ओहर (जिल्हा छत्रपती संभाजीनगर) येथील दंगलप्रकरणी ८ जणांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला !
किराडपुरा दंगलप्रकरणी ३ धर्मांधांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी !
छत्रपती संभाजीनगर – शहरातील दंगल प्रकरणातील अटकेत असलेल्या ८ आरोपींचा जामीन अर्ज न्यायालयाने ७ एप्रिल या दिवशी फेटाळला आहे. छत्रपती संभाजीनगर शहरातील जटवाडा रस्त्यावर असलेल्या ओहर गावात ३१ मार्च या दिवशी फलक फाडल्याप्रकरणी हिंदु आणि मुसलमान यांच्यात वाद झाला होता. वादाचे रूपांतर दगडफेकीत झाल्याने गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांनी तात्काळ गावात धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली होती. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे नोंद करत आरोपींची धरपकड चालू केली आहे. अटकेतील ८ आरोपींनी नियमित जामिनासाठी अर्ज केला होता; मात्र प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम्.एम्. माळी यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळला.
मोसीन खान मोईन खान पठाण (वय ३३ वर्षे), मुजफ्फर मन्सूर पठाण (वय २५ वर्षे), फयाज हारुनखाँ पठाण (वय १९ वर्षे), मोसीन रशिदखाँ पठाण (वय २२ वर्षे), मुस्तकिन नसीरखाँ पठाण (वय ३२ वर्षे) आणि खान समीर अकबर उपाख्य एम्.डी. समीर (वय २३ वर्षे, सर्व रा. ओहरगाव), भास्कर पिठोरे (वय २६ वर्षे) आणि अजय भालकर (वय ३४ वर्षे) अशी आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींकडून न्यायालयात नियमित जामीन अर्ज प्रविष्ट करण्यात आला होता. याच वेळी सरकारी अधिवक्त्यांनी जामीन देण्यावर आक्षेप घेतला. आरोपींच्या साथीदारांना अटक करायची आहे. गुन्ह्यात वापरलेली हत्यारे हस्तगत करायची आहेत. आरोपींना जामीन दिल्यास पुन्हा दंगल उसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे म्हणत साहाय्यक सरकारी अधिवक्ता शशिकांत इघारे यांनी आरोपींच्या जामीन अर्जाला विरोध केला होता.
छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात झालेल्या दंगलप्रकरणी पोलिसांनी आणखी ३ धर्मांधांच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्यांना १० एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम्.एम्. माळी यांनी दिले आहेत. सलमान खान हारुण खान (वय २४ वर्षे), शेख फैजान शेख मेहराज (वय २० वर्षे) आणि शेख सर्फराज शेख शफिक, अशी धर्मांधांची नावे आहेत, तर तीनही आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती साहाय्यक सरकारी अधिवक्ता शशिकांत इघारे यांनी न्यायालयाकडे केली होती आणि न्यायालयाने ती मान्य करत पोलीस कोठडी सुनावली आहे.