नवी मुंबईच्या उपनगरांतील समस्या सोडवण्यात दैनिक ‘सनातन प्रभात’चा वाटा !
‘एखाद्या समस्येच्या मुळाशी जाऊन ती समस्या सोडवण्यासाठी सातत्याने आणि चिकाटीने पाठपुरावा केल्यामुळे ती समस्या लवकरात लवकर मार्गी लागण्यास साहाय्य होते’, हे सनातनच्या पत्रकारितेचे महत्त्वाचे सूत्र लक्षात घेऊन त्यानुसार प्रत्येक समस्येकडे पहाण्याचा प्रयत्न आम्ही केला. नवी मुंबईतील विविध ठिकाणी रस्त्यांवर पडणारे खड्डे, पदपथ बळकावणारे फेरीवाले, उद्यानांची दुरवस्था, स्वच्छतेचा अभाव यांमुळे निर्माण होणारे आरोग्याचे प्रश्न, अनधिकृत बांधकामे यांसह अनेक प्रश्नांवर ‘सनातन प्रभात’मधून वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर त्या समस्या सुटण्यास साहाय्य झाले. संकलक : श्री. विजय भोर, प्रतिनिधी, दैनिक ‘सनातन प्रभात’, नवी मुंबई |
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वृत्तांचा परिणाम !
१. तुर्भे गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांच्या कारणांच्या मुळाशी जाऊन वृत्त देणे आणि प्रशासनाने दुरुस्तीचे काम हाती घेणे
तुर्भे गावातील अंतर्गत आणि मुख्य रस्ते यांवर पुष्कळ प्रमाणात खड्डे पडले होते. त्यामुळे स्थानिक रहिवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. याविषयी ‘सनातन प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. त्याची नोंद घेत शहर अभियंता विभागाकडून या रस्त्यांची दुरुस्ती करण्याचे काम करण्यात आले.
या प्रकरणातील वृत्तामध्ये स्थानिक समस्या नेमकी कोणत्या कारणामुळे निर्माण झाली आहे ? याच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला. ‘या ठिकाणचे काही व्यावसायिक प्रतिदिन उपाहारगृह स्वच्छ करून त्याचे घाण पाणी रस्त्यावर टाकत आहेत’, असे लक्षात आले. अन्य ठिकाणीही पाणी भरण्याच्या टँकरमधून प्रतिदिन पाणी रस्त्यावर पडत असल्याने त्या ठिकाणच्या रस्त्याची चाळण झाली होती. यामध्ये तांत्रिकदृष्ट्या डांबर आणि पाणी परस्परविरोधी असल्यानेच रस्त्यावर वारंवार खड्डे पडत असल्याचे लक्षात आले. याविषयी स्थानिक नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने त्यांनाही संताप येत होता; मात्र स्थानिक लोकप्रतिनिधी किंवा प्रशासन याकडे दुर्लक्ष करत होते. हे वृत्त प्रसिद्ध करण्यापूर्वी संबंधित लोकप्रतिनिधींना भ्रमणभाषवरून संपर्क केला, संदेश पाठवला; मात्र त्यांनी याला अपेक्षित प्रतिसाद दिला नाही. हेही वृत्तात नमूद केले.
याविषयी संबंधित विभागाचे उपअभियंता, कार्यकारी अभियंता यांच्या निदर्शनास आणले. तसेच ‘सनातन प्रभात’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर ते शहर अभियंता, तसेच सर्व संबंधित अधिकार्यांना पाठवले. त्याचप्रमाणे ज्या परिसरात ही समस्या उद्भवली होती, तेथील ग्रामस्थांनाही ‘सनातन प्रभात’मधील वृत्ताची ‘पोस्ट’ पाठवली. या ग्रामस्थांनी समाजमाध्यमांत ही ‘पोस्ट’ प्रसारित केली. परिणामी प्रशासनाने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले ! सध्या या रस्त्याच्या काँक्रीटीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे !
२. तुर्भे येथील उद्यानाच्या दुःस्थितीविषयी वृत्त दिल्यावर महापालिकेने विविध कामे करून सुधारणा करणे
तुर्भे येथील उद्यानाची ठेकेदाराकडून योग्य प्रकारे देखभाल केली जात नसल्याचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आल्यावर उद्यान विभागातील अधिकार्यांनी त्याच दिवशी नोंद घेतली आणि उद्यानातील वाढलेल्या वृक्षांची छाटणी करणे, कचरा काढणे, धोकादायक झालेल्या दरवाजाची दुरुस्ती करणे आदी कामे तत्परतेने केली !
३. तुर्भे आणि वाशी येथील अनधिकृत विज्ञापनांच्या फलकांविषयी वृत्त दिल्यावर ते हटवणे
शहरात अनधिकृत जाहिरात फलक लावण्यात आल्याने शहराच्या होणार्या विद्रूपीकरणाविषयी वृत्त दिले. महापालिकेकडे शुल्क भरून हे फलक लावणे बंधनकारक आहे. असे असतांनाही सर्वच राजकीय पक्षांचे नेते आणि खासगी आस्थापने त्यांच्या उत्पादनांची विज्ञापने कोणतेही शुल्क न भरता विनाअनुमती लावतात. अतिक्रमण विरोधी विभागाचे कर्मचारी कधी राजकीय दबावाने, तर कधी ‘अर्थपूर्ण संबंधाने’ या विज्ञापनांच्या फलकांवर कारवाई करत नसल्याचे निदर्शनास आले.
याविषयी वृत्त प्रसिद्ध होताच अतिक्रमणविरोधी विभागाच्या कर्मचार्यांनी हे अनधिकृत फलक काढून टाकण्याची कारवाई केली. वास्तविक हे फलक काढल्यावर संबंधितांवर दंडात्मक कारवाई करणे किंवा त्याच्या विरोधात गुन्हे नोंद करणे ही कारवाई करणे अपेक्षित असते; मात्र लिपिकापासून ते आयुक्तांपर्यंत सर्वच जण या प्रकरणी दुर्लक्ष करतांना दिसतात. एकंदरीत याविषयी जनहित याचिका प्रविष्ट करून न्यायालयानेच अशा प्रकारे कर्तव्यात कसूर करणार्या अधिकार्यांवर कठोर कारवाई केली, तरच या गोष्टींना आळा बसू शकेल.