत्येकामध्ये फार मोठी चळवळ करण्याचे सामर्थ्य असते. काही जण त्या दृष्टीने प्रयत्न करतातही; परंतु ते प्रयत्न यशस्वी होण्यासाठी त्या प्रयत्नांना भगवंताचे अधिष्ठान असणे अत्यंत आवश्यक आहे.) ‘सनातन प्रभात’चे वैशिष्ट्यही हेच आहे की, ‘हिंदुत्वाचे कार्य हे साधना म्हणून कसे करावे ?’, हे आम्ही हिंदूंना सांगतो. सध्याच्या काळात उपासनेच्या बळाचे आणि त्यासाठी साधना करण्याचे महत्त्व बिंबवण्यासाठी ‘सनातन प्रभात’ ८ पानांपैकी २ पाने (म्हणजे २५ टक्के) जागा राखीव ठेवते. ‘लोकांना काय आवडते, यापेक्षाही लोकांना काय आवश्यक आहे ?’, तेच देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो. साधकांनी साधनेविषयी केलेले प्रयत्न, त्यांना आलेल्या अनुभूती, संतांनी केलेले मार्गदर्शन आदी ‘सनातन प्रभात’मध्ये नित्य प्रसिद्ध केले जाते. त्याद्वारे वाचकांवर साधनेचे महत्त्व बिंबवले जाते. साधना करून ‘सनातन प्रभात’चे अनेक वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आदी जन्म-मृत्यूच्या फेर्यांतून मुक्त झाले आहेत, हे सांगायला मला विशेष आनंद होत आहे.
५. ‘सोशल मिडिया’वरही ‘सनातन प्रभात’ला उत्तम प्रतिसाद!
काळाची गती लक्षात घेऊन ‘सनातन प्रभात’ संकेतस्थळ, ‘ॲप’, ‘ई-पेपर’, ‘डेली हंट’, ‘टेलीग्राम चॅनल’, ‘इंस्टाग्राम अकाऊंट’ आदींच्या माध्यमातून अधिकाधिक वाचकांपर्यंत पोचत आहे. प्रत्येक मासाला साधारण २० लाखांहून अधिक वेळा ‘सनातन प्रभात’चे लेख आणि बातम्या वाचल्या जातात ! आपल्या सर्वांना मी एक नम्र आवाहन करू इच्छितो की, आपण ‘सनातन प्रभात’ हे नियतकालिक घराघरांत पोचवण्यासाठी प्रयत्न करा आणि ‘सोशल मिडिया’च्या माध्यमातूनही त्याचा प्रसार करा.
६. सनातन प्रभात हे हिंदूंचे हक्काचे व्यासपीठ !
तुम्हाला तुमच्या दैनंदिन व्यवहारात आलेले चांगले-वाईट अनुभव, मग ते प्रशासनाच्या संदर्भात असतील किंवा शैक्षणिक, आरोग्य, प्रवास आदींच्या संदर्भात असतील, ते आम्हाला अवश्य लिहून पाठवा. यासह हिंदु धर्म, धर्मग्रंथ, हिंदू, साधू-संत, राष्ट्रपुरुष आदींवरील आघातांविषयीही ‘सनातन प्रभात’ला कळवा. ‘सनातन प्रभात’ हे प्रत्येक हिंदूचे हक्काचे व्यासपीठ आहे.’