‘फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर’ बसवण्याची आवश्यकता !

सोलापूर – माळढोक पक्षी अभयारण्य परिक्षेत्रातील वीजवाहक तारांवर पक्ष्यांना परतवून लावणारे ‘फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर’ उपकरण बसवण्यासह अभयारण्यातून गेलेल्या वीजवाहक तारा भूमीच्या खालून नेण्याचा प्रस्ताव मागील २ वर्षांपासून प्रलंबितच आहे. मागील १० मासांपासून अभयारण्य परिसरात मादी माळढोकचा वावर आहे. भविष्यात तारांना धडकून पक्षी घायाळ होण्याच्या दुर्घटना टाळण्यासाठी ‘डायव्हर्टर’ बसवण्याची आवश्यकता आहे. माळढोक पक्ष्यांच्या घटत्या संख्येविषयी राष्ट्रीय हरित लवादाकडे प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी करतांना लवादाने माळढोक पक्ष्यांचे अस्तित्व असणार्‍या राज्यांत ऊर्जा प्रकल्पांचे नूतनीकरण करतांना ‘सर्व वीजवाहिन्या भूमीगत असाव्यात’, असे निर्देश राष्ट्रीय हरित लवादाने दिले आहेत.

‘फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर’ हे यंत्र काय काम करते ?

माळढोक पक्ष्यांच्या अधिवासातून जाणार्‍या विजेच्या तारांना ‘फायरफ्लाय बर्ड डायव्हर्टर’ हे यंत्र लावल्यास पक्षी विजेच्या तारांना धडकण्यापासून वाचू शकतात. विद्युत्वाहक तारांना लावलेल्या या यंत्रामुळे पक्षी सुमारे ५० मीटर अंतरावरून उड्डाणमार्ग पालटू शकतात.