आता राज्यातील भटक्या मांजरींची नसबंदी केली जाणार; शासनाने काढला आदेश !
मुंबई – भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांना पकडून नसबंदी करण्यात येत असते; मात्र आता राज्यातील मांजरांच्या वाढत्या संख्येवर नियंत्रण आणणे आणि भटक्या मांजरींचा उपद्रव अल्प करण्यासाठी मांजरींची नसबंदी अन् लसीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. याविषयी नगरविकास विभागाने शासन परिपत्रक काढले आहे. ज्यात स्थानिक स्वराज्य संस्था यांनी स्वतःहून किंवा एडब्लूबीआयद्वारे (AWBI) द्वारे मान्यताप्राप्त प्राणी कल्याण संस्थेद्वारे (ABC) कार्यक्रमासाठी भटक्या मांजरींचे जन्म नियंत्रण आणि लसीकरण योजना राबवण्याविषयी सूचना केल्या आहेत. भटक्या मांजरांचे निर्बीजीकरण, लसीकरण करणे इत्यादींविषयी सर्व नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांना निर्देश देण्याची गोष्ट शासनाच्या विचाराधीन होती. त्यानुसार भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात जसा नसबंदी कार्यक्रम राबवण्यात येतो, त्याच धर्तीवर भटक्या मांजरांसाठी नसबंदी आणि शस्त्रक्रिया कार्यक्रम राबवण्यासाठीचा निर्णय घेण्यात आला आहे.