पी.एम्.आर्.डी.ए.च्या एकाही प्रकल्पाला ८ वर्षांत गती मिळेना !
पिंपरी – पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (पी.एम्.आर्.डी.ए.) ला ३१ मार्च २०२३ या दिवशी ८ वर्षे पूर्ण झाली; मात्र नियोजनबद्ध विकास आणि शाश्वत रोजगार यांना आवश्यक असणारा प्राधिकरणाचा विकास आराखडा अन् सर्वंकष वाहतूक आराखडा यांना अद्याप मुहूर्त मिळालेला नाही. जिल्ह्यातील ७५ टक्के भाग प्राधिकरणाने व्यापला असून गेल्या ८ वर्षांत एकाही प्रकल्पाला गती मिळाली नाही. पी.एम्.आर्.डी.ए.चा आवाका समजण्यास अधिकार्यांना वर्षाचा कालावधी लागतो; मात्र तोपर्यंत त्यांचे स्थानांतर होत असल्याने अनेक विकास प्रकल्पात त्रुटी समोर येत आहेत.
प्राधिकरणाच्या येणार्या सभेसाठीही विषय सूचीवर कोणताही ठोस विषय नाही. हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे ४० प्रतिशत काम झाले आहे. महाळुंगे माळ टीपी स्कीमचे काम संथ गतीने चालले आहे. प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये भोसरी फेज टू पर्यावरण विभागाची अनुमती येणे शेष आहे.
विकास आराखड्यातही त्रुटी असल्याने आणि उच्च न्यायालयाने या आराखड्यावर आक्षेप घेतल्यामुळे तो प्रसिद्ध होऊ शकला नाही. शहरातील वाहतुकीच्या नियोजनाला दिशा देणारा सर्वंकष वाहतूक आराखडाही प्रसिद्ध झालेला नाही. या व्यतिरिक्त ८१४ गावांमधील अतिक्रमण, घनकचरा व्यवस्थापन, मेट्रो लाईन कनेक्टिव्हिटी, सोयी-सुविधांचा विकास, अग्नीशमन केंद्रे या संदर्भातीलही काम होणे शेष आहे. या सर्वांसाठी सर्वंकष आकृतीबंध संमत होणे आवश्यक आहे, तरच हे सर्व प्रश्न मार्गी लागण्यास साहाय्य होईल. आगामी काळात होणार्या सभेमध्ये वेळेत विषय संमत होणे आवश्यक आहे, असे पी.एम्.आर्.डी.ए.चे जनसंपर्क अधिकारी रामदास जगताप यांनी सांगितले.