डोळ्यांचे आरोग्य आणि वाढता ‘स्क्रीन टाइम’
(टिप : ‘स्क्रीन टाइम’ म्हणजे भ्रमणभाष, संगणक, दूरचित्रवाणी आदी पहाण्याचा कालावधी)
‘आधुनिक काळात आपला भ्रमणभाष, संगणक, दूरचित्रवाणी आदी बघण्याचा भाग पुष्कळ वाढला आहे. त्यामुळे या उपकरणांचा वापर अल्प करणे, हे अनेक तरुणांना दिवसेंदिवस कठीण होत आहे. शक्य होईल तेवढा याचा वापर न्यून करण्याचा सल्ला आम्ही वैद्य त्यांना देतो. तसेच अनेकांना भ्रमणभाष, संगणक यांचा वापर न्यून करण्याविषयी वाटत असले, तरी त्यांचे उद्योग व्यवसाय त्यावर अवलंबून असतात. त्यामुळे कृतीच्या स्तरावर त्यांना स्क्रीनचा वापर टाळणे शक्य होत नाही. दिवस-रात्र स्क्रीनच्या म्हणजेच प्रखर उजेडाच्या समोर राहिल्याने त्यांच्या डोळ्यांना त्रास होऊ शकतो. या कृत्रिम; परंतु घातक अशा किरणोत्सर्गाच्या उष्णतेपासून रक्षण होणे आवश्यक ठरते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी पुढील कृती कराव्यात !
१. तळपायांना तेल किंवा तूप लावावे.
२. पूर्वापार चालत येणार्या आपल्या संस्कृती अनेक जण विसरतात; पण त्यामागे काही कारणे असतात. डोळ्यांत काजळ घालणे (अंजन) ही त्यातीलच एक महत्त्वपूर्ण कृती. साध्या तूपाचे अंजन डोळ्यांत घातल्याने पुष्कळ लाभ होतो.
३. डोळ्यांवर शक्यतो निरशा (कच्च्या) दूधाच्या घड्या ठेवाव्यात. तसे शक्य नसल्यास उकळून गार केलेल्या दुधात कापूस भिजवून तो डोळ्यांवर ठेवावा. दूध उपलब्ध नसल्यास त्याऐवजी डोळ्यांवर गुलाब पाण्याच्या घड्या घालाव्यात.
४. डोळ्यांच्या बाहेरून सर्व बाजूंनी तूप लावावे. याने डोळ्यांच्या स्नायूंवरील ताण अल्प होण्यास साहाय्य होते.
५. आहारीय पदार्थांमधील आवळा हे फळ डोळ्यांच्या आरोग्यासाठी हितकारक ठरते.
६. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सातत्याने स्क्रीनकडे पाहून ‘स्क्रीन टाइम’ न वाढवता अधून-मधून काही ठराविक अंतराने थांबून डोळ्यांना काही क्षणांची तरी विश्रांती द्यावी. हीच कृती वाहन चालवत असतांनाही महत्त्वपूर्ण ठरते.
७. डोळ्यांसाठी विशिष्ट प्रकारचे व्यायाम असतात. तेही शिकून नियमित केल्यास दृष्टी सुधारते.
८. शरीर आणि डोके यांना नित्य अभ्यंग (तेल लावणे) केल्याने आणि नाकात तूप घातल्याने (नस्य केल्याने) डोळे निरोगी रहातात. ’
– वैद्य समीर मुकुंद परांजपे, खेर्डी, दापोली, रत्नागिरी. (३.२.२०२३)
संपर्कासाठी ई-मेल : drsameerparanjape@gmail.com