संपादकीय : दैनिक ‘सनातन प्रभात’ची लेखणी !
संपादकीय
आज दैनिक सनातन प्रभातच्या मुंबई, ठाणे, रायगड, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भ आवृत्ती आवृत्तीचा २४ वा वर्धापनदिन ! लोकमान्य टिळक यांच्या ‘केसरी’चा आदर्श समोर ठेवून चालणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ हेही हिंदूंवरील आघात आणि अत्याचार यांविरोधात अतिशय प्रखरतेने गेली २३ वर्षे अविरत लढा देत आहे. गेल्या २ तपांत आम्ही वेगवेगळा काळ अनुभवला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या लेखणीच्या माध्यमातून होत असलेल्या राष्ट्र-धर्म कार्याचा जेव्हा जेव्हा गौरव झाला, तेव्हा ती स्थिर राहिली आणि खडतर काळातही प्रखर ध्येयनिष्ठेमुळे अविचल राहिली ! श्रीमन्नारायण भगवंताच्या धर्मसंस्थापनेच्या कार्यात योगदान देण्यास कटीबद्ध असणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची ही लेखणी आपत्काळातही प्रतिदिन तिचे शब्दपुष्प भगवंताच्या चरणी अर्पण करत आहे आणि त्याच्याच कृपाशीर्वादाने येत्या काळातही करत राहील !
सत्यान्वेषी लेखणी !
गेल्या २ तपांत दैनिक ‘सनातन प्रभात’ने वेगवेगळा काळ अनुभवला. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या स्थापनेच्या वेळीच आम्ही स्पष्ट केले होते की, एका आध्यात्मिक संस्थेला पत्रकारितेच्या क्षेत्रात उतरण्याची वेळ येत आहे ती, राष्ट्राच्या दुःस्थितीमुळे. राष्ट्र आणि धर्म जागृतीसाठी सेवाभावी साधकांनी दैनिक ‘सनातन प्रभात’ एका उदात्त ध्येयाने चालू केले. इथे कुठल्याच प्रकारचा व्यावसायिक उद्देश नव्हता. आरंभीच्या काळात दैनिक ‘सनातन प्रभात’चे संस्थापक संपादक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले म्हणाले होते, ‘‘आता तुम्हाला कदाचित् बातम्या मिळवण्यास अडचणी येत असतील; पण एक दिवस असा येईल की, आपणच बातम्या निर्माण करू.’’ द्रष्ट्या संतांचे वचन आता आम्ही अक्षरशः अनुभवत आहोत. एक वेळ ‘दैनिक ‘सनातन प्रभात’वर बंदी येते कि काय ?’, अशी स्थिती तत्कालीन हिंदुद्वेष्ट्या काँग्रेस सरकारने निर्माण केली होती. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या तत्कालीन संपादकांना विनाकारण कारागृहातही जावे लागले. सत्यान्वेषी आणि परखड दैनिक ‘सनातन प्रभात’वर भावना भडाकवल्याचे आरोपही झाले. या सर्वांतून ताऊन सुलाखून बाहेर पडलेल्या दैनिक ‘सनातन प्रभात’चा ‘ऑनलाईन’ वाचकवर्ग मात्र दिवसेंदिवस वाढतच आहे. आम्ही प्रथमपासूनच पारदर्शी पत्रकारिता चालू केली आणि त्यामुळे ‘सनातन प्रभात’ची सेवा करणार्या साधकांच्या चुकाही आम्ही वेळोवेळी दैनिकातून प्रसिद्ध केल्या. याच भावनेने आम्ही हिंदूंसाठी काम करणार्या प्रत्येक घटकाकडे पहाण्याचा प्रयत्न केला. ‘त्यागी, निःस्पृह आणि चुकांविरहित असणारी धर्माधारित राष्ट्रव्यवस्थाच आदर्श असू शकते’, हा सनातन परंपरेचा अलौकीक गौरवशाली इतिहास आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ला राष्ट्राला या गौरवशाली इतिहासाचे पाईक बनवायचे आहे. ‘सनातन प्रभात’ची लेखणी कुठल्याही राजकीय पक्षाशी बांधील नाही आणि तिची निष्ठा केवळ आणि केवळ या जगातील एकमेव ‘सत्य’ असेलेल्या भगवंताच्या चरणी आहे. हेच या लेखणीचे बळ आहे. त्यामुळेच हिंदूंवरील प्रत्येक अन्याय आणि आघात सडेतोडपणे सांगण्याचे धैर्य तिच्यात आहे.
हिंदु राष्ट्र संकल्पनेची मुहूर्तमेढ !
आज समाजातील वृत्तपत्रे ही एकप्रकारे मोठी व्यावसायिक आस्थापने असतात. ‘सनातन प्रभात’ हे आर्थिक हानी सोसून, तरीही २२ वर्षांत एकही सुटी न घेता भगवंताच्या कृपेने अविरत कार्यरत आहे. आज अखिल विश्वातील मानवाच्या समाजजीवनातील प्रत्येक क्षेत्रात शेकडो समस्या आहेत. युगानुयुगे मानवाचा संघर्ष हा चालू आहेच; काहींचा स्वार्थासाठी आहे, तर काहींचा या स्वार्थी लोकांच्या जगात निःस्वार्थीपणे जगता येण्यासाठी ! मानवाच्या व्यक्तिगत जीवनातील अडीअडचणी, दुःख यांपासून ते त्याच्या समष्टी जीवनातील प्रत्येक पावलागणिक होणार्या संघषापर्यंत प्रत्येकाची उत्तरे ही सनातन परंपरेचा आधारस्तंभ असलेल्या ‘अध्यात्मा’त आहेत. ‘राष्ट्रस्य मूलं इंद्रियनिग्रहः ।’ (राष्ट्राचे मूळ (यश) इंद्रियांना कह्यात ठेवण्यात म्हणजे अध्यात्मात आहे.) हे चाणक्य यांचे वचन लक्षात घेता ‘धर्म हाच राष्ट्राचा पाया आहे’ आणि धर्माधिष्ठित राष्ट्र हेच प्रजेला सुखी ठेवू शकते. म्हणूनच आज राष्ट्रातील ‘गरिबीपासून, बेरोजगारी आणि लोकंख्यावाढीपर्यंत’, ‘नक्षलवादापासून आतंकवादापर्यंत’, ‘स्त्रियांवरील अत्याचारांपासून भ्रष्टाचारापर्यंत’, तसेच हिंदूंवरील सर्व प्रकारच्या आघातांवरील उत्तरे ही धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रात आहेत. येथे हिंदु राष्ट्र हे राजकीय अर्थाने अपेक्षित नाही, तर ती रामराज्यसदृश एक ‘आदर्श समाजव्यवस्था’ आहे. समाजात नेमकी याच संबंधित सनातन विचारांची पायाभरणी २ तपांहून अधिक काळ ‘सनातन प्रभात’ नियतकालिक समूह करत आहे. त्यामुळे आज देशभर चर्चेत असलेल्या ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पनेची मुहूर्तमेढ २ तपांपूर्वीच दैनिक ‘सनातन प्रभात’ने लावली आहे’, असे म्हटले तर चुकीचे ठरणार नाही. हिंदु राष्ट्राची स्थापना ही केवळ हिंदूंच्या वंशरक्षणासाठी आणि अहिंदूंच्या सर्व प्रकारच्या आघातांपासून त्यांना वाचवण्यासाठी नाही, तर त्याही पुढे जाऊन एका उच्चतम आदर्श समाजनिर्मितीसाठी करायची आहे. राष्ट्राच्या प्रशासकीय व्यवस्थेचा आदर्श हा त्याच्या त्यागी, विद्वान, नेतृत्वकुशल आणि ध्येयनिष्ठ प्रशासकामध्ये असतो. आज शिक्षण, संरक्षण, व्यापार, अर्थ, तंत्रज्ञान, स्थापत्य, शेती, कला, प्रवास, कायदा आदी सर्वच क्षेत्रांमध्ये एक आदर्श व्यवस्था असण्याची निकड प्रत्येक राष्ट्रप्रेमीला वाटत आहे. ही आदर्श व्यवस्था निर्माण करण्याचे मूळ सनातन धर्माच्या संस्कारांत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ त्याचा उद्घोष करून समाजाला स्वतः आदर्श जगण्याचे आणि आदर्श राष्ट्र घडवण्याचे सार नेमकेपणाने सांगत आहे. ‘ईश्वरप्राप्ती’ हा मानवी जन्माचा मूळ हेतू जाणून साधना करण्यास आरंभ केला, तर आदर्श राष्ट्रनिर्मितीसाठी लागणारी संयमी; परंतु कर्तृत्ववान प्रजा निर्माण होऊ शकणार आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’ नेमका हाच मार्ग दाखवत आहे. म्हणून ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या कार्यात भरीव वैचारिक योगदान देऊन ते स्थापन करणारी पिढी घडवणारे ‘सनातन प्रभात’ आहे. कलियुगांतर्गत कलियुगातील धर्मसंस्थापनेच्या, म्हणजेच येत्या काळातील हिंदु राष्ट्र स्थापनेच्या इतिहासात दैनिक ‘सनातन प्रभात’चे नाव सुवर्णाक्षराने लिहिले जाईल. ईश्वराने आम्हाला त्याच्या कार्यात खारीचा वाटा उचलण्याची संधी दिली, त्यासाठी ‘सनातन प्रभात’च्या कार्यासाठी वाहून घेतलेले आम्ही त्याच्या चरणी कृतज्ञ आहोत. राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती याचा वसा घेतलेल्या ‘सनातन प्रभात’ची घोडदौड अशीच चालू राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना !