गोवा : अडीच मासांत समुद्रकिनारी भागात रात्री ध्वनीप्रदूषण होत असल्याच्या प्रतिदिन सरासरी १०० तक्रारी
पणजी, ८ एप्रिल (वार्ता.) – किनारी भागातील आस्थापनांकडून रात्री १० वाजल्यानंतर संगीत मोठ्या आवाजात वाजवले जात असल्याने त्रस्त झालेल्या नागरिकांनी जानेवारी ते मार्च मासाच्या मध्यापर्यंत पोलिसांना दूरभाषवरून दिवसाला सरासरी १०० तक्रारी केल्याचे समोर आले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपिठाने डिसेंबर २०२२ मध्ये संबंधित अधिकार्यांना कर्णकर्कश संगीताच्या संदर्भात दक्ष रहाण्याचे आदेश दिल्यानंतर सुमारे मासाभरात दूरभाषवरून या तक्रारी करण्यात आल्या आहेत.
#GoaDiary_Goa_News Nearly 7,000 calls regarding noise pollution received by police between January and mid-March this year https://t.co/LBoqnwO4BD
— Goa News (@omgoa_dot_com) April 7, 2023
राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार १ जानेवारी ते १३ मार्च या काळात विविध पोलीस ठाणी आणि आपत्कालीन क्रमांक यांवर मोठ्या आवाजात संगीत वाजवल्याच्या विरोधात स्थानिक नागरिक आणि स्वयंसेवी संस्था यांच्याकडून ६ सहस्र ७०० हून अधिक तक्रारी आल्या होत्या. एवढे असूनही पोलिसांनी या प्रकाराची गंभीर नोंद घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पेडणे आणि बार्देश तालुक्यांतील किनारी भागात मोठ्या आवाजातील संगीताच्या विरोधात छापून आलेल्या वृत्तांची नोंद घेऊन पोलिसांनी कोणतेच अन्वेषण केले नसल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सभागृहाला दिली आहे. कायद्याचे उल्लंघन करणार्या आस्थापनांच्या विरोधात कारवाई चालू असल्याचे त्यांनी सांगितले होते. (त्याचबरोबर तक्रारींची नोंद न घेणार्या पोलिसांवरही कारवाई व्हायला हवी ! – संपादक) रात्री १० वाजल्यानंतर खुल्या जागेत संगीत वाजवणे प्रथमदर्शनी अवैध असल्याचे मत व्यक्त करत ‘अशा प्रकारांवर आळा घालण्यासाठी अधिकार्यांनी कायदेशीर कारवाई करण्याची आवश्यकता आहे’, असे न्यायालयाने म्हटले आहे. गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून राज्यातील १२ ठिकाणी प्रत्यक्ष वेळेतील ध्वनीस्तर नोंदणी यंत्रणा बसवण्याची प्रक्रिया चालू करण्यात आली आहे. या यंत्रणेतील नोंदींची माहिती थेट मंडळाचे कार्यालय, पोलीस खाते आणि जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे पोचणार आहे.
संपादकीय भूमिकाएवढ्या मोठ्या प्रमाणात तक्रारी करूनही पोलीस आणि प्रशासन अडीच मासांत ध्वनीप्रदूषण रोखू न शकणे ही त्यांची अकार्यक्षमता म्हणायची ? हतबलता समजायची कि यात भ्रष्टाचार आहे, असे समजायचे ? |