दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये साधकांकडून होणार्या चुका दाखवून त्यांना परिपूर्ण सेवा करण्यासाठी घडवणारी गुरुमाऊली सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘४.४.२०२३ या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’ ने २५ व्या वर्षात पदार्पण केले. ‘सनातन प्रभात’ची प्रथम आवृत्ती असलेल्या ‘गोवा आणि सिंधुदुर्ग आवृत्ती’चा २४ वा वर्धापनदिन तिथीनुसार चैत्र कृष्ण तृतीया म्हणजेच ९.४.२०२३ या दिवशी साजरा होत आहे. त्या निमित्ताने खालील अनुभव आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे प्रसिद्ध करत आहोत.
खरेतर दैनिकासाठी पत्रकारिता क्षेत्रातील किंवा त्याविषयीचा अनुभव असणारी व्यक्ती आवश्यक आहे. कोणताही अनुभव नसतांना केवळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळेच मी दैनिकाविषयीच्या सेवा करत आहे. वर्धापनदिनाच्या निमित्ताने ‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि ‘ते साधकांना कसे घडवत आहेत ?’, याविषयीचे लिखाण कृतज्ञतापूर्वक देत आहे.
७ एपिल २०२३ या दिवशीच्या अंकात आपण लेखाचा काही भाग पाहिला. आज उर्वरित भाग पाहूया.
लेखाचा भाग १ वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/670743.html
६. ‘शुद्धलेखन, वाक्यरचना आणि मथळे’, यांविषयीचा अभ्यास करून चुका सुधारणे
प्रारंभी आमच्याकडून बुद्धीच्या स्तरावर प्रयत्न झाले. आम्ही ‘शुद्धलेखन कळण्यासाठी प्रत्येक शब्द योग्य आहे कि अयोग्य आहे ?’, हे पडताळणे चालू केले. आम्ही शब्दांची धारिका करून त्यात प्रत्येक वेळी शब्द बघू लागलो, तसेच ‘वाक्यरचना योग्य आहे ना ?’, हे पहाणे चालू झाले. ‘मथळे लहान आणि योग्य आहेत का ? त्यामध्ये लिखाणातील आशय आला आहे ना ?’, हे २ – २ वेळा पाहिले. अशा प्रकारे केलेल्या अभ्यासातून काही चुका न्यून झाल्या.
७. ‘परात्पर गुरुदेव आम्हाला परिपूर्ण करणारच !’, याची निश्चिती होणे
त्यानंतर परात्पर गुरुदेव पानांच्या रचनेच्या संदर्भातील चुका लक्षात आणून देऊ लागले. त्या नवीन चुका पाहून ‘परात्पर गुरुदेव आम्हाला परिपूर्ण करणारच !’, हे लक्षात येऊ लागले. बुद्धीने कितीही केले, तरी दुसर्या दिवशी परात्पर गुरुदेवांकडून दैनिक यायच्या वेळी थोडा ताण असायचाच. ‘आज नवीन काय आहे ?’, असा विचार मनात यायचा. प्रतिदिन नवीन चुका पहायला मिळायच्या. त्यानंतर मात्र मी मनाच्या स्तरावरील प्रयत्न वाढवले.
८. देवाने मनाच्या स्तरावर करवून घेतलेले प्रयत्न
८ अ. क्षमायाचना करणे आणि प्रायश्चित्त घेणे : मी चुकांसाठी प्रत्येक १५ मिनिटांनी क्षमायाचना करणे आणि प्रायश्चित्त घेणे चालू केले. सेवेला प्रारंभ करतांनाच मी क्षमायाचना करणे चालू केले. क्षमायाचना वाढत गेल्यानंतर मला मनातून हलके वाटत होते. मला शांतता अनुभवता येत होती. ‘परात्पर गुरुदेवांनी चुका दाखवल्यामुळे आपल्याला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा सत्संग मिळत आहे. यातून देवच आपल्याला सुधारत आहे’, याची जाणीव मला सातत्याने होत होती. सत्संग मिळाल्याने कृतज्ञता वाटून अनेक वेळा मी भावजागृती अनुभवली. दिवसभरात ५० पेक्षा अधिक वेळा क्षमायाचना केल्यानंतर माझ्या मनावर कोणताही ताण रहात नसे. क्षमायाचना करतांना गुरुदेवांनी मला एक कविता सुचवली. ती मी अनेक वेळा म्हणायचो. त्यामुळे माझ्या मनाला आनंद मिळायचा. या सर्व प्रक्रियेत मला एकदाही निराशा आली नाही, ही केवळ आणि केवळ गुरुदेवांची कृपाच !
८ आ. सकारात्मक विचार करता येणे : ‘स्वतःला सुधारण्यासाठी आणि झालेली हानी भरून काढण्यासाठी पुन्हा वेगाने प्रयत्न करूया’, असा विचार परात्पर गुरुदेवांनीच मला दिला. त्यामुळे माझे मन पुष्कळदा सकारात्मक राहिले. ‘प्रायश्चित्त या जन्मात भोगून होईल कि नाही, कुणास ठाऊक ?’, या विचारावर गुरुकृपेनेच ‘प्रायश्चित्तही भोगू’, असा सकारात्मक विचार माझ्या मनात यायचा. ज्या वेळी प्रायश्चित्त घेणे चालू झाले, त्या वेळी ‘डोक्यावरचे ओझे उतरत आहे’, असेही मला अनुभवता आले.
८ इ. शरणागतभावाने प्रार्थना होणे : चुका सुधारण्यासाठी माझ्याकडून प्रथम वरवरच्या प्रार्थना झाल्या. त्यानंतर मात्र परात्पर गुरुदेवांनीच माझ्याकडून भावपूर्ण प्रार्थना करून घेतल्या. त्या वेळी शरणागतभावाने प्रार्थना झाल्या. मी अनेक वेळा देवाला विचारून कृती करायचो. ‘देवाला शरण गेल्यानंतर देव क्षमा करतोच आणि नवीन उत्साहही देतो’, हेही मी अनुभवले.
८ ई. सूक्ष्मातून परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अनुसंधानात रहाणे : मी अनेक वेळा परात्पर गुरुदेवांचे स्मरण करायचो आणि त्यांच्या अनुसंधानात रहायचो. त्यामुळे माझे मन सकारात्मक राहिले. पडताळणी सूचीतील बरीच सूत्रे माझ्या अंगवळणी पडली आहेत, तरीही तिच्यातील सूत्रे मी पुन्हा तपासतो; जेणेकरून क्रियमाण चुकू नये. पडताळणी सूचीनुसार तपासून झाल्यानंतरही मी देवाला विचारतो, ‘काही राहिले नाही ना ? काही राहिले, तर दाखव.’ अनेक वेळा देवाने शेवटच्या क्षणी चुका दाखवल्या आणि त्या सुधारता आल्या.
८ उ. स्वभावदोषांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करणे : ‘आजचे शेवटचे दैनिक ‘सनातन प्रभात’ काढायचे आहे’, असा विचार ठेवून ‘एकही शब्द चुकवायचा नाही’, या दृष्टीने माझ्याकडून काळजीपूर्वक वाचन केले जायचे. ‘शब्द चुकू नयेत’, यासाठी मी संगणकावर शब्दांची धारिका उघडून ठेवत असे. मी व्याकरणाच्या धारिकांचेही अधूनमधून वाचन करायचो. या कालावधीत ‘निष्काळजीपणा आणि गृहीत धरणे’, या स्वभावदोषांचे प्रमाण वाढल्याने हे स्वभावदोष दूर करण्यासाठी मी सूचना देणे चालू केले. ‘गृहीत धरले की, मोठ्या चुका होणारच !’, हे लक्षात घेऊन मी प्रत्येक गोष्टीची निश्चिती करून घेऊ लागलो. आता अनेक चुका होत असतांनाच देवाच्या कृपेने त्या माझ्या लक्षात येतात. त्यामुळे त्या मला सुधारता येतात. परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मला ही स्थिती अनुभवता आली.
९. वरील प्रक्रियेमुळे स्वतःमध्ये झालेले पालट
९ अ. साधना म्हणून दैनिक ‘सनातन प्रभात’विषयीची सेवा करण्यासाठी प्रयत्न होणे : दैनिकातील चुका आता काही प्रमाणात न्यून झाल्या असल्या, तरी ‘प्रत्येक वेळी साधना म्हणून ही सेवा कशी करायला हवी ?’, याविषयीचे दृष्टीकोन मिळाल्याने दैनिकाशी संबंधित सेवा करणारा प्रत्येक साधक या मार्गातून आध्यात्मिक प्रगती करणार आहे’, हे माझ्या लक्षात येते. सेवा परिपूर्ण होण्यासाठी परात्पर गुरूंनी आम्हाला घडवले. त्यामुळे आता दैनिकात चैतन्य अनुभवता येते. ‘अचूक सेवा झाली की, चैतन्य वाढणारच !’, हेही मला अनुभवता आले.
९ आ. प्रक्रिया गांभीर्याने राबवली जाऊन त्यातील आनंद अनुभवता येणे : मी प्रतिदिन सेवा करतांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेविषयी लिखाण करायचो. पूर्वी स्वयंसूचनांची सत्रे करतांना त्यांत गांभीर्य नव्हते. आता मात्र ‘देव सूचनासत्रे करण्याची त्या त्या वेळी आठवण करून देतो आणि लिखाणही पूर्ण करून घेतो’, हे अनुभवता येते. लिखाण प्रतिदिन झाल्यामुळे त्याच त्याच चुका टाळता येऊ लागल्या. प्रायश्चित्त भोगण्यातील आनंदही अनुभवता येतो. तातडीच्या सेवेमध्ये थोडीफार स्थिरताही अनुभवता येते.
१०. कृतज्ञता
‘आम्हा साधकांचे अज्ञान दूर करून दैनिक ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून आमची साधना करून घेणारे परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता ! ‘हे गुरुदेवा, ‘आपण दिलेल्या या सेवेतून आमची आध्यात्मिक प्रगती करून घ्या’, अशी आपल्या श्री चरणी प्रार्थना !’
– श्री. संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.१.२०२३) (समाप्त)
क्षमा करा मजला गुरुदेवा ।‘२०.५.२०२१ या दिवसापासून परात्पर गुरु डॉ. आठवले दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये आम्हा साधकांकडून होत असलेल्या व्याकरण आणि शुद्धलेखन यांच्या चुका दाखवून देऊ लागले. परात्पर गुरु डॉक्टरांकडे क्षमायाचना करतांना स्फुरलेले काव्य पुढे दिले आहे. क्षमा करा मजला देवा । भावभक्तीचा हा खेळ चालला । षड्रिपूचा हा फंद जिवाला । म्हटले मी त्या टाळीन चुका । टीप १ – अहं टीप २ – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाच्या प्रक्रियेचा’ – श्री. संतोष गांधी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (६.१०.२०२१) |