साधकांवर विश्वास ठेवून त्यांना गुरुसेवेच्या संधी उपलब्ध करून देऊन घडवणार्या सद्गुरु स्वाती खाडये !
१. सद्गुरु स्वाती खाडये यांनी साधकाला सोलापूर येथे सेवेसाठी बोलावणे आणि त्यांनी दाखवलेल्या विश्वासामुळे साधकाला पुष्कळ कृतज्ञता वाटणे
‘२७.१०.२०२२ या दिवशी रात्री मी नारायणगाव येथे काही कामानिमित्त गेलो होतो. तेव्हा एका साधिकेने मला भ्रमणभाष करून विचारले, ‘‘तुम्ही उद्या सोलापूर येथे सेवेसाठी जाऊ शकता का ?’, असे सद्गुरु स्वाती खाडये यांनी विचारले आहे.’’ तेव्हा ‘माझी काहीच पात्रता नसतांना सद्गुरु स्वातीताईंनी मला सेवेसाठी बोलावले’, याबद्दल मला पुष्कळ कृतज्ञता वाटली. मी कामाच्या ठिकाणी असलेल्या माझ्या सहकार्यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी माझ्या कामाचे दायित्व घेतले.
२. मी सद्गुरु स्वातीताईंना ‘सोलापूर येथे सेवेसाठी येत आहे’, असे कळवले. त्या वेळी सद्गुरु स्वातीताईंनी माझी विचारपूस केली आणि माझे येण्याचे नियोजन विचारले. तेव्हा ‘सद्गुरु ताई सूक्ष्मातून आशीर्वाद देत आहेत’, असे मला वाटत होते.
३. बस कर्मचार्यांचा संप असतांना सोलापूर येथे जाण्यासाठी सुटलेली एकमेव बस मिळणे
मी नारायणगाव येथून दुचाकीने निघून रात्री उशिरा पुणे येथे पोचलो. त्या वेळी मला कसलीही भीती वाटली नाही. माझ्या मनात ‘सद्गुरु ताईंचे बोलणे, त्यांनी सेवेसाठी माझ्यावर दाखवलेला विश्वास’ याविषयीच विचार होते. कुटुंबियांनी मला सोलापूर येथे जाण्यासाठी सिद्धता करण्यास साहाय्य केले. थोडा वेळ विश्रांती घेऊन मी सकाळी लवकर बसस्थानकात गेलो. त्या दिवशी बस कर्मचार्यांचा संप असूनही सद्गुरु स्वातीताईंच्या संकल्पामुळे मला सोलापूर येथे जाण्यासाठी सुटलेली एकमेव बस मिळाली.
४. सद्गुरु स्वाती खाडये यांनी पू. दीपाली मतकर यांच्या संत सन्मान सोहळ्याच्या सेवेसाठी बोलावल्यामुळे पुष्कळ भाव आणि आनंद अनुभवता येणे
या प्रवासात मी सतत सद्गुरु स्वातीताईंचे स्मरण केले. मी सोलापूर येथे पोचल्यावर मला प्रवासाचा कोणताही शीण न जाणवता उत्साहाने सेवा करता आली. मला ‘आज कुणाचा तरी सत्कार आहे’, असे वाटले. प्रत्यक्षातही त्या सोहळ्यात कु. दीपाली मतकर यांना संत घोषित केले. तो सोहळा पहातांना माझी पुष्कळ भावजागृती होऊन कृतज्ञता व्यक्त झाली. सद्गुरु स्वातीताईंच्या कृपेने मला पुष्कळ आनंद अनुभवता आला.
५. कृतज्ञता
सद्गुरु स्वातीताईंचा साधकांवर असलेला विश्वास आणि प्रीती मला अनुभवता आली. सद्गुरु स्वातीताईंच्या कृपेला मी पात्र नाही, तरीही या लहानशा जिवाला त्यांनी आनंद दिला. ‘सद्गुरु स्वातीताईंनी मला घडण्याची मोठी संधी दिली’, असे वाटून मला त्यांच्या प्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली. ‘प.पू. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्ही मला सद्गुरु स्वातीताईंचे चैतन्य आणि प्रीती अनुभवण्याची अनमोल संधी दिली’, त्याबद्दल मी तुमच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– चरणसेवक,
श्री. केतन पाटील, पुणे (६.३.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |