गोवा शासनाची स्वयंपूर्ण गोव्याच्या दिशेने वाटचाल !
दैनिक ‘सनातन प्रभात’ने घेतलेला वेध !
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील गोवा शासनाने स्वयंपूर्ण गोवा करण्यासाठी अनेक पावले उचलली आहेत. सरकारने दळणवळण, पर्यटन, आरोग्य, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि आध्यात्मिक इत्यादी क्षेत्रांत विविध उपक्रम हाती घेतले आहेत. गोव्यात पायाभूत सुविधांच्या निर्मितीचे काम झपाट्याने होतांना दिसत आहे. त्यासमवेतच गोव्याचा सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा जपून ठेवण्यासाठी शासनाने उचित पावले उचलली आहेत. गोव्यातील सरकारी शाळांना स्वातंत्र्यसैनिकांची नावे देणे, प्राचीन मंदिरांचा जीर्णाेद्धार करणे, गोव्याची ओळख योगभूमी अशी होण्यासाठी प्रयत्न करणे, गोपालन आणि गोसंवर्धन यांवर भर, शेतभूमीचे संरक्षण, हरित ऊर्जा प्रकल्पांना उत्तेजन, पर्यावरणपूरक विकास इत्यादी स्तुत्य उपक्रम शासनाने हाती घेतल्याचे दिसून येते.
श्री. उमेश नाईक, उपसंपादक, दैनिक ‘सनातन प्रभात’
१. चौफेर विकासावर लक्ष केंद्रित !
मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ, झुवारी नदीवरील ८ पदरी नवीन पूल, धारगळ येथील अखिल भारतीय आयुर्वेद संस्था आणि आयुर्वेद महाविद्यालय, जुने गोवे येथे स्थापन केलेले कृषी महाविद्यालय, पणजीतील मळा आणि सरकारी मध्यवर्ती वाचनालय यांना जोडणारा ‘ज्ञान सेतू’ हा पादचार्यांसाठी उभारलेला पूल, सांखळी येथे उभारण्यात आलेला हरित शाळा प्रकल्प, डिचोली येथील छत्रपती शिवाजी महाराज शाळा संकुल, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या धर्तीवर गोव्यातील लोकांच्या अडचणी समजून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढण्याच्या दृष्टीने गोवा सरकारचा ‘गोवा की बात’ या शीर्षकाखाली ‘सरकार तुमच्या दारी’ हा कार्यक्रम, गोव्यात होऊ घातलेले महामार्ग आणि द्रूतगती मार्ग (एक्सप्रेस वे) इत्यादी प्रकल्पांमुळे गोव्याचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर नक्कीच पोचले आहे. हा विकास साधला जात असतांना ‘गोव्याची मूळ ओळख पुसली जात नाही ना’, याकडे लक्ष देणे तेवढेच आवश्यक आहे. गोव्याचे स्वच्छ सुंदर समुद्रकिनारे, जैवविविधता, सर्वत्र दिसणारी हिरवळ, शेती, सर्वत्र वहाणार्या नद्या, तलाव आणि झरे लोप पावत नाही ना ? याकडे बारीक लक्ष ठेवणे आवश्यक वाटते.
२. पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेली प्राचीन मंदिरे आणि स्मारके यांचा जीर्णाेद्धार !
गोवा शासनाने पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी गेल्या वर्षीच्या आणि या वर्षीच्या अर्थसंकल्पात २० कोटी रुपयांचे प्रावधान (तरतूद) केले. या योजनेच्या अंतर्गत अनेक मंदिरांच्या जीर्णाेद्धाराचे काम सरकारने हाती घेतले आहे. गोवा गोव्याच्या प्राचीन वैभवशाली परंपरेविषयी आजची युवा पिढी अनभिज्ञ आहे. त्यामुळे गोव्याचा इतिहास युवा पिढीला ज्ञात असणे आवश्यक आहे. तसे झाल्यास ही युवा पिढी आपला वैभवशाली इतिहास पुनर्जीवित करण्यासाठी आणि त्याच्या रक्षणासाठी नक्कीच हातभार लावेल. त्या दृष्टीने गोव्याचा मूळ इतिहास शाळांच्या पाठ्यक्रमात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
३. गोमंतभूमीची खरी ओळख वृद्धींगत करणारे उपक्रम !
मुख्यमंत्र्यांनी हल्लीच मांडलेल्या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री पशूसेवा योजना, मुख्यमंत्री गोसंवर्धन योजना, मुख्यमंत्री कामधेनू योजना, मुख्यमंत्री गोधन, गोमूत्र आणि गोमय योजना इत्यादी योजना घोषित केल्या आहेत. गोमातेची सेवा करण्याचा शासनाचा हा एक स्तुत्य उपक्रम असून यातून गोव्याची समृद्ध परंपरा वृद्धींगत करण्याचे श्रेय नक्कीच मुख्यमंत्र्यांना जाते.
गोव्यातील शेतकरी समुदायाला गोवंशपालन आणि गोसंवर्धन करण्याच्या या पारंपरिक उद्योगाकडे सध्या उपलब्ध असलेल्या अत्याधुनिक पद्धतींचा वापर करून कसे वळवता येऊ शकते ? यावर विचार शासन नक्कीच करेल, अशी आशा आहे. गोवा हा एक शेतीप्रधान प्रदेश आहे. येथील शेतकरी गुरे पाळत असत. गोव्यात कार्तिक शुक्ल प्रतिपदा म्हणजेच पाडव्याला गुरांची पूजा करण्याची परंपरा आहे. जिथे गोपालन होते, तिथे समृद्धी असते, हे ध्यानात ठेवून लोकांना गोमातेचे महत्त्व सांगण्यासाठी लोकशिक्षण देण्याचाही विचार शासनाने अवश्य केला पाहिजे. त्यामुळे शासकीय योजनांची कार्यवाही योग्य प्रकारे होऊ शकते.
४. गोवा शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करणे
गोवा शैक्षणिक केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी शासनाने पावले उचलली आहेत. या अंतर्गत गोव्यात आयआयटी, एन्.आय.टी., नवीन वैद्यकीय महाविद्यालये यांसारख्या उच्च शिक्षणाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांच्यासाठी सरकारने ‘शिक्षा पे चर्चा’, ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी कार्यक्रम राबवले आहेत. शासनाने शिक्षकांसाठी मुख्यमंत्री गुरुदक्षिणा योजना, मुख्यमंत्री वशिष्ठ गुरु पुरस्कार घोषित केले आहेत.
५. गोव्याची संस्कृती आणि निसर्गसंपदा यांचे संवर्धन अन् संगोपन आवश्यक !
या सर्व विकासकामांचा उपभोग घेणारा घटक विशेष करून आपली तरुणपिढी, विद्यार्थी, शिक्षक, कर्मचारी, शेतकरी वर्ग, पर्यटक आणि इतर सर्व नागरिक यांना याविषयी शिक्षित करणे तेवढेच महत्त्वाचे आहे. या घटकाला त्यांच्या हक्कांबरोबरच कर्तव्याची जाणीव करून देणे महत्त्वाचे ठरते. गोव्याची संस्कृती आणि निसर्गसंपदा यांचे संवर्धन अन् संगोपन यांचे दायित्व सर्वांचे आहे, याची जाणीव लोकशिक्षणाच्या माध्यमातून सर्वांना करून देणे क्रमप्राप्त ठरते. आपल्या राज्याचा राज्यकारभार पुढे नेत असतांना समाजव्यवस्था उत्तम राखणे, प्रत्येकाचा ऐहिक आणि परलौकिक विकास साधणे, या दृष्टीने प्रयत्न होतात का ? यावर राज्यकर्त्यांनी लक्ष देणे योग्य ठरेल. त्यासाठी शाळा महाविद्यालयामध्ये नैतिक मूल्यांचे शिक्षण देणे, धर्माचरण आणि धर्मशिक्षण यांचे महत्त्व पटवून देणे तेवढेच महत्त्वाचे आहे.
नार्वे येथील सप्तकोटीश्वर मंदिराचा जीर्णोद्धारनार्वे येथील कदंबकालीन श्री सप्तकोटीश्वर मंदिराचा जीर्णाेद्धार छत्रपती शिवाजी महाराजांनी सुमारे ३५० वर्षांपूर्वी सर्वप्रथम केला होता. त्यानंतर आता डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील शासनाने या मंदिराचा जीर्णाेद्धार आणि लोकार्पण करून आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे. याविषयी मुख्यमंत्र्यांचे सर्वत्र कौतुकही झाले आहे. अशाच प्रकारे सरकारने पोर्तुगिजांसह इतर आक्रमकांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे आणि इतर स्मारके यांची पुनर्बांधणी करावी, ही अपेक्षा ! तसेच या आक्रमणकर्त्यांनी येथील लोकांवर केलेल्या अत्याचाराचा इतिहासही लोकांसमोर आणणे उचित ठरेल. |