गोव्याच्या समृद्ध जैवसंपदेचे संवर्धन करणे आवश्यक !
‘नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेली गोव्याची भूमी जैविक संपदेची श्रीमंती अनुभवत आहे. पश्चिम घाट आणि किनारपट्टीच्या कुशीत वसलेल्या गोव्याची सीमा एका बाजूने महाराष्ट्र आणि दुसर्या बाजूने कर्नाटक यांच्याशी संलग्न आहे. एकेकाळी सागर आणि नदीनाल्यांद्वारे गोव्यातून देश-विदेशात जाण्यासाठी जलमार्ग अस्तित्वात असल्याने शेकडो वर्षांपासून ही भूमी आकर्षण बिंदू ठरली होती. पाश्चिमात्यांची भारतातील पहिली वसाहत पोर्तुगिजांनी गोव्यातील तिसवाडी, बार्देश आणि सासष्टी महालातील जुन्या काबिजादीत उभारली. व्यापारी म्हणून आलेले पोर्तुगीज अल्पावधीत इथले सत्ताधीश झाले आणि इथल्या धार्मिक, सांस्कृतिक अन् सामाजिक संचितांना नष्ट करण्याचे प्रयत्न केले. जुन्या काबिजादीतील तिसवाडी महालातील दीपवती म्हणजे दिवाडी बेटाची, त्याचप्रमाणे परिसराची ‘कोकण काशी’ म्हणून असलेल्या चेहर्याला पूर्वेकडील रोमचे वैभव देण्याचा प्रयत्न केला. गोव्यातील स्थानिक जनतेचे ख्रिस्तीकरण व्हावे; म्हणून प्रयत्न करणार्या पोर्तुगिजांनी त्यांच्या सत्ताकाळात इथल्या जैविक संपदेचा वारसा समृद्ध करण्याचा मात्र प्रयत्न केला. आसामहून शेकडो वर्षांपूर्वी आलेल्या आंब्याच्या विविध प्रजाती त्यांनी विकसित करण्यात योगदान दिले.
१. गोव्यात जैविक संपदेच्या श्रीमंतीची येत असलेली प्रचीती !
गोव्यातील आंब्यात अधिकाधिक रूचकरपणा, पौष्टिकता, माधुर्य प्राप्त व्हावे; म्हणून पोर्तुगिजांनी आरंभलेल्या प्रयत्नांना यश लाभले. इथल्या ‘मानकुराद’ आंब्याचा लौकिक केवळ गोव्यात आणि देशातच नव्हे, तर विदेशातही पोचला. गोव्यातील ‘अल्फान्सो’ आंब्याला महाराष्ट्रातील आंबा बागायतदारांनी देवगड, रत्नागिरी, वेंगुर्ला येथील हापूसमध्ये रूपांतरित केलेले आहे. चोडण बेटावरच्या बागायतदारांनी मानकुराद आंब्याच्या मूलभूत गुणधर्मांना जतन करण्याचे प्रयत्न केल्याने आज तेथील आंब्यांना विशेष मागणी लाभलेली आहे. ब्राझील देशातून आलेल्या काजूच्या लागवडीमुळे गोव्यामध्ये दर्जेदार काजूगरांची निर्मिती करण्यासह हुर्राक (काजूच्या रसापासून बनवण्यात येणारे एक पेय), फेणी यांसारख्या मद्यांची निर्मिती शक्य झालेली आहे. त्यामुळे काजू बागायती ही उपजीविकेचे महत्त्वपूर्ण साधन ठरलेले आहे. सीताफळ, रामफळ, अननस अशा नावांनी ओळखली जाणारी फळे ही अमेरिका खंडातून आली आणि इथल्या लोकमानसाला भावली. आज आपल्या मातीशी एकरूप झालेली तांबडी भाजी (लाल माठ), कुरूडू यांसारख्या भाज्या या अमेरिकेहून आलेल्या असून इथल्या लोकजीवनात त्यांना स्थान लाभलेले आहे.
प्रशांत महासागराद्वारे गोव्यात आलेला नारळ येथील लोकमानसाला इतका प्रिय झाला आहे की, आज बाणावली आणि कळंगुट प्रजातींच्या नारळांच्या खोबर्याने अन् तेलाने अन्नाला चव प्रदान केलेली आहे. खोचरी, दामगो, वेलो, वाबरी, शिट्टो अशा भातांच्या प्रजातींनी इथल्या जनतेला तंतुमय अन्नाचा चवदार घास भरवण्याची कामगिरी केलेली आहे. सत्तरी, सांगे, केपे, काणकोण यांसारख्या सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेल्या गावांतील कष्टकर्यांनी काटेकणगी, कारांदे, चिनी, नागरचिनी, माडी, अळू, सुरण अशा कंदपिकांच्या (कंदमुळांच्या) वैविध्यपूर्ण वारशाचे जतन केलेले आहे. पोर्तुगीज राजवटीत जंगलनिवासी वेळीप आणि गावकर यांनी सांगे अन् काणकोण येथून स्थलांतर करून उत्तर कन्नड जिल्ह्यातील जोयडा आणि अन्य परिसरात वास्तव्य केलेले आहे. आजही त्यांच्याकडे हेमंत ऋतूत कंदवर्गातील पिकांच्या वैविध्यपूर्ण वारशाचे दर्शन घडते, तेव्हा जैविक संपदेच्या श्रीमंतीची प्रचीती येते.
२. विदेशी पिकांच्या लागवडीमुळे प्रादेशिक जैविक संपदेच्या घटकांवर दुष्परिणाम !
गोव्याच्या कुळागरातील मिरी, जायफळ, वेलची अशा मसाल्यांच्या पिकांनी येथील कष्टकर्यांच्या मेहनतीचे चीज केलेले आहे. एकेकाळी मिरचीऐवजी गोव्यातील आमटीत मिरीचा वापर केला जायचा; परंतु लॅटिन अमेरिकेतून जेव्हा मिरची गोव्यात पोचली, तेव्हा तिला येथील मातीची आगळी चव लाभली. काणकोणातील खोलाची, बार्देशातील हळदोणची, पेडणेतील हरमलची, वुत्या आणि त्याचप्रमाणे धनगरी मिरचीच्या प्रजातींनी मिरची लागवड समृद्ध केली. पर्राची कलिंगडे, ताळगाव आणि आगाशी येथील वांगी, सांत इस्तेव्हची सात शिर्यांची भेंडी, मेणकुरेचे अळसांदे आदी पिकांनी गोव्यातील मातीचा गंध जतन केलेला आहे. सेंद्रिय खतांद्वारे हा जैवविविधतेचा वारसा कसा जतन होईल ? यासाठी खरेतर कृषी खाते आणि ‘गोवा राज्य जैवविविधता मंडळ’ यांनी संयुक्तपणे प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. गोव्याच्या भूमीचा हा वैविध्यपूर्ण वारसा उन्नत केला, तर येथील शेतकर्यांचा आर्थिक स्तर निश्चितपणे वृद्धींगत होण्यास साहाय्य होईल. गोव्यात माड, भेरली माड, शिंदी या वृक्षांपासून गूळ आणि साखर यांची निर्मिती करण्याची परंपरा होती. फोंड्याजवळचे उसगाव, पेडणे तालुक्यातील चोपडे येथे निर्माण होणार्या माडाच्या गुळाला विशेष मागणी असायची. आज गूळ आणि साखर यांच्या निर्मितीसाठी उसाचा वापर केला जातो. जेथे नाचणी, कुळीथ, उडिद, कांजो, राळो, तूर यांसारखी पिके काढली जायची, त्याजागी उसासारख्या नगदी पिकाला प्राधान्य देण्यात आलेले आहे. उसाच्या लागवडीपायी येथील पारंपरिक पिकांच्या प्रजातींवर जसे संकट आलेले आहे, तसेच भूमीची सुपिकता झपाट्याने नष्ट होत चालली आहे. स्थानिक पिकांच्या प्रजातींच्या वाणांचे रक्षण करण्याऐवजी गोव्यात विदेशी पिकांच्या लागवडीला महत्त्व दिले जात असल्याने एकसुरी अननस, रबर, गोदरेज पाम, अशा लागवडीने प्रादेशिक जैविक संपदेच्या घटकांवर दुष्परिणाम केलेले आहेत.
३. जंगली श्वापदे मानवी वस्तीत येण्यामागील कारण आणि त्यांची शिकार होणे हे चिंताजनक !
जंगली श्वापदांपैकी गवेरेडे, रानडुक्कर, पिसय, भेकरे, मेरू यांसारख्या प्राण्यांना स्वतःचे खाद्य जंगलात मिळणे दुरापास्त ठरल्याने त्यांनी स्वतःचा मोर्चा अननस, ट्रॉपिकाना यांसारख्या लागवडीकडे वळवलेला आहे. हुर्राक, फेणी यांसाठी बोंडूचा रस काढल्यानंतर उर्वरित भाग बागायतीत फेकला जातो. त्यामुळे हे निरस बोंडू खाण्यासाठी उंदीर आणि त्यांना खाण्यासाठी धामण (सापाची एक जात) अन् धामण सापावर गुजराण करणारा अतीविषारी असा भुजंग यांचे काजू बागायतीत आणि लोकवस्तीमध्ये येण्याचे प्रमाण हे ग्रीष्मात लक्षणीय झालेले आहे. बारमाही पाण्याची उपलब्धता आणि सदाहरित जंगलात वास्तव्य करणारा भुजंगासारखा विषारी साप हा लोकवस्तीकडे वळू लागलेला आहे. रानात तृणहारी जंगली प्राण्यांची शिकार करणे दुरापास्त झाल्याने आणि भटके कुत्रे अन् गुरे लोकवस्तीच्या जवळ सहज मिळणे शक्य झाल्याने बिबट्यासारखा प्राणी तेथे आढळू लागला आहे. मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्ष यामुळे टोकाला जाऊन गावभर बिबटा, गवेरेडे, रानडुक्कर यांना ‘उपद्रवकारी प्राणी’ घोषित केले आहे. त्यामुळे त्यांना ठार मारण्याची अनुमती देण्याची मागणी वाढू लागली आहे. जंगली श्वापदांची शिकार करण्याचे प्रमाण गोव्यासारख्या राज्यात वाढत आहे. गोव्यातील काही उपाहारगृहांमध्ये जंगली श्वापदांच्या मांसाची उपलब्धता होत आहे, ही चिंतेची गोष्ट आहे.
४. जंगली श्वापदांच्या नैसर्गिक अधिवासाच्या रक्षणासाठी उपाययोजनांकडे दुर्लक्ष !
३ सहस्र ७०२ चौ.कि.मी. (चौरस किलोमीटर) क्षेत्रफळातल्या गोव्यामध्ये १ सहस्र २२४ चौ.कि.मी. मधील वनक्षेत्र कायदेशीररित्या संरक्षित असले, तरी सदाहरित जंगलाचे क्षेत्र आज झपाट्याने न्यून होत चालले आहे. गावोगावी देवराईची असलेली समृद्ध परंपरा इतिहासजमा होण्याच्या मार्गावर असून ‘अकेशिया मॅजिनियम’, ‘अकेशिया ओरिकुलस’, ‘युकेलिप्टस’ यांसारख्या विदेशी वृक्षारोपणाने, त्याचप्रमाणे माड, पोफळी, काजू आणि अन्य नगदी पिके देणार्या वृक्षवनस्पतींनी हिरवाईचे आच्छादन गोवाभर लक्षणीय दिसत आहे; परंतु त्यामुळे जंगली श्वापदांच्या नैसर्गिक अधिवासावर संकटांची मालिका चालू झालेली आहे. त्यामुळे अननस, काजू, भात, केळी यांसारख्या पिकांवर ही जनावरे यथेच्छ ताव मारू लागलेली आहेत.
गोव्यात ६ अभयारण्ये आणि एक राष्ट्रीय उद्यान यांची निर्मिती झालेली असली, तरी आदिवासी अन् जंगलनिवासी आणि वन खाते यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. परिणामी त्यात जंगली श्वापदांचे हत्या होण्याचे प्रमाण लक्षणीय आहे. ‘गोव्यात पट्टेरी वाघ नाही’, याविषयी राजकारण्यांच्या सुरात सूर मिसळून वन खात्याचे वरिष्ठ कंठशोष करत असतांना गेल्या वर्षी सत्तरीमधील गोळावलीत ४ वाघांवर विषप्रयोग करून त्यांची हत्या केली गेली. त्यानंतरही वाघांचा अधिवास आणि अस्तित्व यांचे रक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याकडे कानाडोळा केला जातो. ही लक्षणे काय सांगतात ?
५. पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्राच्या रक्षणासाठी नियोजनबद्ध मोहीम आखणे महत्त्वाचे !
आगामी कालखंडात या मानसिकतेमध्ये जर पालट झाला नाही आणि समाज अन् सरकार यांनी संयुक्तरित्या जैविक संपदा, जंगल आणि जलस्रोत यांच्यातील संबंध ओळखून, संवर्धन अन् संरक्षण याची नियोजनबद्ध मोहीम आखली नाही, तर अंतर्गत दुष्परिणामांना सामोरे जाण्याची पाळी आपल्यावर येणार आहे. पश्चिम घाट आणि किनारपट्टीवरच्या पर्यावरणीय संवेदनक्षम क्षेत्राचे रक्षण गोव्याच्या अस्तित्वाला पूरक आहे. तापमानवाढ आणि समुद्राच्या पाण्याच्या पातळीत होणार्या वृद्धीमुळे येथील किनारपट्टीवरच्या प्रदेशात आमूलाग्र पालट होणार आहेत. त्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी आम्ही कूर्मगतीने कार्यरत आहोत. मोरजी, केरी, गालजीबाग, तळपण, आगोंद आदी ठिकाणांवर असलेला ‘ऑलिव्ह’ आणि ‘रिडली’ कासवांचा अधिवास सुरक्षित ठेवण्यात किनार्यावरची अतिक्रमणे आणि हस्तक्षेप हे अडथळे ठरत आहेत.
‘डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्या’ने पक्ष्यांसह खारफुटीच्या असंख्य प्रजातींचे रक्षण केलेले आहे; परंतु त्यानंतर आपल्याकडील सागरी जैविक संपदेच्या रक्षणासाठी, सागरी अभयारण्याचा प्रस्ताव शीतपेटीत गेलेला आहे. सेंट जेसिंतो बेटावरच्या स्थानिकांनी पोर्तुगीज काळातच त्यांच्या मालकीची भूमी बाहेरच्यांना न विकण्याचा जो निर्णय घेतला होता, त्याचे पालन आजतागायत केलेले आहे. त्यामुळे दाबोळी विमानतळाशेजारी आणि ‘मिनी इंडिया’ ठरलेल्या मुरगाव शहराजवळ असूनही सेंट जेसिंतो बेट स्वतःचे नैसर्गिक वैभव टिकवू शकले आहे.
६. गोव्याची भूमी आनंददायी होण्यासाठी वनक्षेत्र आणि जैविक संपदा जपणे आवश्यक !
गोव्यामध्ये एकेकाळी काळे खुबे, तिसर्या (शिंपले), शिनाणे, कालवा (सागरी अन्न) यांच्यासाठी नावारूपाला आलेल्या किनारपट्टीवरच्या जागा आगामी आणि वर्तमान काळात शाश्वतरित्या अन्नाची रसद पुरवेल, यासाठी त्यांना सुरक्षित ठेवण्यासाठी आपण कोणतेच ठोस प्रयत्न केलेले नाहीत. खारफुटीसह किनार्यावरील मारवेली आणि तत्सम वनस्पतींचे वैभव, भरती रेषेची सीमारेषा पाळली जात नसल्याने उद्ध्वस्त होत आहे. गोव्यासारख्या लहान राज्यात देशाच्या तुलनेत वाहनांची संख्या आवाक्याबाहेर गेलेली आहे. त्यामुळे हवेच्या प्रदूषणाचे संकट वृद्धींगत होत चालले आहे. त्याला रोखण्यासाठी नैसर्गिक जंगलांचे आच्छादन सुरक्षित ठेवण्याची नितांत आवश्यकता आहे. खासगी आस्थापनांना सामाजिक दायित्वाद्वारे गोव्यातील खासगी वनक्षेत्रांच्या संरक्षणासाठी प्रेरित करण्याचीही आवश्यकता आहे. गोव्याची जैविक संपदा आणि शाश्वत विकास यांच्यातील सुवर्णमध्य साध्य करतांना आपण नियोजनबद्ध पावले उचलली, तर वर्तमान अन् भविष्यात गोव्याची भूमी आनंददायी होईल !
– श्री. राजेंद्र पां. केरकर, पर्यावरणतज्ञ, केरी, गोवा. (२०.३.२०२३)