हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्यांचा प्रयत्न हाणून पाडण्याची आवश्यकता ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड येथील १७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठांचा प्रांतीय अधिवेशनात सहभाग
सोलापूर, ९ एप्रिल (वार्ता.) – हिंदूंवरील वाढत्या आघातांच्या घटना पहाता हिंदु राष्ट्र संकल्पना असंविधानिक ठरवू पहाणार्यांचा प्रयत्न हाणून पाडण्यासाठी प्रांतीय हिंदु अधिवेशनाच्या माध्यमातून प्रयत्न करूया. यापुढे हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी प्रत्येक पाऊल टाकणे आवश्यक आहे. प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन हे हिंदु संघटनांच्या संघटनाचे व्यासपीठ आहे. त्यामुळे हिंदुत्वाच्या कार्याला गती देण्यासाठी या अधिवेशनाच्या माध्यमातून आपण संघटितपणे प्रयत्न करू, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, गुजरात आणि गोवा राज्य समन्वयक श्री. मनोज खाडये यांनी केले. ९ एप्रिल या दिवशी येथील टाकळीकर मंगल कार्यालय येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘प्रांतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त ते बोलत होते. अधिवेशनाच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला, तसेच सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये, पू. (कु.) दीपाली मतकर, पंचमुखी हनुमान मंदिराचे विश्वस्त आणि उद्योजक श्री. सत्यनारायण गुर्रम आणि श्री. मनोज खाडये यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या वेळी धर्माचार्य श्री बालयोगी महाराज, ह.भ.प. शाम जोशी महाराज, प्रज्ञापुरी धाम अक्कलकोट ट्रस्टचे आद्य संस्थापक अध्यक्ष श्री. प्रसाद प्रकाश पंडित (गुरुजी) ही उपस्थित होते. अधिवेशनाचा उद्देश समितीचे श्री. विक्रम घोडके यांनी मांडला. अधिवेशनाला सोलापूर, धाराशिव, लातूर, बीड येथील १७० हून अधिक हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
१. या वेळी ‘लव्ह जिहाद’, ‘हलाल जिहाद’, ‘वक्फ कायदा – हिंदुविरोधी षड्यंत्र’, ‘मंदिर संस्कृती रक्षण’ अशा विविध विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी गटचर्चेमध्ये हिंदूंच्या संघटनासाठी व्याख्यानांचे आयोजन, धर्मप्रेमींच्या बैठका, आंदोलन, धर्मशिक्षणवर्ग यांचे नियोजन करण्याचे ठरवले. तुळजापूर येथील पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष श्री. किशोर गंगणे यांनी श्री तुळजाभवानी मंदिरातील भ्रष्टाचाराविषयी दिलेला कायदेशीर लढा याविषयी माहिती दिली.
२. या वेळी दैनिक ‘दिव्य मराठी’चे उपसंपादक श्री. सिद्धराम पाटील म्हणाले, ‘‘संघटनामध्ये मोठी शक्ती आहे. जेव्हा जेव्हा हिंदु संघटित होते, तेव्हा त्यांचा विजयच झालेला आहे. त्यामुळे हिंदूंचे संघटन आवश्यक आहे. संघटित कार्य केल्यानेच वैयक्तिक आणि समाज यांची प्रगती होते.’’
केवळ हिंदूंच्या मंदिरात दर्शनासाठी शुल्क आकारले जाते ! – श्री. अजय साळुंखे, अध्यक्ष, जनहित संघटना, तुळजापूर
जगभरात अन्य कोणत्याही पंथामध्ये त्यांच्या धार्मिक स्थळाचे दर्शन घेण्यासाठी शुल्क आकारले जात नाही. केवळ हिंदूंच्या मंदिरात ‘सशुल्क दर्शन’, असे आहे. ‘दर्शनासाठी कोणतेही शुल्क आकारले जाऊ नये’, असा शासन निर्णय असूनही शुल्क आकारले जाते. देवतेच्या समोर आपण सर्वजण सारखेच आहोत. त्यामुळे असे प्रकार तात्काळ बंद व्हावेत यासाठी सर्वांनी संघटित प्रयत्न करूया.