दैनिक ‘सनातन प्रभात’विषयी वाचकांना वाटणारी आत्मीयता !
‘कोरोना महामारीनंतर वर्ष २०२० मध्ये एरंडोल या तालुक्याच्या ठिकाणी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण वाढण्याच्या दृष्टीने मोहीम राबवण्याचे ठरले. त्याप्रमाणे तेथे ४५ वर्गणीदार झाले. त्यांना नियमित अंक चालू आहेत. त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद लाभत आहे. पुढे दिलेल्या काही वाचकांच्या कृतींतून त्यांना दैनिक ‘सनातन प्रभात’, दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणारे साधक यांविषयी वाटणारी आत्मीयता आणि त्यांना वाटत असलेले दैनिक ‘सनातन प्रभात’चे महत्त्व लक्षात येते !
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वितरकांनी सेवा म्हणून दैनिकाचे वितरण केल्याने त्यांना आनंद मिळणे !
अ. एक वाचक स्वतः दुकानदार आहेत. त्यांना अंक द्यायला गेलो असता ते दुकानातील अन्य ग्राहकांना सांगत होते, ‘‘दैनिकाची सेवा करणारे सनातनचे साधक देवासारखे आहेत.’’
आ. एका वाचकांनी त्यांच्या ओळखीच्या एका व्यक्तीला वर्गणीदार करून घेण्यासाठी स्वतःजवळचे पैसे दिले.
इ. एका वाचकाचे सोन्या-चांदीचे दुकान आहे. त्यांच्याकडे गेल्यानंतर ते सनातनच्या सात्त्विक उत्पादनांविषयी दुकानातील ग्राहकांना माहिती द्यायला सांगतात. ते स्वतःही ग्राहकांना सनातनची सात्त्विक उत्पादने घेण्याची विनंती करतात.
वाचकांचा प्रतिसाद पाहून अतिशय आनंद होतो. कधी रविवार येतो आणि मी दैनिकाच्या वितरणाची सेवा करतो, असे वाटते. कृपाळू गुरुमाऊलीच या पामराला सेवा देऊन ती करवून घेत आहे. त्याविषयी साच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञता !’
– श्री. प्रल्हाद सोनवणे, पाळधी, जळगाव. (३.४.२०२३)
प्रतिरविवारी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करण्यासाठी गाडीचे इंधन आपोआप उपलब्ध होणे !
अ. ‘प्रारंभी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण ही धर्मसेवा आहे’, असे वाटत नव्हते. वितरणासाठी गाडी मिळण्याची अडचण यायची. मात्र आता ‘ही सेवा माझ्या उद्धारासाठीच आहे, यातूनच माझी साधना होणार आहे’, असे वाटते.
आ. मला मासाच्या शेवटी दैनिकाच्या वितरणासाठी जातांना इंधनासाठी आर्थिक अडचण येत असे; मात्र आता गुरुकृपेने प्रतिरविवारी इंधन आपोआप उपलब्ध होते. त्याचे नियोजन गुरुमाऊलीच करून घेतात. त्यासाठी गुरुचरणी कृतज्ञता !
इ. मी दैनिक वितरणासमवेत सनातनची सात्त्विक उत्पादनेही वितरण करतो. त्यामुळे दैनिकाच्या वर्गणीदारांमध्ये वृद्धी होत आहे.
ई. आधी रविवारी दैनिक वितरण करण्यास ताण येत असे; मात्र आता ती सेवा आनंदाने आणि गुरुदेवांना अपेक्षित अशी करण्याचा प्रयत्न असतो.’
– श्री. रमेश महाजन, जळगाव (३.४.२०२३)