गड-दुर्गांच्या संवर्धनासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही ! – पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुण्यतिथी सोहळा पार पडला !
रायगड – रायगडासह अन्य गड-दुर्गांचे संवर्धन आणि साकारण्यात येणारे शिवसृष्टीसारखे प्रकल्प यांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, असे आश्वासन राज्याचे पर्यटनमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केले. तिथीनुसार हनुमान जयंतीच्या दिवशी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ आणि स्थानिक उत्सव समिती यांच्या वतीने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांची ४३४ वी पुण्यतिथी साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला मंत्री लोढा बोलत होते.
ते पुढे म्हणाले, ‘‘छत्रपती शिवाजी महाराज यांच्या निधनाला ३४३ वर्षे होऊनही त्यांची कीर्ती न्यून झालेली नाही. पुढील सहस्रावधी वर्षे त्यांची कीर्ती वाढतच राहील. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तृत्वामुळे आज आपण ‘हिंदु’ म्हणून अभिमानाने जगू शकतो अन्यथा सर्वांची सुंता झाली असती. येत्या २ जून या दिवशी साजर्या होणार्या शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने निघणार्या रथयात्रांना पर्यटन विभाग गावोगावी सहकार्य करेल.’’
या वेळी मंगलप्रभात लोढा यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले. रायगड पोलिसांच्या वतीनेही या वेळी शिवरायांना मानवंदना देण्यात आली. या वेळी आमदार भरतशेठ गोगावले, आमदार प्रशांत ठाकूर, माजी आमदार धैर्यशील पाटील, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे, सरकार्यवाह पांडुरंग बलकवडे या मान्यवरांसह कार्यक्रमाला सहस्रावधी शिवप्रेमी उपस्थित होते. किल्ले रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या हिरकणी गावात उभारण्यात येत असलेल्या ‘हिरकणी’ स्मारकाचे भूमीपूजन मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते करण्यात आले.
मान्यवरांचा सन्मान आणि पुरस्कारांचे वितरण !
या प्रसंगी सैन्यदलातील अधिकारी आणि सरदार घराणे यांचा सन्मान, गडरोहण स्पर्धा पारितोषिक वितरण, श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार वितरण, शिवरायमुद्रा स्मरणिका प्रकाशन, राजदरबार ते शिवरायांच्या समाधीपर्यंत शिवरायांच्या प्रतिमेची पालखीतून मिरवणूक, श्री छत्रपतींना मानवंदना, महाप्रसाद आदी कार्यक्रम पार पडले.