राज्यातील १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची छायाचित्रे व्यवस्थापकीय संचालकांनापुढे सादर !
हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’ने उपस्थित केले एस्.टी. महामंडळाच्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’विषयी प्रश्नचिन्ह !
मुंबई – राज्यात एस्.टी.च्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त एस्.टी.महामंडळाकडून घोषित करण्यात आलेल्या ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमे’विषयी हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’कडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले आहे. १० एप्रिल या दिवशी सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने थेट एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांची प्रत्यक्ष भेट घेऊन राज्यातील १६ मुख्य बसस्थानकांच्या दुरवस्थेची माहिती छायाचित्रांसह त्यांना सादर केली. ‘स्वच्छतामोहीम हाती घेऊन ४ मास झाले, तरी बसस्थानकांवर इतकी अस्वच्छता असेल, तर राज्यात बसस्थानक स्वच्छता मोहीम खरोखरच राबवली जात आहे का ?’ याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करत चौकशी करण्याची मागणी ‘सुराज्य अभियाना’च्या शिष्टमंडळाने केली.
सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाने परिवहन विभागाचे सचिव पराग जैग यांचीही मंत्रालयात भेट घेऊन एस्.टी.च्या बसस्थानक स्वच्छता मोहिमेच्या वस्तूस्थितीविषयी त्यांना अवगत केले. सोलापूर, देगवड, सावंतवाडी, भुसावळ, जळगाव, दापोली, राजापूर, खेड, रत्नागिरी, सातारा, स्वारगेट (पुणे), कराड, अमरावती, अकोला, आर्णी आणि वणी या बसस्थानकांच्या दुरवस्थेची माहिती आणि छायाचित्र प्रशासनाकडे देण्यात आली. यामध्ये प्रसाधनगृहांची दुरवस्था, बसस्थानकांच्या परिसरात कचर्याचे असलेले साम्राज्य, भित्तीपत्रकांमुळे विद्रूप झालेल्या भिंती, तुटलेली आणि अस्वच्छ बाकडी, बंद असलेले पिण्याच्या पाण्याचे नळ, जळमटांनी माखलेले छत, परिसरातील खड्डे, बंद उपाहारगृहे आदी छात्राचित्रांतून बसस्थानकांची स्थिती अत्यंत दयनीय असल्याचे समोर आले.
या प्रत्येक बसस्थानकांचे विभागीय नियंत्रक आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्याकडेही सुराज्य अभियानाच्या वतीने ही माहिती देण्यात येणार आहे. ‘एस्.टी. महामंडळाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तरी ‘स्वच्छ बसस्थानक’ ही संकल्पना प्रत्यक्षात यावी, तसेच बसस्थानकांवर किमान प्राथमिक सुविधा तरी उपलब्ध व्हाव्यात’, अशी मागणी सुराज्य अभियानाकडून या वेळी करण्यात आली.
या वेळी सुराज्य अभियानाकडून देण्यात आलेल्या निवेदनामध्ये बसस्थानकांची स्वच्छता राखण्याच्या दृष्टीने उपाययोजनाही सुचवण्यात आल्या आहेत, तसेच स्वच्छता मोहिमेसाठी सहकार्य करणार असल्याचेही सांगण्यात आले.
या स्थितीत लवकरच पालट करू ! – शेखर चन्ने, व्यवस्थापकीय संचालक, एस्.टी. महामंडळ
तुम्ही हाती घेतलेली मोहीम चांगली आहे. बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी प्रयत्न चालू आहेत. लवकरच या परिस्थितीत पालट करू, असे आश्वासन या वेळी शेखर चन्ने यांनी सुराज्य अभियानाच्या शिष्टमंडळाला दिले.
दैनिक ‘सनातन प्रभात’ची वृत्ते अधिकार्यांकडे सुपुर्द !बसस्थानकांच्या स्वच्छता मोहिमेची वस्तूस्थिती जनतेपुढे यावी, यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘बसस्थानक स्वच्छता मोहिमेचे खरे स्वरूप उघड करणारी वृत्तमाला’ प्रसिद्ध करण्यात आली होती. ही वृत्तेही सुराज्य अभियानाकडून एस्.टी. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आणि परिवहन विभाग यांना निवेदनासमवेत देण्यात आली. |
मोहिमेपुरती नव्हे, बसस्थानकांची स्वच्छता कायमस्वरूपी ठेवावी ! – अभिषेक मुरुकटे, सुराज्य अभियान, हिंदु जनजागृती समितीआज नफा-तोटा यांचा विचार न करता एस्.टी. रात्रंदिवस सर्वसामान्यांसाठी अखंडपणे धावत आहे. एस्.टी.चा उत्कर्ष करायचा असेल, तर प्रथम बसस्थानकाच्या स्वच्छतेसह प्रवाशांना किमान प्राथमिक सुविधा तरी चांगल्या प्रकारे द्याव्यात, तसेच केवळ मोहिमेपुरती बसस्थानके स्वच्छ न ठेवता कायमस्वरूपी स्वच्छ रहाण्याच्या दृष्टीने ठोस उपाययोजना काढव्यात, असे आवाहन सुराज्य अभियानाकडून शासनाला करण्यात आले आहे. |