भारताच्या वैचारिक विध्वंसाचा वस्तूनिष्ठ इतिहास ! – (उत्तरार्ध)
गेल्या १ सहस्र वर्षांत भारताने स्वत्व गमावले. आधी इस्लामी लुटारू आणि नंतर धूर्त ब्रिटीश यांनी भारतियांचे सर्वस्वच नष्ट करून टाकले. २ एप्रिल या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखाच्या पूर्वार्धात आपण ‘आयडियॉलॉजिकल सबव्हर्जन’ म्हणजे सामाजिक व्यवस्था नष्ट करण्यासाठी आखलेल्या वैचारिक स्तरावरील षड्यंत्राचा वापर करून हिंदूंमध्ये हीनपणाची भावना कशी निर्माण केली, हे पाहिले. यामुळे इंग्रजाळलेपणा निर्माण झालेल्या नव्या भारतीय पिढ्यांनी ब्रिटिशांना कशा प्रकारे साहाय्य केले ? आणि भारताच्या रक्तरंजित विभाजनास ते कसे कारणीभूत ठरले, हे आजच्या लेखातून जाणून घेऊ. ही सर्व माहिती ‘प्राच्यम्’ या राष्ट्रनिष्ठ यूट्यूब वाहिनीवरील ‘साहेब जे कधी गेलेच नाहीत !’, या व्हिडिओद्वारे प्रसारित करण्यात आली आहे. आतापर्यंत १६ लाख लोकांनी पाहिलेल्या या व्हिडिओतील ही अभ्यासपूर्ण आणि जागृतीपर माहिती आमच्या वाचकांसाठी साभार प्रकाशित करत आहोत.(उत्तरार्ध)
९. ब्रिटीश राजसत्तेच्या विश्वासातील तपकिरीसाहेबांचाच ब्रिटिशांना आधार अन् त्यातूनच काँग्रेस या ‘सेफ्टी नेट’ची स्थापना !
याच शतकात भारताच्या वर्गभेदाच्या रेषा नेहमीसाठी ओढल्या गेल्या. आता सामान्य जनतेनेही अपेक्षा सोडून दिली होती. ब्रिटीश साम्राज्याचा सूर्य आता कधीही अस्त होईल, अशी स्थिती दिसत नव्हती. वर्ष १९४७ पर्यंत ब्रिटीश राजवटीचा प्रमुख आधारस्तंभ होता ‘इम्पिरीअल लेजिस्लेटिव्ह काऊन्सिल’ ज्याचे शब्दश: भाषांतर हे ‘शाही विधान परिषद’ अशा प्रकारे करता येईल. या काऊन्सिलवर भारतियांची अनौपचारिक सदस्य म्हणून निवड होत असे. देशाचे प्रतिष्ठित ‘तपकिरीसाहेब’, जमीनदार, राजकुमार, अधिवक्ते, दंडाधिकारी आणि व्यापारी त्याचा भाग बनत असत. ही उघड गोष्ट आहे की, या लोकांच्या प्रामाणिकपणावर ब्रिटीश राजसत्तेला संपूर्ण विश्वास होता.
बेझमेनोव्ह यासंदर्भात सांगतो, ‘‘आपल्याला असे वाटते की, ‘सबव्हर्टर’ ही अशी व्यक्ती असेल, जी आपली (हिंदूंची) सर्व स्वप्ने एका झटक्यात नष्ट करील. तर तसे नाही ! हे असे ‘विद्यार्थी’ असतात, जे देवाण-घेवाण करतात. ते एक मुत्सद्दी, एक अभिनेता, एक कलाकार असतात !
प्रसिद्ध लेखक आणि संशोधक संदीप बाळकृष्ण याविषयी सांगतात, ‘‘तुमच्या जवळच्या अशा व्यक्तीने जिने तुमच्यावर (भारतियांवर) अत्याचार करणार्यांचा अभ्यास केलेला असतो, ती त्या अत्याचार्यांसाठी महत्त्वपूर्ण ‘प्यादा’ झालेली असते. ती तुमच्या मूळ संस्कृतीचा भाग असल्याने ती प्याद्याची भूमिका निभावू शकते. त्यामुळे जे कार्य कुणी विदेशी व्यक्ती कदापि करू शकत नाही, ते ही व्यक्ती (तपकिरीसाहेब) सहजपणे करू शकते.’’
‘भारतातील आपली राजवट नेहमीसाठी नसणार’, हे चतुर ब्रिटिशांना आधीपासूनच ठाऊक होते. प्रशासनातील वाढती निरंकुशता पाहून ॲलन ऑक्टॅव्हियन ह्यूम याने इंग्रजांची राजवट वाचवण्यासाठी वर्ष १८८५ मध्ये काँग्रेसची स्थापना केली. लहानसहान सुविधा निर्माण करून वर्ष १८५७ सारखी परिस्थिती पुन्हा उद्भवू नये, हा ह्यूमचा हेतू होता. या ‘सेफ्टी नेट’चे (राजसत्तेच्या संरक्षणासाठी बनवलेल्या संघटनेचे) पहिले सदस्य कोण बनले, तर हेच ‘इम्पिरीअल काऊन्सिल’चे तपकिरीसाहेब !
ह्यूमची भीती अनाठायी नव्हती. इंग्रजांच्या दडपशाहीमुळे भारतभूमीतून आता आवाज उठायला प्रारंभ झाला होता. ‘छत्रपती शिवाजी महाराजांचे हिंदवी स्वराज्य’ हे वर्ष १८७६ मध्ये स्वामी दयानंद सरस्वती यांच्या लेखणीतून ‘स्वराज’ या घोषणेच्या रूपाने बाहेर पडले.
‘स्वराज’ – भारत आणि भारतीय यांच्यासाठी !
१०. ब्रिटीशहितैशी तपकिरीसाहेबांची ‘स्वातंत्र्यसैनिकां’च्या रूपात स्वातंत्र्य चळवळीत उडी !
बेझमेनोव्ह पुढे सांगतो, ‘‘तुम्हाला आणखी २० अथवा १५ वर्षे लागतील, ज्या कालावधीत (कथित) राष्ट्रनिष्ठा बाळगणारी आणि सामान्य ज्ञान असणारी पिढी (भविष्यातील तपकिरीसाहेब) निर्माण होईल. ही पिढी समाजाच्या बाजूने कार्य करणारी असेल (म्हणजे तसे दर्शवील).’’
विद्रोहाचा अग्नी आतल्या आत संपूर्ण देशात पसरत होता. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, अरविंद घोष, बिपीनचंद्र पाल यांसारखे तत्त्वज्ञानी यांचा उदय झाला. राष्ट्रवादी विद्वानांचे स्वदेशी शोध वाचून नवीन पिढ्या ‘डिमॉरलायझेशन’च्या विरोधात (आचारभ्रष्ट होण्यापासून) जागृत होत होत्या. भविष्यातील महान क्रांतीकारक याच विचारसरणीच्या वातावरणात मोठे झाले. काळाची दिशा ओळखून ‘इम्पिरीअल काऊन्सिल’चे ‘सज्जन’ आता काँग्रेसची सदस्यता वाढवण्याचा प्रयत्न करू लागले. ‘आलिशान बंगले आणि जहागीरदारी यांचा आम्ही बलीदान केला’, अशा प्रकारे स्वत:चा प्रचार करून तपकिरीसाहेब कुर्ता-पायजमा परिधान केलेले ‘स्वातंत्र्यसैनिक’ बनले.
बेझमेनोव्ह पुढे म्हणतो, ‘‘या टप्प्याला विद्यार्थ्यांना (‘सबव्हर्जन’च्या प्याद्यांना) ब्रिटनमधून परत पाठवण्यात आले. त्यांतील काही आधीपासून देशात (भारतात) होते. त्यांनी अचानक डोके वर काढले. निष्क्रीय असलेले हे लोक कामाला लागले.’’
एक भयानक वादळ उठत होते. स्वातंत्र्याच्या लढ्यात जहाल देशभक्त क्रांतीकारकांसमवेत ‘इम्पिरीअल काऊन्सिल’चे गोरेसाहेब मिसळून गेले. इंग्रजांसाठी सुद्धा ही चांगली बातमी होती.
बेझमेनोव्ह (भारताच्या) या महत्त्वपूर्ण वळणाविषयी विशद करतो, ‘‘ते १५-२० वर्षे झोपून होते (निष्क्रीय होते). आता ते विविध गटांचे नेते, सामाजिक व्यक्तीमत्त्वे आणि प्रचारक बनले. ते राजकीय प्रक्रियेचा क्रियाशील भाग बनले.’’
११. इंग्रजाळलेपणाने भारीत झालेले भारतविरोधी मोतीलाल नेहरू !
यात सर्वांत पुढे होता, अलाहाबादचा अत्यंत श्रीमंत आणि प्रभावशाली नेहरू परिवार आणि त्याचे संरक्षक मोतीलाल नेहरू !
‘इंग्रजाळलेपणा’ नेहरू घराण्याच्या रक्तात अक्षरश: भिनला होता. वर्ष १९११ च्या देहली दरबारात ‘अतीमहनीय व्यक्ती’ म्हणून मिळालेली वागणूक असो अथवा ‘सिव्हिल लाईन्स’च्या मेजवान्या ! या माध्यमातून इंग्रजांनी मोतीलाल यांना कधीच त्यांच्या ‘तपकिरी’पणाची जाणीव होऊ दिली नाही. इतिहासाची पुस्तके आणि चित्रपट यांमध्ये मोतीलाल नेहरू यांचे नाव ‘एक महान स्वातंत्र्यसैनिक’ या रूपाने मिळते; परंतु अशा कोणत्या स्वातंत्र्यासाठी ते लढत होते की, ज्यामुळे ते ब्रिटिशांच्या इतक्या जवळचे झाले होते ?
प्रसिद्ध बॅरिस्टर मोतीलाल यांनी कदाचित्च एखाद्या क्रांतीकारकाचा खटला लढला असेल. ‘काकोरी कांड’मध्ये रामप्रसाद बिस्मिल आणि अशफाक उल्ला खान यांना मोतीलाल यांचेच नातेवाईक अन् मित्र जगत्नारायण मुल्ला यांनी फाशीची शिक्षा द्यायला लावली. मोतीलाल हे त्यांच्या मुलाच्या (जवाहरलाल नेहरू यांच्या) भविष्याविषयी (‘करिअर’विषयी) अधिक चिंतित होते. मुलाचे शिक्षण संपण्यापूर्वीच मोठ्या चतुराईने ते काँग्रेसचे सूत्रधार (किंगमेकर) बनले.
१२. ब्रिटिशांसाठी ‘सर्वांत अल्प धोकादायक’ नेते म्हणजे म. गांधी !
भारतीय जनमानसाच्या ‘सबव्हर्जन’मध्ये अजाणतेपणाने का असेना, मोहनदास गांधी यांची भूमिका नाकारता येत नाही. यासंदर्भात संदीप बाळकृष्ण म्हणतात, ‘‘भारताच्या स्वातंत्र्यासाठी असंख्य लोक लढले. त्यांपैकी गांधी हे ‘सर्वांत अल्प धोकादायक’ असल्याचे ब्रिटिशांनी हेरले होते. गांधींनी संपूर्ण स्वातंत्र्य संग्रामाची दिशा पालटली. त्यांच्यामागे पुष्कळ मोठा जनसमुदाय होता. ते सर्व समाजातील विविध स्तरांतील होते. त्या काळात असा अन्य कोणताही जननेता नव्हता !’’
माजी सनदी अधिकारी आणि लेखक संजय दीक्षित म्हणतात, ‘‘जर कुणी गांधी यांचे ‘हिंद स्वराज’ पुस्तक वाचले असेल, तर ते असे विचित्र पुस्तक आहे, ज्यात ते स्वत: प्रश्न विचारत आहेत आणि स्वत:च त्या प्रश्नांची उत्तरे देत आहेत. त्यांची अहिंसेविषयीची एक विचित्र संकल्पना आहे. यासंदर्भात ते असे म्हणतात की, ‘चोराला मारू नका; कारण समजा तुमचे वडीलच तुमच्या घरी चोरी करायला आले, तर तुम्ही त्यांना मारणार का ?’, या तर्कशास्त्राची कल्पना मी तरी करू शकत नाही ! अशा प्रकारचे तर्कशास्त्र गांधीजीच देऊ शकत होते.’’
१३. वर्ष १९२८ पासून काँग्रेसमध्ये परिवारवादास प्रारंभ !
वर्ष १९२८ मध्ये मोतीलाल यांनी गांधी यांच्या साहाय्याने पुत्र जवाहरलाल यांना काँग्रेसचे अध्यक्ष बनवले. येथूनच काँग्रेसमध्ये परिवारवादाच्या परंपरेचा शुभारंभही झाला. म. गांधी यांनी ‘सर्वांत शुद्ध व्यक्तीमत्त्व आणि शंकाही घेता येणार नाही, असा सत्यवादी’ म्हणून जवाहरलाल नेहरू यांची सार्वजनिक ओळख करून दिली. याही पुढे जाऊन ‘नेहरू यांच्या हातात देश सुरक्षित आहे’, असेही म्हटले.
मूलत: नेहरू हे एक वास्तविक ‘तपकिरीसाहेब’ होते. ते भारताच्या मूळ वास्तविकतेपासून पुष्कळ लांब होते. ते ‘फेबियन डेमॉक्रसी’चे म्हणजे ‘सामाजिक लोकशाहीची तत्त्वे ही क्रांतीकारक मार्गांद्वारे उलथापालथ करून नव्हे, तर ‘संथपणाने आणि सुधारणावादी पद्धतीने अवलंबणे’, या पद्धतीचे पुरस्कर्ते होते. अलाहाबाद आणि इंग्लंड येथे इंग्रजांच्या वातावरणात वाढलेले नेहरू चुकीच्या ठिकाणी चुकीच्या वेळी उभे होते. वडिलांच्या पक्षाचे अध्यक्ष बनून ते देशाला ‘पूर्ण स्वराज देणारा नायक’ बनण्याचे स्वप्न पहात होते; परंतु सारीपाटावरील गोट्या मात्र दुसराच कुणीतरी (इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल) सजवत होता. इंग्रजांच्या जागतिक राजवटीतील सर्वांत मोठा हिरा हा ‘भारत’ होता.
१४. महंमद अली जिना यांच्या रूपाने भारताच्या विभाजनास प्रोत्साहन !
जेव्हा स्वातंत्र्य चळवळ एका निश्चित वास्तविकतेत उतरण्याचे दिसू लागले, त्याच वेळी इंग्रजांनी पुन्हा ‘इम्पिरीअल काऊन्सिल’च्या आणखी एका तपकिरीसाहेबाला लंडनमध्ये पेरले. त्याचे नाव होते महंमद अली जीना ! संदीप बाळकृष्ण यासंदर्भात सांगतात, ‘‘विन्स्टन चर्चिल आणि अन्य काही ब्रिटीश नेत्यांनी जीना यांना विशिष्ट पद्धतीने पेरले. ‘इंडिया हाऊस’सारख्या भारतीय संघटनांनी नुकतेच जीना आणि चर्चिल यांच्यातील पत्रव्यवहार उघड केला आहे.’’
बेझमेनोव्ह स्वातंत्र्य चळवळीच्या या वळणाविषयी सांगतो, ‘‘१५ वर्षांपूर्वी त्याने (जीना यांनी) केलेल्या अयोग्य कृत्यांकडे कानाडोळा केला गेला, परंतु आता त्याने त्यास एका ‘राजकीय समस्ये’चे स्वरूप दिले. तो आता अधिकृत मान्यता, आदर, मानवाधिकार यांची मागणी करू लागला, तसेच यासाठी त्याने मोठे लोकसंघटन (मुसलमानांचे एकत्रीकरण) केले. त्यामुळे त्याच्यात आणि पोलिसांमध्ये हिंसाचार होऊ लागला. त्याचे समर्थक (मुसलमान) आणि सर्वसाधारण जनता (हिंदू अन् शीख) एकमेकांसमोर उभी ठाकली. यास ‘डिस्टेबिलायझेशन’ म्हणतात.’’
इतिहासाचे अभ्यासक आणि लेखक आभास मलदियार म्हणतात, ‘‘आता द्रविडी आणि खलिस्तानवादी चळवळींचा जन्म झाला होता. इस्लामी कट्टरतावादाला अधिक धर्मांधतेकडे झुकवण्यात आले. आपल्याला हे ठाऊक असेल की, १९२० च्या काळात मोपला बंडाच्या वेळी मुसलमानांना खलिफासाठी लढण्यास बाध्य करण्यात आले होते. खरेतर तुर्की लोकांनाही खलिफा नको होता. १९४० च्या काळात साम्यवादी चळवळीच्या माध्यमातून मुसलमानबहुल भागांचे विभाजन करण्यासंदर्भातही आवाज उठत होता. थोडक्यात त्या कालावधीत अनेक फुटीरतावादी चळवळींना ऊत आला होता.’’
१५. ‘सबव्हर्जन’चा शेवटचा टप्पा – संकट (क्रायसिस) !
वर्ष १९४५ येता येता जीना आणि त्यांचे सहकारी यांनी भारतातील धार्मिक स्थिती मोठ्या प्रमाणात बिघडवली होती. संपूर्ण देश जळत होता. काँग्रेसची सर्व आंदोलने सपशेल अयशस्वी ठरली होती. तपकिरीसाहेबांनी योग्य वेळी त्यांची बाजू पालटली आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रसिद्धीचा लाभ उठवला. ब्रिटिशांनी घोडचूक करत ‘आझाद हिंद सेने’च्या सैन्याधिकार्यांवर देशद्रोहाचे खटले भरले. आझाद हिंद सेनेच्या सैनिकांसाठी संपूर्ण देश संघटित झाला. नागरी युद्धाचा अग्नी नेताजींच्या प्रसिद्धीसमोर फिका पडला. उलट इंग्रज राजवट निशाण्यावर आली. धोका ओळखून राजवटीने जिना यांना समोर केले. आता वेळ होती, ‘सबव्हर्जनच्या’ शेवटच्या टप्प्याची – ‘संकटा’ची (‘क्रायसिस’ची) !
बेझमेनोव्ह म्हणतो, ‘‘डिस्टेबिलायझेशन’ची प्रक्रिया सर्वसाधारणपणे संकटाच्या प्रक्रियेकडे मार्गक्रमण करते. देशाला संकटाच्या दारात ढकलण्यासाठी केवळ ६ आठवडे पुरेसे असतात.’’
२९ एप्रिल १९४६ चा दिवस ! गांधी यांनी वर्ष १९२८ मध्ये केलेल्या चुकीची पुनरावृत्ती केली, जी संपूर्ण भारताला महागात पडणार होती. कोट्यवधी लोकांच्या बलीदानामुळे स्वातंत्र्याचा लढा शेवटच्या टप्प्यात होता. त्या वेळी काँग्रेसचा अध्यक्ष हाच स्वतंत्र भारताचा पंतप्रधान होणार होता. त्या काळात सर्वांचे प्रिय नेते होते सरदार वल्लभभाई पटेल !
ज्येष्ठ लेखक एस्. एल्. भैरप्पा सांगतात, ‘‘त्या वेळी १५ प्रमुख काँग्रेसी नेत्यांपैकी १२ जणांनी पटेल यांची पंतप्रधानपदासाठी निवड केली होती. नेहरू यांना एकाही नेत्याने मत दिले नव्हते.’’ जनतेने नेताजी बोस अथवा पटेल यांना निवडले असले, तरी ती नेहरू यांनाच वारंवार समोर येत असल्याचे पहात होती, नेहरूंच्या रूपात तपकिरीसाहेबाला ‘द लास्ट इंग्लिश मॅन टू रूल इंडिया’ (भारतावर राज्य करणारी इंग्रजाळलेली शेवटची व्यक्ती) जे बनायचे होते !
‘आयडियॉलॉजिकल सबव्हर्जन’च्या या टप्प्याविषयी विशद करत बेझमेनोव्ह म्हणतो, ‘‘जनतेला एका तारणहाराची आवश्यकता होती. जनतेची स्थिती ही आधीच आजारी आणि थकल्याची झाली होती. तेव्हा हार्वर्ड अथवा बर्कले यांसारख्या विद्यापिठात अर्धवट शिकलेला बुद्धीमान मनुष्य सर्वांचा ‘तारणहार’ म्हणून आला !’’
१६ ऑगस्ट १९४६ ! जीना यांनी ‘डायरेक्ट ॲक्शन डे’च्या (हिंदूंच्या विरोधात थेट कृती करण्याचा दिवस) अंतर्गत उघडपणे हिंदूंचा नरसंहार करण्यास सांगितले. संपूर्ण देश नागरी युद्धात होरपळून गेला. गुप्तचर विभागाच्या संचालकांनी लंडनमध्ये एका गुप्त लिखाणाद्वारे कळवले, ‘गेम सो फार हॅज बीन वेल प्लेड !’ (आतापर्यंतचा सर्व खेळ चांगल्या प्रकारे खेळला गेला.)
१६. भारतात दंगली उसळल्या असतांना शिमल्यामध्ये माऊंटबॅटन समवेत नेहरूंची मेजवानी !
२० फेब्रुवारी १९४७ ! नेताजींच्या समर्थनार्थ सशस्त्र सैन्याचा विद्रोह भारतात रहाणार्या सर्व इंग्रजांच्या जीवितासाठी धोकादायक बनला होता. ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान क्लेमेट ॲटली यांनी भारत सोडण्याची दिनांक निश्चित केली ‘जून १९४८’!
१२ मार्च १९४७ ! अमेरिकेने साम्यवाद आणि साम्राज्यवाद यांचा अंत करण्यासाठी त्याच्या नव्या परराष्ट्र धोरणाची घोषणा केली. सहस्रो अब्ज रुपयांच्या ऋणाखाली दबलेल्या ब्रिटनकडे ‘बिग डॅडी’ अमेरिकेची गोष्ट ऐकण्याविना दुसरा पर्याय नव्हता. अमेरिका आणि ब्रिटन यांच्या एका नवीन भूराजकीय डावाचा उदय झाला अन् तो म्हणजे ‘भारताची फाळणी’ ! घाई गडबडीत डिकी माऊंटबॅटन याला भारताचा ‘व्हाईसरॉय’ बनवण्यात आले. त्याला एक धारिका देण्यात आली. त्यावर लिहिले होते, ‘ऑपरेशन मॅड हाऊस’ !
९ मे १९४७ ! नेहरू शिमला येथे माऊंटबॅटनला भेटले. माऊंटबॅटनने नेहरू यांना फाळणीचा पहिला ‘प्लॅन’ दाखवला – ‘प्रोजेक्ट बॅल्कन’ ! भारताच्या निर्दयी फाळणीचा ‘प्लॅन’ पाहून नेहरूसाहेब एकदम घाबरले; पण शिमल्याच्या निसर्गात त्यांची मैत्रीण एडविना हिने त्यांना सांभाळले आणि शेवटी त्यांची मनधरणी केलीच !
बेझमेनोव्ह म्हणतो, ‘‘तो देशात परतला. त्याला वाटले की, त्याला सर्व सामाजिक आणि आर्थिक समस्यांवरील उपाय ठाऊक आहेत !’’
१७. भारताची हृदयद्रावक फाळणी !
३ जून १९४७ ! माऊंटबॅटन याने अचानक ‘सत्तेचे हस्तांतरण जून १९४८ ऐवजी १५ ऑगस्ट १९४७ या दिवशीच म्हणजे केवळ १० आठवड्यांमध्ये होऊन जाईल’, असे घोषित केले. सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्याच दिवशी सायंकाळी आकाशवाणीवरून भारताचे विभाजन होणार असल्याची घोषणा झाली. हिंदू-मुसलमान यांमध्ये दंगली चालू झाल्या. तपकिरीसाहेबांना माध्यम बनवून स्वातंत्र्य चळवळीचे ‘सबव्हर्जन’ आता पूर्ण झाले होते.
बेझमेनोव्ह सांगतो, ‘‘आता आपल्याकडे दोन पर्याय उरतात – ‘नागरी युद्ध’ अथवा ‘आक्रमण’ !
१४ ऑगस्ट १९४७ ची सायंकाळ ! तिकडे नागरी युद्ध चालू होण्याच्या काही घंट्यांपूर्वी लॉर्ड माऊंटबॅटनने शँपेन उघडली. भारताच्या नावाने ‘टोस्ट’ केला. नेहरूसाहेबाने शँपेनचे पेले उचलले आणि म्हटले, ‘‘किंग जॉर्ज सिक्स्थ (राजा जॉर्ज सहावे) यांच्या नावाने !’’
बेझमेनोव्ह सांगतो, ‘‘टाइम बाँबचा एकेक क्षण जवळ-जवळ येत होता. विनाश जवळ, आणखी जवळ येत होता !’’
१४ ऑगस्ट १९४७ ची मध्यरात्र ! मध्यरात्रीत देहलीत अचानक ढोलताशांचा आवाज चालू झाला. घरात आपल्या मुलीला आनंदात नाचतांना पाहून व्हाईसरॉयचे सल्लागार व्ही.पी. मेनन म्हणाले, ‘‘आपली सर्वांत भीतीदायक आणि वाईट स्वप्ने तर आता खरी ठरणार आहेत.’’ शत्रूराष्ट्रावरील निष्ठा आणि आपल्या ‘साहेबां’चा नाकर्तेपणा भारताच्या विभाजनास कारणीभूत ठरला. त्यामुळेच मानवी इतिहासातील सर्वाधिक रक्तरंजित नागरी युद्धांपैकी एक भयावह युद्ध झाले. आनंदी जनता त्यांच्या नेत्यांना प्रोत्साहित करत होती; परंतु त्यांना हे ठाऊक नव्हते की, त्यांचे नेते कुणाला आनंदित करत आहेत !
(साभार : ‘प्राच्यम्’ यूट्यूब वाहिनी)
व्हिडिओ पहाण्यासाठी ‘यू ट्यूब’ची लिंक :
संपादकीय भूमिकाशत्रूराष्ट्रावरील निष्ठा आणि तत्कालीन नेत्यांचा नाकर्तेपणा हा भारताच्या विभाजनास कारणीभूत ठरला, हा खरा इतिहास शिकवायला हवा ! |