साधकांनो, ‘प्रिंटर’च्या अयोग्य हाताळणीमुळे गुरुधनाची हानी होऊ नये’, यासाठी ‘प्रिंटर’ कसा हाताळायचा आणि त्याची काळजी कशी घ्यायची ?’, हे शिकून घ्या !
आपण गुणवत्ता आणि फलनिष्पत्ती या दृष्टीने उत्तम प्रतीच्या वस्तू खरेदी करतो; परंतु अनेक साधकांना ‘प्रिंटर’मधून प्रती (प्रिंट) काढण्यासाठीचे ज्ञात नसल्याने महागडे ‘प्रिंटर’ खराब होतात, म्हणजेच साधकांच्या अयोग्य हाताळणीमुळे गुरुधनाची हानी होते. हे टाळण्यासाठी ‘प्रती (प्रिंट) काढण्याची सेवा करणार्यांनी ‘प्रिंटर’ कसा हाताळायचा आणि त्याची काळजी कशी घ्यायची ?’, याविषयीची सूत्रे पुढे दिली आहेत.
१. प्रत काढण्यापूर्वी
१ अ. प्रती (प्रिंट) काढण्यासाठीचे कागद पाकिटात ठेवणे : प्रती (प्रिंट) काढण्यासाठीचे कागद खणात उघडे न ठेवता कागदी पाकिटात (पेपर पॅकेटमध्ये) ठेवावेत. कागद उघडे ठेवल्यास आर्द्रतेमुळे दमट होतात; परिणामी प्रती काढतांना कागद ‘प्रिंटर’मध्ये अडकून प्रिंटर खराब होऊ शकतो.
१ आ. कागद आर्द्रतेने दमट होऊन प्रिंटरमध्ये अडकत असल्यास ते गरम करावेत ! : पावसाळ्याच्या दिवसांत दमटपणा वाढत असल्याने प्रिंटरमध्ये कागद अडकण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे एका लाकडी बंद कपाटामध्ये किंवा लोखंडी बंद कपाटामध्ये केवळ ४० वॅटचा बल्ब लावून दिवसभरासाठी लागणारे आवश्यक कागद गरम करण्यास ठेवू शकतो. ‘एल्.इ.डी.’ बल्ब लावू नये. कागद गरम झाल्यावर ‘कपाट बंद राहील’, असे पहावे. बल्ब आणि कागद यांमध्ये २० सें.मी. अंतर असावे.
हवेतील आर्द्रतेनुसार साधक कागद गरम करण्याचा कालावधी अंदाज घेऊन ठरवू शकता; परंतु गरम करण्यास ठेवलेले कागद आवश्यकतेपेक्षा अधिक कालावधी ठेवल्यास कागदांचा रंग बदलतो, तसेच काही वेळा कागद पेट घेऊ शकतात. त्यामुळे कागद गरम करण्याचा कालावधी अभ्यास करून ठरवावा. ज्या ठिकाणी हवेतील आर्द्रता अधिक आहे, तेथे गरम केलेले कागद मोकळ्या हवेत बाहेर ठेवल्यास १० ते १५ मिनिटांत त्यांना पुन्हा दमटपणा येतो. त्यामुळे असे कागद प्रत काढण्यासाठी न वापरता पुन्हा गरम करून वापरावेत.
१ इ. काळ्या रंगाच्या शाईचा पट्टा असलेले कागद वापरू नयेत ! : पुढील अथवा मागील बाजूला काळ्या अथवा गडद रंगाच्या शाईचा पट्टा अथवा डाग असलेले कागद प्रत काढण्यासाठी वापरले, तर कागदावरील शाई वितळून ती प्रिंटरच्या आतील भागाला चिकटते आणि प्रिंटर खराब होतो. त्यामुळे तसे कागद कोणत्याही प्रिंटरसाठी वापरू नयेत.
१ ई. प्रत काढण्यासाठीच्या कागदांना स्टेपलरची पिन असू नये ! : प्रत काढण्यासाठी वापरलेल्या कागदांना स्टेपलरची पिन असेल, तर ती पिन प्रिंटरमध्ये अडकल्यास प्रिंटर खराब होऊन आर्थिकदृष्ट्या हानी होऊ शकते. त्यामुळे कागद प्रत काढण्यासाठी वापरण्यापूर्वी त्याला पिन किंवा टाचण्या नसल्याची निश्चिती करणे आवश्यक आहे.
२. प्रत काढत असतांना
२ अ. प्रत काढायची असतांनाच प्रिंटर चालू करणे : ‘बेसिक लेझर प्रिंटर’ १५ मिनिटांपेक्षा अधिक वेळ ‘स्डॅण्ड बाय मोड’वर असला, तरी त्यासाठी काही प्रमाणात वीज वापरली जाते. त्यामुळे प्रत (प्रिंट) काढायची असेल, तेव्हाच प्रिंटर चालू करावा. अन्य वेळी मुख्य कळ बंद ठेवावी. Multifunction प्रिंटर्सना, फोटो कॉपी मशिनना हे सूत्र लागू होत नाही; कारण या प्रकारच्या प्रिंटरची मुख्य कळ चालू-बंद करतांना त्यासाठी अधिक वीज वापरली जाते. ‘स्टॅन्ड बाय मोड’वर तुलनेत अल्प वीज खर्च होते. ज्या ठिकाणी मशीनचा वापर अल्प होत असेल, त्यांनी मुख्य कळ बंद करावी.
२ आ. प्रिंटरमधून वेगळा आवाज आल्यास तत्परतेने जाणकारांना विचारा ! : प्रिंटरच्या आतील भागामध्ये असलेल्या रोलरमध्ये (त्याद्वारे कागद प्रिंटरमधून पुढे ढकलला जातो) काही अडकले असल्यास त्यातून नेहमीपेक्षा वेगळा आवाज येतो. अशा वेळी त्याकडे दुर्लक्ष करून प्रिंटर तसाच वापरला, तर रोलर खराब होऊ शकतो. यामुळे दुरुस्तीसाठी वेळ आणि पैसे यांचा अपव्यय होऊ शकतो. प्रत काढतांना कोणताही वेगळा आवाज आल्यास प्रिंटर त्वरित बंद करून संबंधित जाणकारांना त्याविषयी विचारावे.
२ इ. ‘इंकजेट’ प्रिंटरचा वापर करणार्या साधकांनी लक्षात घ्यावयाची सूत्रे : ‘इंकजेट’ प्रिंटरची कार्टेज पुष्कळ महाग असते. काही कालावधीसाठी प्रिंटरचा वापर न झाल्यास ती वाळते आणि वाया जाते. या प्रिंटरवरून काढलेली प्रत लेझर प्रिंटरच्या तुलनेत महाग पडते. त्यामुळे अशा प्रकारच्या प्रिंटरचा वापर करणार्या साधकांनी ‘प्रिंटरच्या संदर्भात कोणती काळजी घ्यायला हवी ?’, हे संबंधित जाणकारांकडून जाणून घ्यावे.
३. ‘प्रिंटरचा वापर कसा करायचा ?’, हे शिकून घ्या !
‘प्रिंटरचा वापर कसा करायचा ?’ हे ज्या साधकांना ठाऊक नसेल, त्यांनी त्याविषयी जाणकार असलेल्यांकडून शिकून घ्यावे आणि त्यानंतरच तो वापरावा. आश्रमसेवक आणि उत्तरदायी साधक यांनी संबंधितांना प्रिंटर हाताळणीविषयीचे प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे आणि त्यानंतर प्रिंटर हाताळण्यास द्यावा. (१.३.२०२३)