दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वर्धापनदिनानिमित्त वाचकांचे वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !
१. श्री. श्यामराव साखळकर (निवृत्त शिक्षक), म्हापसा, गोवा.
१ अ. दैनिक ‘सनातन प्रभात’मधून केलेले विविध विषयांवरील मार्गदर्शन अन्य कुठल्याच दैनिकात नसणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’, हे माझे सर्वाधिक आवडते वृत्तपत्र आहे. यात प्रसिद्ध होणारे प्रत्येक सदर स्तुत्य आहे. यात वैयक्तिक, सामाजिक, राष्ट्रीय किंवा आध्यात्मिक मार्गदर्शन अशा प्रकारची सदरे असतात. या दैनिकाप्रमाणे मार्गदर्शन अन्य कुठल्याच दैनिकातून केले जात नाही. या दैनिकातून ज्याची चूक झाली असेल, ती दाखवून त्याला सुधारण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळत असते. मी सकाळी चातकाप्रमाणे हे दैनिक मिळण्याची वाट पहात असतो. ‘हे दैनिक सर्व जनतेपर्यंत आवर्जून पोचायला पाहिजे’, असे मला मनोमन वाटत असते.
१ आ. हे दैवी दैनिक म्हणजे ‘शिक्षणाचे भांडार’च आहे ! : या दैनिकातून शिकण्यासारख्या पुष्कळ गोष्टी आहेत. भूतकाळ, इतिहास, राष्ट्र आणि धर्म विघातक गोष्टी, आध्यात्मिक संशोधन हे सर्व सर्वांना समजेल, अशा सुलभ भाषेत मांडलेले असते. त्यामुळे व्यक्तीच्या ज्ञानात अजून भर पडते. ‘समाजाने संकटकाळी काय काळजी घेणे आवश्यक आहे ?’, याविषयीही यात माहिती दिली जाते. नवनवीन गोष्टी या दैनिकामुळे शिकायला मिळतात; म्हणून हे दैवी दैनिक म्हणजे ‘शिक्षणाचे भांडार’च आहे.
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे हिंदु राष्ट्राचे स्वप्न याच दैनिकामुळे साकार होईल ! : ‘हिंदु राष्ट्र’ ही संकल्पना केवळ दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे जनमानसात रूजली. हिंदु राष्ट्र या संकल्पनेची कुणी पूर्वी कल्पनाच केलेली नव्हती; परंतु परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी ही संकल्पना या दैनिकाच्या माध्यमातून जनमानसात रूजवली. आरंभीला ‘हिंदु राष्ट्र कसे येणार? हिंदु राष्ट्र येण्यासारखी सध्याची परिस्थिती आहे का?’, असे नानाविध प्रश्न मला पडायचे; पण आता ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी दैनिकाच्या माध्यमातून केलेल्या दिशादर्शनामुळे ‘हिंदु राष्ट्र येणार, हे त्रिवार सत्य आहे’, असे वाटायला लागले आहे आणि ‘हिंदु राष्ट्राविषयी परात्पर गुरु डॉक्टरांनी पाहिलेले स्वप्न हे दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातूनच साकार होणार आहे’, असे मला वाटते. ‘हिंदु राष्ट्र म्हणजे काय ? सात्त्विक आणि आध्यात्मिक विचार कसे जोपासावे ? हिंदु राष्ट्र का हवे ?’, या सर्व विचारांचा ऊहापोह दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून होतो. त्यामुळे परात्पर गुरु डॉक्टरांचे हे विचार समाजात शीघ्रतेने बिंबवण्याची नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ प्रत्येक हिंदूच्या घरी पोचणे आवश्यक आहे, तर आणि तरच परात्पर गुरु डॉक्टरांच्या हिंदु राष्ट्राची पहाट येण्यास वेळ लागणार नाही’, असे मला वाटते.’
२. श्री. नंदपाल तुकाराम मांद्रेकर, करासवाडा, म्हापसा, गोवा.
२ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार वाचून त्यांच्याविषयी प्रेम आणि भाव निर्माण होऊन अनुभूती येणे : ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे पुष्कळच छान दैनिक आहे. यातील प्रत्येक बातमी महत्त्वाची आहे. मी दैनिक हातात पडल्यावर प्रथम ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार’ वाचतो आणि मग अन्य सदरांचे वाचन करतो. त्यांचे विचार वाचून मला त्यांच्याविषयी अतीव प्रेम आणि भाव निर्माण झाला आहे. यांमुळे ते काही दिवसांपूर्वी माझ्या स्वप्नात आले. त्यांनी मला आपल्या शेजारी बसवले आणि काहीतरी सांगितले. त्याचा मला उलगडा झाला नाही खरा; पण ‘त्यांची माझ्यावर कृपादृष्टी आहे’, याची मला जाणीव झाली.
२ आ. प्रत्येक साधकाकडून काही ना काही शिकण्यासारखे असणे : दैनिकाच्या माध्यमातून लहान मुले, तरुण आणि वृद्ध यांच्या आध्यात्मिक पातळीची टक्केवारी प्रसिद्ध केली जाते. लहान मुलांच्या छान कविता वाचायला मिळतात. यावरून तुम्ही सनातनचे साधक पुष्कळ महान असल्याचे सिद्ध होते. त्यामानाने मी साधनेत फारच मागे आहे, हेही माझ्या लक्षात आले. तुमच्या प्रत्येक साधकाकडून काही ना काही शिकण्यासारखे अवश्य आहे.
२ इ. दैनिकातील महत्त्वाच्या बातम्या इतरांना कळाव्यात यासाठी त्यांचे कात्रण स्वतःच्या दुकानावर लावणे : दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध झालेल्या बातम्या पुष्कळच महत्त्वाच्या असतात. त्यांचे कात्रण काढून मी माझ्या दुकानावर लावतो. त्यामुळे इतर लोक त्यांचे वाचन करू शकतात. ‘जे ज्ञान मला मिळाले, ते इतरांना मिळो’, हीच माझी प्रांजळ इच्छा आणि साधना आहे’, असे मी समजतो. तुमच्या काही कृती (उपक्रम) असल्यास मला अवश्य कळवा. मी अवश्य सहभागी होईन.
२ ई. दैनिकामुळे रामनाथी आश्रमाचे दर्शन घेण्याची उत्कट इच्छा आणि तळमळ निर्माण होणे : दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचून मला ज्या ठिकाणी या महान दैनिकाचे काम चालते, त्या रामनाथी आश्रमाचे दर्शन घेण्याची उत्कट इच्छा आणि तळमळ निर्माण झाली आहे. ‘परात्पर गुरु डॉक्टर यांच्या कृपेने मला रामनाथी आश्रमाचे लवकर दर्शन होऊ दे’, अशी त्यांच्या चरणी प्रार्थना.’