अनधिकृत आधुनिक वैद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी ! – सातारा जिल्हाधिकारी

सातारा, ८ एप्रिल (वार्ता.) – अनधिकृत आधुनिक वैद्यांना शोधण्यासाठी तालुकास्तरावर समित्या स्थापन केल्या आहेत. या समित्यांनी पोलीसदलाच्या साहाय्याने जिल्ह्यातील अनधिकृत आधुनिक वैद्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात अनधिकृत आधुनिक वैद्यकीय व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठीच्या समितीची जिल्हास्तरीय बैठक जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या वेळी ते बोलत होते.

जिल्हाधिकारी जयवंशी पुढे म्हणाले की, अनधिकृत आधुनिक वैद्यांनी अनेकदा चुकीचे उपचार रुग्णावर केल्यामुळे रुग्णाच्या शरिरावर विपरित परिणाम होतात. काही वेळा रुग्णाचा मृत्यू होण्याचीही शक्यता असते. तालुका स्तरावरील समित्यांनी आणि पोलीस प्रशासनाने अधिक सक्षमपणे काम करून अनधिकृत आधुनिक वैद्य शोधावेत, तसेच नागरिकांनीही आपल्या परिसरात अनधिकृत आधुनिक वैद्यकीय व्यवसाय कुणी करत असल्यास संबंधित पोलीस ठाण्यामध्ये किंवा तालुका आरोग्य अधिकारी यांना कळवावे. (असे निर्देश का द्यावे लागतात ? – संपादक)