‘सनातन प्रभात’ हे वृत्तपत्र नव्हे, तर शास्त्र किंबहुना शस्त्र आहे ! – प्राचार्य डॉ. मनोज कामत
दैनिक ‘सनातन प्रभात’चा द्वितपपूर्ती सोहळा उत्साहात साजरा !
मडगाव (गोवा), ९ एप्रिल (वार्ता.) – ‘सनातन प्रभात’चा द्वितपपूर्ती सोहळा हे शस्त्र आणि शास्त्र यांचे पूजन आहे. हे एक अग्निहोत्र, शस्त्र आणि शास्त्र यांसह असलेले भारतमातेच्या परंपरा, धर्म आणि राष्ट्र यांचे तेजस्वी प्रतीक आहे ! ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून एक दैवी आणि आध्यात्मिक शक्ती घरात प्रवेश करतांनाची अनुभूती प्रत्येक वाचकाला येते. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी प्रज्वलित केलेला हा नंदादीप आहे. सत्य, मंगल, भव्य आणि दिव्य असे हे दैनिक आहे, भगवान श्रीकृष्ण आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या दिव्यत्वाने भारलेले हे केवळ वृत्तपत्र नव्हे, शस्त्र आणि शास्त्र आहे. धर्मतेज आणि क्षात्रतेज या दोन्हीचे सार यात सामावलेले आहे, असे गौरवोद्गार एस्.एस्. धेंपो महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी काढले. ते येथील श्री बाबू नायक सभागृहात दैनिक ‘सनातन प्रभात’च्या ‘गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती’च्या २४ व्या म्हणजेच द्वितपपूर्ती वर्धापनदिन सोहळ्यात बोलत होते.
या वेळी व्यासपिठावर ‘सनातन प्रभात’चे प्रतिनिधी श्री. अरविंद पानसरे आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक श्री. सत्यविजय नाईक हे उपस्थित होते. या सोहळ्याच्या प्रारंभी शंखनाद करण्यात आला. व्यासपिठावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर ६० टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. दामोदर वझेगुरुजी यांनी वेदमंत्रपठण केले. ‘सनातन प्रभात’चे वाचक आणि अर्पणदाते श्री. विनायक भट यांच्या हस्ते मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यानंतर मान्यवर वक्त्यांच्या हस्ते दैनिकाच्या ‘द्वितपपूर्ती विशेषांका’चे प्रकाशन करण्यात आले झाले. यानंतर सौ. ज्योती पैंगीणकर यांनी द्वितपपूर्तीनिमित्त सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी दिलेल्या संदेशाचे वाचन केले.
समाजात हिंदुत्वाच्या दृष्टीने पूरक वातावरण निर्माण होण्यात ‘सनातन प्रभात’चा मोलाचा वाटा ! – सत्यविजय नाईक
‘सनातन प्रभात’चा जो ज्ञानसूर्य प्रतिदिन प्रकाशित होतो, त्याच्या किरणांमुळे हिंदु राष्ट्राची चळवळ तेजोमय होत आहे, तसेच अनेकांचे जीवनही उजळून निघत आहेत. ‘सनातन प्रभात’ने आरंभीपासूनच रामराज्याच्या अर्थात् हिंदु राष्ट्राच्या संदर्भात वैचारिक दिशा सुस्पष्ट केली आहे. ती आम्हा हिंदुत्वनिष्ठांसाठीही वेळोवेळी मार्गदर्शक ठरत आहे. स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळकांनी ‘केसरी’मधून अत्याचारी इंग्रज सरकारवर आसूड ओढले होते. हिंदु राष्ट्राच्या चळवळीत ‘सनातन प्रभात’ची भूमिकाही ‘केसरी’प्रमाणे म्हणजे एखाद्या सिंहाप्रमाणेच आहे. आज हिंदुत्वाच्या दृष्टीने जे पूरक वातावरण समाजामध्ये निर्माण झालेले दिसते, तसे होण्यामध्ये ‘सनातन प्रभात’चा वाटा आहे, हे नाकारून चालणार नाही.
हिंदु राष्ट्राच्या विचारांच्या ज्योतीचे मशालीत रूपांतर करायचे आहे ! – अरविंद पानसरे, ‘सनातन प्रभात’
सध्याच्या काळात राष्ट्रीय स्तरावरील वातावरण अत्यंत गढूळ असतांना सनातन प्रभात’ने प्रखर राष्ट्रप्रेमी भूमिका घेतलेली आहे. ‘खलिस्तानवादाच्या समस्येने पुन्हा उग्र रूप धारण करण्यापूर्वीच खलिस्तान्यांचा बीमोड करा’, अशी भूमिका वारंवार मांडली. धर्मांध ‘पी.एफ्. आय’वर बंदीची मागणी आणि वर्ष २०४७ पर्यंत भारताला ‘गजवा-ए-हिंद’ (भारताचे इस्लामीकरण करणे) करण्याच्या षड्यंत्राच्या विरोधात जागृती करणारे ‘सनातन प्रभात’ हे एकमेव दैनिक आहे. केवळ ‘वाचक संख्या जमवणे’ हा सनातन प्रभातचा उद्देश कधीच नव्हता. ‘कृतीशीलता’ हा ‘सनातन प्रभात’चा मापदंड आहे. आपल्या सर्वांना राष्ट्र आणि धर्महितैषी विचारांचा प्रसार करायचा आहे. ‘ज्योतसे ज्योत जगाते चलो’, याप्रमाणे आपल्याला हिंदु राष्ट्राच्या या ज्योतीचे मशालीत रूपांतर करायचे आहे.
विशेष उपस्थिती
• नावेली मतदारसंघाचे आमदार आणि कदंब महामंडळाचे अध्यक्ष श्री. उल्हास तुयेकर यांची या सोहळ्याला विशेष उपस्थिती लाभली.
६८ टक्के आध्यात्मिक पातळी असलेले हिंदु जनजागृती समितीचे डॉ. मनोज सोलंकी यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार तुयेकर यांचा सत्कार केला.
• सरकारी अधिवक्ता प्रमोद हेदे आणि कदंब महामंडळाचे निवृत्त अधिकारी किरण फळदेसाई हेही या वेळी उपस्थित होते.
दैनिक ‘सनातन प्रभात’चा द्वितपपूर्ती सोहळा पहा आणि इतरांनाही पहायला द्या –
दैनिक ‘सनातन प्रभात’ : द्वितपपूर्ती सोहळा https://t.co/GKtWhnh2Lg
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) April 9, 2023
विशेष सत्कार !
दैनिक ‘सनातन प्रभात’चे तळमळीने वितरण करणारे वितरक श्री. विजय गावकर आणि श्री. सत्यवान गावस यांचा प्राचार्य डॉ. मनोज कामत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
क्षणचित्र
१. डॉ. मनोज कामत यांनी दैनिकाच्या विशेषांकाच्या प्रकाशनापूर्वी ते छातीशी धरले. दैनिकाला भावपूर्ण नमस्कार करून त्याचे प्रकाशन केले.
२. ‘हरे राम हरे कृष्ण’ या संप्रदायाच्या विनोदकंवर ओझा या राधेच्या वेशभूषेत बाळकृष्णाची मूर्ती समवेत घेऊन या सोहळ्याला उपस्थित राहिल्या.