कलाकार, नाट्यक्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार ! – प्रिया बेर्डे, अध्यक्षा, भाजप सांस्कृतिक आघाडी
सांगली, ९ एप्रिल (वार्ता.) – कोरोनाच्या संसर्गानंतर कला, नाट्य क्षेत्रात काम करणार्या तंत्रज्ञ यांसह अनेकांची स्थिती गंभीर झाली आहे. मराठी चित्रपटांना चित्रपटगृह उपलब्ध न होणे, पुरेसे खेळ न मिळणे यांसह अन्य अडचणींना सामोरे जावे लागत आहे. सांगलीसह अनेक शहरातील नाट्यगृहांची अवस्था चांगली नाही. वृद्ध कलाकारांना मानधन न मिळणे, लोककला लुप्त होणे अशा अडचणी आहेत. तरी या पुढील काळात कलाकार, नाट्यक्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार, अशी ग्वाही भाजप सांस्कृतिक आघाडीच्या अध्यक्षा प्रिया बेर्डे यांनी दिली. त्या सांगलीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होत्या. या प्रसंगी सांस्कृतिक आघाडी प्रदेश उपाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल, भाजप सरचिटणीस श्री. केदार खाडिलकर, अपर्णा गोसावी यांसह अन्य उपस्थित होते.
प्रिया बेर्डे पुढे म्हणाल्या, ‘‘सध्या गौतमी पाटीलसारख्या युवती ज्या प्रकारे लावणी प्रकार सादर करत आहेत त्याला कला म्हणावे काय ? हा एक मोठा प्रश्न आहे. गौतमी पाटील यांच्या सारख्यांना लोकांनी मोठे केले आहे. अशांविषयी योग्य-अयोग्य बोलल्यावर आम्हाला सामाजिक माध्यमातून ‘ट्रोल’ केले जाते. अशा प्रसंगांमध्ये लोकांनीही काय पहावे ते ठरवले पाहिजे. गौतमी पाटीलसारख्यांना माध्यमांनीही अकारण मोठे केले आहे. काही मराठी लोकच आम्ही ‘इंडियन एक्सप्रेस’, ‘टाईम्स ऑफ इंडिया’ वाचतो आम्ही मराठी वाचत नाही, असे फुशारकी मारून सांगतात. अशांकडून मराठीसाठी काहीतरी होईल याची काय अपेक्षा करणार.’’
मी कोल्हापूर शहरात काम केले आहे. कोल्हापूर येथे काम करण्यात जो आनंद आहे तो जगात कुठे नाही. दुर्दैवाने कोल्हापूरचे ते वैभव सध्या राहिले नाही, अशी खंत प्रिया बेर्डे यांनी या प्रसंगी व्यक्त केली. |