नागपूर येथील सुफी संत ताजुद्दीनबाबांचे वंशज सय्यद तालिब ताजी बाबा यांना आतंकवादी संघटनांकडून धमकीचे ई-मेल !
हिंदु राष्ट्राचे समर्थन केल्याचे प्रकरण
नागपूर – ‘भारतात हिंदु राष्ट्र झाले पाहिजे. आम्ही हिंदु राष्ट्राचे समर्थन करतो’, अशी जाहीर भूमिका घेतल्यामुळे सर्वधर्मसमभावचे प्रतीक आणि देश-विदेशांतील लोकांचे श्रद्धास्थान असलेले नागपूर येथील सुफी संत बाबा ताजुद्दीन यांचे वंशज सय्यद तालिब ताजी बाबा यांना धमकीचे ई-मेल आले आहेत. हाफिज सईद याची संघटना ‘जमात-उल्-दवा’ आणि ‘अबू मन्सूर असीन’ याची आतंकवादी संघटना तेहरिक-ए-तालिबान यांच्या नावाने हे धमकीचे ई-मेल आले आहेत, अशी माहिती सय्यद तालिब ताजी बाबा यांनी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली. आतंकवादी संघटनांकडून अशा प्रकारच्या जिवे मारण्याच्या धमक्या आल्यानंतर सज्जाद नशीन सय्यद तालिब बाबा यांनी सरकारकडे सुरक्षेची मागणी केली आहे.
सय्यद तालिब ताजी बाबा म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र झाल्यामुळे देशात प्रगती आणि विकास होईल. देशात बंधुभाव वाढेल. सुफी संत बाबा ताजुद्दीन यांच्या दर्ग्यातील कार्यक्रमात सर्व धर्माचे लोक सहभागी होतात. आम्ही हिंदु राष्ट्राला समर्थन दिल्यानंतर धमकी येणे चालू झाले. जिवे मारण्याच्या धमक्या पहाता मला सुरक्षा प्रदान करण्यात यावी. मी आणि माझे कुटुंब आमचे रक्षण होणे आवश्यक आहे. आमची सुफीसंतांची परंपरा आहे. मी संत ताजुद्दीन बाबांचा वंशज आहे. मी सर्व धर्मांना मानणारी व्यक्ती आहे. मी सर्व धर्मांच्या धर्मस्थळांमध्ये जातो. हे आतंकवाद्यांना टोचते.’’
या ई-मेलमध्ये ‘सय्यद तालिब यांना लवकरच मारले जाईल’, असे स्पष्टपणे लिहिले आहे. सय्यद तालिब हे ‘हिंदु राष्ट्राचे समर्थन करतात’, असे या संघटनांचे म्हणणे आहे. या संपूर्ण प्रकरणाची तक्रार प्रविष्ट करण्यात आली आहे. पोलीस अन्वेषण करत आहेत.