दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या कार्याचे आधारस्तंभ असलेले मोहन बेडेकर यांचे देहावसान !
रत्नागिरी, ८ एप्रिल (वार्ता.) – येथील सनातनचे साधक मोहन केशव बेडेकर (वय ६७ वर्षे) यांचे ८ एप्रिल या दिवशी सकाळी ११.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने देहावसान झाले. मोहन बेडेकर हे प्रथम श्रेणी वन अधिकारी म्हणून निवृत्त झाले होते.
बेडेकर सनातनच्या मार्गदर्शनानुसार वर्ष १९९६ पासून साधना करत होते. सनातनचे कार्य जाणून त्यांनी स्वत:हून त्यांच्या रहात्या वास्तूचा काही भाग सनातनच्या कार्यासाठी दिला. त्यांच्या वास्तूतून रत्नागिरीतील दैनिक ‘सनातन प्रभात’चे कार्य चालू झाले. २८ नोव्हेंबर १९९९ या दिवसापासून त्यांच्या वास्तूत दैनिक ‘सनातन प्रभात’ रत्नागिरी आवृत्तीचे कार्य चालू झाले, ते आजही अव्याहतपणे चालू आहे. त्यांनी ‘सनातन प्रभात’च्या कार्यासाठी केवळ वास्तूच दिली असे नाही, तर दैनिकाचे ‘बटर पेपर’ काढणे, वितरण सूची करणे, या सेवांसह नियतकालिकांच्या अन्य सेवांतही त्यांचा नियमित सहभाग होता. देहावसानाच्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत त्यांनी या सेवा केल्या, हे विशेष ! एका अर्थाने ते दैनिक ‘सनातन प्रभात’च्या रत्नागिरी आवृत्तीच्या कार्याचे आधारस्तंभ होते.
‘सनातन प्रभात’सह रत्नागिरी जिल्ह्यात चालणार्या अन्य विविध धर्मकार्यातही ते त्यांच्या कुटुंबियांसह हिरीरीने सहभागी होत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी आणि जावई असा परिवार आहे. सनातन परिवार बेडेकर कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.