नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवर कारवाई करून अहवाल सादर करा ! – साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी यांचे आदेश
सुराज्य अभियानाच्या निवेदनाचा परिणाम
कोल्हापूर – खासगी ट्रॅव्हल्सच्या संदर्भात सुराज्य अभियानाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनातील सूत्रांनुसार आवश्यक ती कारवाई करावी. प्रवाशांकडून नियमापेक्षा अधिक भाडे आकारणार्या खासगी ट्रॅव्हल्सवर मोटार वाहन कायदा आणि त्याअंतर्गत असलेल्या नियमांनुसार कारवाई करून त्याचा अहवाल सादर करावा, असा आदेश साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांनी मोटार वाहन निरीक्षक, विशेष पडताळणी पथक आणि वायू प्रदूषण पडताळणी पथक यांना दिला. या आदेशासमवेत सुराज्य अभियानाच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनाची प्रतही जोडण्यात आली आहे.
सण, उत्सव, उन्हाळ्याची सुटी, दीपावली अशा कालावधीत खासगी प्रवासी टॅ्रव्हल्सकडून भरमसाठ तिकिटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट केली जाते. सध्या उन्हाळी सुटीच्या निमित्ताने खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखली जावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत ५ एप्रिलला कोल्हापूर येथे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांना निवेदन दिले. त्यानुसार हा आदेश काढण्यात आला.