पहिले पेशवे बाळाजी भट यांचे श्रीवर्धन (रायगड) येथील जन्मस्थान दुर्लक्षित !
रायगड, ९ एप्रिल (वार्ता.) – छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज आणि छत्रपती राजाराम महाराज यांच्यानंतर मराठ्यांची सत्ता कमकुवत होत होती. त्या वेळी छत्रपती शाहू महाराज (पहिले) यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून हिंदवी स्वराज्याच्या विस्तार करणारे पराक्रमी अन् धुरंधर पहिले पेशवे म्हणजे बाळाजी विश्वनाथ भट. हिंदवी स्वराज्यासाठी मैदान गाजवणारे बाळाजी भट हे मूळचे कोकणातील रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील आहेत. त्यांचे जन्मस्थान येथे आहे. या वीरपुरुषाच्या पराक्रमाचा इतिहास खरे तर महाराष्ट्र सरकारने जगाला अभिमानाने सांगणे अपेक्षित आहे; परंतु दुर्दैव म्हणजे पेशव्यांचे मूळ घर श्रीवर्धन येथे आहे, हेच अनेकांना ठाऊक नसल्याने पेशव्यांचे मूळ घर दुर्लक्षितच राहिले आहे.
बाळाजी पेशवे यांच्या पुतळ्याची दुःस्थिती !वर्ष १९८८ मध्ये नगर परिषदेला १०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने येथे बाळाजी पेशवे यांचा कांस्य धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला, तसेच या परिसराला तटबंदी करण्यात आली. सद्य:स्थितीत येथील तटबंदी ढासळली आहे. नगर परिषदेने उभारलेली कमान पूर्णत: तुटली आहे. बाळाजी यांच्या पुतळ्यावर मेघडंबरी नाही, तसेच आजूबाजूच्या धुळीमुळे पुतळ्यावर धूळ जमत आहे. नोव्हेंबर २०१७ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन स्थानिक आमदार सुनील तटकरे, भाजपचे आमदार प्रशांत ठाकूर यांची बैठक झाली. या संबंधित विभागांचे प्रशासकीय अधिकारीही या वेळी उपस्थित होते. या वेळी श्रीवर्धन येथे पेशवे यांचे स्मारक उभारण्याचे निश्चित करण्यात आले. यामध्ये संग्रहालय, सभागृह, बाळाजी पेशवे यांचा भव्य पुतळा उभारणे आणि हा परिसर विकसित करणे ही कामे करण्याचे ठरवण्यात आले; मात्र त्यानंतर पुढे कार्यवाही झालेली नाही. ऐतिहासिक माहिती असलेले काही पर्यटक पेशव्यांचे मूळ घर पहाण्यासाठी श्रीवर्धन येथे आवर्जून येतात; मात्र या स्थानाची दु:स्थिती पाहून त्यांचा अपेक्षाभंग होतो. चैत्र शुद्ध ६ (३० मार्च) या दिवशी बाळाजी विश्वनाथ यांची ३०३ वी पुण्यतिथी श्रीवर्धनवासियांनी साजरी केली. ‘सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन या स्थानाचा विकास करून त्यांच्या पराक्रमाचा इतिहास भावी पिढीला सांगणे अपेक्षित आहे’, असे राष्ट्रप्रेमींचे म्हणणे आहे. |
मराठ्यांचा जाज्वल्य इतिहास !
जंजिर्याच्या सिद्दीच्या उपद्रवामुळे विश्वनाथ भट कुटुंबासह श्रीवर्धन येथून सातारा येथे स्थायिक झाले. पुढे त्यांचा मुलगा बाळाजी पेशवे हे महाराणी ताराबाई (छत्रपती राजाराम यांच्या पत्नी) यांच्या दरबारात पिढीजात कारकुनीचे काम करत होते; मात्र त्यांची मुत्सद्देगिरी पाहून सेनापती धनाजी जाधव यांनी त्यांना सेनेत घेतले. शाहू (छत्रपती संभाजी राजे यांचे पुत्र) यांची मोगलांनी सुटका केल्यानंतर धनाजी जाधव आणि बाळाजी पेशवे यांनी छत्रपती शाहू महाराज यांना साथ दिली. बाळाजी पेशवे यांनी कान्होजी आंग्रे यांनाही शाहू यांच्या साहाय्यास वळवून घेतले. बाळाजी यांची मुत्सद्देगिरी पाहून वर्ष १७१३ मध्ये शाहू यांनी त्यांना पेशवाईची वस्त्रे दिली. त्यानंतर बाळाजी पेशवे यांनी स्वराज्याचा विस्तार केला. त्यांचा मुलगा थोरले बाजीराव यांनी पराक्रम गाजवून मराठ्यांचे राज्य उत्तरेत विस्तारले.
वाटाघाटीला मूर्त स्वरूप न आल्याने काम रखडले ! – जितेंद्र सातनाक, माजी नगराध्यक्ष, श्रीवर्धन नगरपालिका
तत्कालीन खासदार सुनील तटकरे यांच्या प्रस्तावानुसार श्रीवर्धन येथे श्रीमंत बाळाजी पेशवे यांचे स्मारक व्हावे, यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत बैठक झाली. स्मारकाचा प्रस्ताव शासनाने मान्यही केला. त्यानंतर आराखडाही निश्चित करण्यात आला; मात्र ही जागा लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टची आहे. सरकारकडून बाजारभावानुसार जागेचे करण्यात आलेले मूल्यांकन देवस्थानला मान्य झाले नाही. वाटाघाटीला मूर्त स्वरूप न आल्यामुळे काम रखडले. भूमी नगर परिषदेकडे हस्तांतरीत न झाल्यामुळे कामाला प्रारंभ झाला नाही. हा प्रश्न सोडवण्यासाठी सुनील तटकरे यांनी देवस्थानसमवेत बैठक घेतली; मात्र त्यानंतर काही तांत्रिक अडचणींमुळे विषय पुढे सरकला नाही. सध्या श्रीवर्धन नगर परिषदेवर प्रशासन नियुक्त करण्यात आले आहे. हे काम व्हावे, अशीच सर्वांची इच्छा आहे, असे श्रीवर्धन नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष जितेंद्र सातनाक यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले.