सिंधुदुर्ग : कुडाळ प्रांताधिकारी पद गेले ६ मास रिक्त : जनतेची असुविधा !

जिल्हाधिकारी कार्यालयाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप !

कुडाळ – कुडाळ आणि मालवण या २ तालुक्यांसाठी असलेले येथील प्रांताधिकारी हे महत्त्वाचे पद गेले ६ मास रिक्त आहे. त्यामुळे येथील दैनंदिन कामकाजावर याचा परिणाम होत असून विविध खटले अथवा दाखले यांसाठी पक्षकारांना गेले ६ मास पुढचे पुढचे दिनांक दिले जात आहेत. त्यामुळे पक्षकारांसह सर्वसामान्य जनतेमधून तीव्र अप्रसन्नता व्यक्त होत असून हे पद तात्काळ भरण्याची मागणी करण्यात येत आहे.

कुडाळच्या तत्कालीन प्रांताधिकारी सौ. वंदना खरमाळे यांचे सप्टेंबर २०२२ मध्ये स्थानांतर (बदली) झाले. त्यामुळे १ ऑक्टोबर २०२२ पासून हे पद रिक्त आहे. यानंतर या पदाचा कार्यभार जिल्हा कार्यालयातील निवासी उपजिल्हाधिकारी सोनोने यांच्याकडे सोपवण्यात आला आहे. मुळात निवासी उपजिल्हाधिकारी सोनोने यांच्याकडे उपजिल्हाधिकारी पदासह अन्य २ पदांचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यामुळे कामकाजाचा व्याप पहाता या पदांना आवश्यक असा वेळ देणे त्याना अशक्य आहे. सध्या कार्यभार असलेले अधिकारी नियमितपणे कुडाळ प्रांताधिकारी कार्यालयात वेळ देऊन दैनंदिन कामकाजाचा निपटारा करण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र खटले चालवणे कठीण होत असल्याने गेले ६ मास खटल्यांचे कामकाज बंद आहे. त्यामुळे पक्षकारांना पुढचा पुढचा दिनांक देण्याखेरीज पर्याय राहिला नाही. २ तालुक्यांचे महत्त्वाचे पद असतांनाही जिल्हाधिकारी प्रशासनाकडून या समस्येची कोणतीही नोंद घेतलेली नाही.

१ मे या दिवशी ‘आत्मक्लेश आंदोलन’ करणार ! – प्रसाद गावडे, मनसे

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात महसूल विभागात निवासी उपजिल्हाधिकारी, प्रांताधिकारी अशा रिक्त असलेल्या महत्त्वाच्या पदांमुळे या विभागाचा कारभार खोळंबला आहे. ही पदे भरण्यासाठी तात्काळ प्रयत्न करा, अन्यथा १ मे या दिवशी ‘आत्मक्लेश आंदोलन’ करू, अशी चेतावणी मनसेचे माजी कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

संपादकीय भूमिका

देशभरात सुशिक्षित बेरोजगारांची संख्या वाढत असतांना महत्त्वाची शासकीय पदे रिक्त ठेवून जनतेची असुविधा करणारे प्रशासन जनतेच्या सहनशीलतेचा अंत पहात आहे का ?