हिंदु राष्ट्राच्या ध्येयाने वाटचाल करणारी दैनिक ‘सनातन प्रभात’ची समाजाभिमुख पत्रकारिता !
पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटले जाते; परंतु ‘लोकशाहीचा आधारस्तंभ’ म्हटले जाते, तेव्हा ती पत्रकारिता समाज घडवणारी आणि दिशादर्शक असणे अपेक्षित असते. सध्या मात्र व्यावसायिकतेने ग्रासलेल्या पत्रकारितेची खरी समाजाभिमुखता हरवली आहे. अशा स्थितीत दैनिक ‘सनातन प्रभात’ मागील २४ वर्षे समाजसाहाय्य, राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी व्रतस्थपणे पत्रकारिता करत आहे. या व्यावसायिक युगातही वार्ताहरांपासून वितरकांपर्यंत सर्वांकडूनच सेवाभावी वृत्तीने चालवण्यात येणारे दैनिक ‘सनातन प्रभात’ सार्या जगात एकमेवाद्वितीय ठरेल. भविष्यात समाजपरिवर्तनाच्या कार्यातील योगदानाचा विषय येईल, तेव्हा दैनिक ‘सनातन प्रभात’चे नाव अग्रणी असेल, हे निश्चित. हिंदु राष्ट्र स्थापनेच्या कार्यात समाजाभिमुख पत्रकारितेमधील दैनिक ‘सनातन प्रभात’चे प्रयत्न आपण या लेखाद्वारे पहाणार आहोत.
१. मोटार परिवहन विभागाला कृतीप्रवण करणारे वृत्तांकन !
सणासुदीला नियमबाह्य भरमसाठ तिकीटदर आकारून खासगी ट्रॅव्हल्सवाले प्रवाशांची आर्थिक लूट करतात. मागील अनेक वर्षे चालू असलेल्या या लूटमारीविषयी मोटार परिवहन विभागाचे (आर्.टी.ओ.) धोरण मात्र गुळमुळीत आहे. अन्य माध्यमांनी याविषयीची वृत्ते पूर्वी दिली होती. दैनिक ‘सनातन प्रभात’ने मात्र ही लूटमार थांबवण्यासाठी या विरोधात जनतेला कृतीप्रवण करणारे वृत्तांकन केले. आर्.टी.ओ.चा पाट्याटाकूपणा उघड करून ही आर्थिक लूट रोखण्यासाठीच्या उपाययोजना दैनिक ‘सनातन प्रभात’ने मांडल्या आणि त्याला काही प्रमाणात यशही मिळाले.
१ अ. बंद यंत्रणा चालू करण्यासाठी उठवलेला आवाज आणि मिळालेले यश !
‘आर्.टी.ओ.’ नागरिकांना तक्रार करण्याचे आवाहन करत होते; परंतु तक्रार नोंदवण्यासाठी आर्.टी.ओ.च्या संकेतस्थळावरील ‘लिंक’ आणि आर्.टी.ओ.चे ‘ॲप’ अनेक मासांपासून बंद होते. दैनिक ‘सनातन प्रभात’ने हा प्रकार उघड केला. एवढ्यावर न थांबता ‘राज्यातील आर्.टी.ओ. कार्यालयांत तरी तक्रारी स्वीकारण्याची व्यवस्था आहे का ?’ याचा आढावा घेण्यासाठी दैनिक ‘सनातन प्रभात’चे वार्ताहर जिल्ह्याजिल्ह्यांतील आर्.टी.ओ.च्या कार्यालयांमध्ये गेले. या वेळी बहुतांश कार्यालयांत तक्रार करण्यासाठी क्रमांक नव्हते. असल्यास बंद होते, तर काही ठिकाणी दूरभाष उचलण्यासाठी कुणीच नव्हते. हे सर्व प्रकार ‘सनातन प्रभात’ने उघड केले. ‘नागरिकांनी तक्रार करायची कुठे ?’, ‘तक्रार करण्यासाठी जिल्हा पातळीवर कार्यालयात यायचे का ?’ हे प्रश्न दैनिक ‘सनातन प्रभात’ने उपस्थित करून तक्रार स्वीकारण्यासाठी सुलभ व्यवस्था निर्माण करण्याचे आवाहन केले. या वृत्तातून प्रेरणा घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या ‘सुराज्य अभियाना’च्या शिष्टमंडळाने परिवहन विभागाच्या आयुक्तांची भेट घेऊन त्यांच्यापुढे हे सूत्र मांडले. परिवहनमंत्र्यांना याविषयीचे निवेदन दिले.
या सर्वांचा परिणाम म्हणजे राज्यशासनानेही स्वतंत्र आदेश काढून मोटार परिवहन विभागाच्या संकेतस्थळावरील बंद असलेली तक्रार नोंदवण्याची ‘लिंक’ आणि ‘ॲप’ यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी एका वर्षासाठी २२ लाख ७४ सहस्र रुपयांची तरतूद करून त्याचे दायित्व ‘महाआयटी’कडे दिले आहे.
१ आ. अन्यायाच्या विरोध आवाज उठवण्यासाठी उद्युक्त करणारे वृत्तांकन !
खासगी ट्रॅव्हल्समध्ये तिकीटदर आकारतांना एस्.टी.च्या बसगाडीच्या तुलनेत दीडपटीपर्यंत तिकीटदर आकारण्याला शासनाची अनुमती आहे; परंतु हा नियम न पाळता खासगी ट्रॅव्हल्सवाले भरमसाठ पैसे आकारतात, तरीही नागरिक त्या विरोधात आवाज उठवत नाहीत अन् तक्रारीही करत नाहीत. यामुळेच हे अपप्रकार वाढत आहेत. हे लक्षात घेऊन दैनिक ‘सनातन प्रभात’ने नागरिकांना याविरोधात आवाज उठवण्याचे आवाहन केले. यासाठी जिल्ह्याजिल्ह्यांतील आर्.टी.ओ. कार्यालयांचे संपर्क क्रमांक, लेखी तक्रारीसाठी पत्ते आणि तक्रार करण्यासाठी अर्जाचा नमुना ‘सनातन प्रभात’च्या संकेतस्थळावरील वृत्तामध्ये प्रसिद्ध करून अन्यायाच्या विरोधात आवाज उठवण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले.
२. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणाविरोधातील जनआंदोलन हा दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्तांकनाचा परिणाम !
गड-दुर्ग यांवरील मजार, थडगी आणि त्यांवर उभे रहात असलेले दर्गे या इस्लामिक आक्रमणाची भयावहता दैनिक ‘सनातन प्रभात’मधून उघड करण्यात आली. लोहगड (पुणे), कुलाबा, रायगड, दुर्गाडी, श्रीक्षेत्र मलंगगड, गणेश-पार्वती पर्वत, माहीमगड, विशाळगड, चंदन-वंदन गड या गडांवरील इस्लामी अतिक्रमणाविषयीची लेखमाला दैनिक ‘सनातन प्रभात’मधून प्रसिद्ध करण्यात आली. यामागील इस्लामी षड्यंत्र आणि पुरातत्व विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष यांविषयी सातत्याने लिखाण करण्यात आले.
याचा परिणाम म्हणजे गड-दुर्ग यांवरील इस्लामी अतिक्रमणाची भयावहता समस्त हिंदु समाजापर्यंत पोचली. आज गड-दुर्ग यांवरील इस्लामी अतिक्रमणाच्या विरोधात राज्यात व्यापक आंदोलन उभे राहिले आहे. समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटना, शिवप्रेमी यासाठी एकत्र आले आहेत. शासनानेही गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणाचे सर्वेक्षण करून त्याविरोधात कारवाई चालू केली. गड-दुर्ग यांच्या संवर्धनासाठी महामंडळ स्थापन करण्याची हिंदुत्वनिष्ठांची मागणी राज्यशासनाकडून मान्य करण्यात आली. गड-दुर्ग यांवरील या इस्लामी धोक्याच्या विरोधात आवाज उठवण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’चे योगदान मोलाचे ठरले !
३. बसस्थानकाच्या स्वच्छता मोहिमेचे खरे स्वरूप उघड करणारे वृत्तांकन !
सर्वसामान्यांसाठी अहोरात्र सेवारत असलेल्या एस्.टी.चे वर्ष २०२३ हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. यानिमित्त एस्.टी. महामंडळाने बसस्थानक स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला ४ मास झाले असूनही राज्यातील बहुतांश बसस्थानकांची स्थिती अत्यंत विदारक आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वार्ताहरांनी राज्यातील काही मुख्य बसस्थानकांवर जाऊन ‘बसस्थानक स्वच्छता’ मोहिमेचा आढावा घेतला. ७५ वर्षांनंतरही अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याची असुविधा, अपुरी आसनव्यवस्था, अस्वच्छ प्रसाधनगृहे, अशी बसस्थानकांची विदारक स्थिती आहे. याविषयी वृत्तमाला चालू करून दैनिक ‘सनातन प्रभात’ राज्यातील प्रमुख बसस्थानकांची छायाचित्रांसह विदारक स्थिती मांडत आहे. अमृत महोत्सवी वर्षानिमित्त तरी ‘एस्.टी. बसस्थानकांची स्वच्छता व्हावी आणि नागरिकांना किमान सुविधा उपलब्ध व्हाव्यात’, हाच यामागे ‘सनातन प्रभात’चा हेतू आहे.
वेगवेगळ्या क्षेत्रांत एक आदर्श व्यवस्था निर्माण होण्यासाठी पत्रकारितेच्या माध्यमातून प्रयत्न होत असतो, तेव्हा खर्या अर्थाने पत्रकारिता हा लोकशाहीचा ‘आधारस्तंभ’ ठरत असतो. हिंदु राष्ट्राची संकल्पना ही एक ‘आदर्श व्यवस्था’च आहे. ‘समाजात अन्यायाविरोधात चीड निर्माण करणे आणि नागरिकांना आदर्श व्यवस्था निर्माण करण्यास प्रेरित करणे’, हीच खरी समाजाभिमुख पत्रकारिता होय. त्या दिशेने वाटचाल करत दैनिक ‘सनातन प्रभात’ हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी लेखणीच्या माध्यमातून योगदान देत आहे. दैनिक ‘सनातन प्रभात’मधील विचारांचे अनुसरण करणारा त्याचा वाचकवर्ग हाही या आदर्श व्यवस्थेमधील एक भाग ठरेल !
– श्री. प्रीतम नाचणकर, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, मुंबई. (२.४.२०२३)