नृत्य आणि गायन स्पर्धा कार्यक्रमांची जाणवलेली विदारक स्थिती अन् त्याचा स्पर्धकांवर होणारा परिणाम आणि त्यासाठी असलेली साधनेची आवश्यकता !
‘भारतीय संगीत’ ही ईश्वराने मानवाला दिलेली एक ‘दैवी देणगी’ आहे. कलेचा मूळ उद्देश ‘ईश्वरप्राप्ती’ हा आहे. स्वतःचा अहंकार त्यागून अखंड ईश्वराच्या अनुसंधानात राहून कलेतून अखंड ईश्वराची अनुभूती घेता येणे, म्हणजेच ‘कलेतून ईश्वरप्राप्ती साधणे’, असे म्हणता येईल. सध्याच्या गायन, वादन आणि नृत्य या क्षेत्रांतील कलाकारांच्या स्थितीचा अभ्यास केल्यास आताच्या नवोदित कलाकारांची कलेतून भौतिक सुख मिळवणे, विविध स्पर्धांत सहभागी होऊन प्रसिद्धी मिळवणे, स्वतःचे वेगळे अस्तित्व आणि श्रेष्ठत्व निर्माण करणे अन् इतरांच्या समवेत स्पर्धा करणे, अशीच मानसिकता दिसते. याला एक कारण म्हणजे विविध कार्यक्रमांची (रिॲलिटी शोज्ची) आलेली लाट होय.
सध्या होणारे काही कार्यक्रम माझ्या पहाण्यात आले. यातील काही परीक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलेला दिलेला विक्षिप्त प्रतिसाद, स्पर्धकांचे केलेले अवास्तव कौतुक, परीक्षक आणि पालक यांची स्पर्धात्मक मानसिकता हे पाहून माझे मन उदास झाले. कला स्पर्धामय करून तिच्या मूळ ‘ईश्वरप्राप्ती’ या उद्देशापासून आपण कित्येक कोस दूर जात असल्याचे जाणवले. या कार्यक्रमामध्ये परीक्षकांच्या होणार्या विक्षिप्त कृतींची काही उदाहरणे, त्यातून परीक्षकांची दिसणारी विदारक स्थिती, त्यांच्या अशा वागण्यामुळे विद्यार्थ्यांना मिळणारी चुकीची दिशा, तसेच खर्या ईश्वराधिष्ठित कलेच्या जोपासनेची आवश्यकता यांविषयी देवाने सुचवलेले विचार येथे दिले आहेत.
१. संगीताच्या स्पर्धात्मक कार्यक्रमांतील जाणवलेले अयोग्य प्रकार
१ अ. गायन स्पर्धा कार्यक्रमात मतांच्या आधारे निवड प्रक्रिया असणे आणि उत्तम गायकाला स्पर्धेतून बाहेर पडावे लागणे : ‘काही गायन स्पर्धा कार्यक्रमात निवड प्रक्रियेसाठी दर्शकांची मते घेतली जातात. ज्या स्पर्धकाला अधिक मते मिळतात, तो स्पर्धेत पुढे टिकून रहातो; मात्र ज्यांना अल्प मते मिळतात, त्यांना स्पर्धेतून बाहेर पडावे लागते. अशा वेळी एखादा उत्तम गायकही दर्शकांच्या मतांमुळे बाहेर पडू शकतो, उदा. कार्यक्रमातील एका उत्तम शास्त्रीय गायकाला अल्प मते मिळाली, तर दुसर्या पॉप, जॅझ (पाश्चात्त्य गायन प्रकार) गायन करणार्या स्पर्धकाला दर्शकांची अधिक मते मिळाली. त्यामुळे शास्त्रीय गायक उत्तम गात असूनही त्याला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ही पद्धत पाहिल्यावर मला असे वाटले, ‘जरी एखाद्या स्पर्धकाला अधिक मते पडली, तरी गायन स्पर्धेतील निरीक्षण हे परीक्षकाचे दायित्व आहे; कारण परीक्षकाचे मत हे अंतिम असते. अशामुळे खरोखर कष्ट घेऊन आपल्या कौशल्याने जे रंगमंचावर येतात, त्यांची हानी होऊ शकते.
१ आ. शास्त्रीय गायक स्पर्धकाला ‘तू शास्त्रीय न गाता, अन्यही प्रकार गा !’ असे आग्रहपूर्वक सांगणे : एका कार्यक्रमात एका शास्त्रीय गायक स्पर्धकाला परीक्षकाने सांगितले, ‘‘तू कायम शास्त्रीय गाऊ नकोस. पाश्चात्त्य गीतेही गा.’’
(‘जो स्पर्धक सात्त्विक भारतीय शास्त्रीय संगीत उत्तमरित्या शिकत आहे, त्याला पाश्चात्त्य संगीताकडे वळवणे, म्हणजे एकप्रकारे त्याला शास्त्रीय गायनापासून परावृत्त केल्यासारखेच म्हणता येईल. यावरून ‘परीक्षकांची भारतीय शास्त्रीय संगीताची अभिरूची अल्प आहे का ?’, अशी शंका येते.’ – संकलक)
१ इ. काही दर्शकांनी पाश्चात्त्य गीते गाणार्या स्पर्धकावर टीका केल्यावर परीक्षकांनी त्यांना सांत्वनपर मार्गदर्शन करणे : वरील कार्यक्रमामध्ये दर्शकांनाही आपली मते मांडण्याचा अधिकार असतो. यातील काही दर्शकांनी पाश्चात्त्य गीते गाणार्या स्पर्धकाविषयी त्यांची टीकात्मक मते व्यक्त केली. यावर परीक्षक त्या विद्यार्थ्याला सांत्वनपर मार्गदर्शन करतांना म्हणाले, ‘‘हे बघ, इतर काय बोलतात, याकडे तू लक्ष देऊ नकोस. तुला ठाऊक आहे की, तू चांगले गात आहेस. तू ‘जन्मजात तारा’ (Born Star) आहेस.’’
१ ई. एका नृत्य स्पर्धा कार्यक्रमात स्पर्धकांसह सूत्रसंचालकापासून ते परीक्षकापर्यंत सर्व जण एकमेकांची अयोग्य भाषेत खिल्ली उडवतात.
(‘अशा प्रकारे कार्यक्रमाच्या ठिकाणी एकमेकांची खिल्ली उडवण्यासारखे प्रकार करून ते एकप्रकारे रंगमंच देवतेचा अपमानच करत आहेत.’ – संकलक)
१ उ. परीक्षकाने स्पर्धक मुला-मुलींना एकमेकांच्या नावाने चिडवणे, तसेच ‘कसा जोडीदार हवा आहे ?’ यासारखे निरर्थक प्रश्न विचारणे : काही नृत्य आणि गायन स्पर्धा कार्यक्रमात असे निदर्शनास आले आहे की, युवा-स्पर्धक मुला-मुलींना एकमेकांच्या नावाने चिडवले जाते. स्पर्धक मुला-मुलींना प्रश्न विचारले जातात की, ‘‘तुला कसा जोडीदार हवा आहे ?’’ हा प्रश्न प्रेक्षकांमध्ये उपस्थित स्पर्धकांच्या नातेवाइकांनाही विचारला जातो. उदा. ‘तुमच्या मुलाला कशी मुलगी अपेक्षित आहे ?’ याचा परिणाम म्हणजे या स्पर्धकांच्या मनात एकमेकांविषयी अनावश्यक आकर्षण निर्माण होते.
(‘स्पर्धकांना कलेतील ज्ञान देण्यापेक्षा असे निरर्थक आणि नैतिक मूल्यविरहित प्रश्न विचारून परीक्षक स्पर्धकांना वेगळ्याच दिशेने नेऊन त्यांच्या कलेची दिशा भरकटवत आहे’, असे जाणवते.’ – संकलक)
१ ऊ. स्पर्धकांना विविध टोपण नावे (Nick Name) ठेवणे : स्पर्धकाला रंगमंचावर बोलावतांना हास्यास्पदरित्या बोलावले जाते. एका स्पर्धकाचे आगमन होत असतांना सूत्रसंचालक त्याला म्हणतो, ‘आ रहे हैं, ‘सूरों के बाहुबली !’
१ ए. एखाद्या शांत प्रवृत्तीच्या स्पर्धकाला ‘हा आज आपल्याला प्रणय (रोमान्स) शिकवेल ’, असे म्हणून त्याला तसे करण्यास उद्युक्त करणे : एखादा स्पर्धक शांत किंवा लाजाळू असतो. त्याला बोलते करण्यासाठी ‘‘तुला प्रणयविषयी काही ठाऊक आहे का ?’’ सर्वांसमोर त्याच्याविषयी सांगितले जाते, ‘‘अमूक एक गायिका या कलाकाराला प्रणय (रोमान्स) शिकवेल !’’ अशा प्रकारे त्या स्पर्धकाची शांत प्रवृत्ती नष्ट करून असे निरर्थक प्रश्न विचारून त्याला बोलते करण्याचे प्रयत्न केले जातात.
(‘यावरून ‘या क्षेत्रातही किती विकृती पसरली आहे’, हेच प्रत्ययास येते.’ – संकलक)
१ ऐ. गुलाब देऊन प्रेमाची विचारणा करणे : काही वेळा पुरुष स्पर्धक स्त्री स्पर्धकांना गुलाब देऊन प्रेमाची विचारणा करतात. त्यामुळे हे बघणार्या अन्य लहान स्पर्धक आणि बालप्रेक्षक यांच्यावरही त्याचा विपरित परिणाम होऊ शकतो. अशा कृती करण्यास परीक्षक, प्रेक्षक आणि पालक यांपैकी कोणीही थांबवत नाही.
(‘असे अपप्रकार घडण्यापासून परीक्षकांनी स्पर्धकाला थांबवले पाहिजे. यामुळे स्पर्धक त्याच्या कलेपासून भरकटू शकतो.’ – संकलक)
१ ओ. बालकलाकाराने चित्रपटातील नायक, खलनायक आणि गुंड यांचे संवाद बोलून दाखवणे अन् परीक्षकालाही अयोग्य शब्दात संबोधणे : अनेक स्पर्धा कार्यक्रमात या बालकलाकारांना अगदी मोठ्यांप्रमाणे बोलायला शिकवलेले असते, जे त्यांच्या वयाला शोभत नाही. एका प्रसिद्ध नृत्य-स्पर्धा कार्यक्रमात अवघ्या ७ – ८ वर्षे वयाच्या बालकलाकारांनी चित्रपटातील नायक, खलनायक आणि गुंड यांचे संवाद बोलून दाखवले. या प्रसिद्ध कार्यक्रमात ७ – ८ वर्षे वयाच्या बालकलाकाराने परीक्षकांना एका चित्रपटातील नायिकेच्या नावाने संबोधले. हा मुलगा अवघा ७ -८ वर्षांचा असून त्याच्यापेक्षा परीक्षक महिला वयाने आणि अनुभवाने कितीतरी मोठ्या होत्या. मोठ्यांशी अशा प्रकारे अयोग्य शब्दांत बोलल्यावर त्याला कुणीही हटकले नाही. त्या मुलाला परीक्षकाने ‘तुला मोठे होऊन काय बनायचे आहे ?’, असे विचारल्यावर ‘फाडू ॲक्टर’ (प्रसिद्ध नट) बनायचे आहे’, असे त्याने सांगितले.
(‘बालवयात अशा स्पर्धांमुळे मुलांवर किती अयोग्य संस्कार होतात, याचे हे उदाहरण म्हणू शकतो.’ – संकलक)
२. कार्यक्रमामध्ये परीक्षकांच्या घडणार्या विक्षिप्त कृती
२ अ. किंचाळून गाणे आवडल्याचे व्यक्त करणे : एखाद्या स्पर्धकाचे गायन आवडल्यास हे परीक्षक किंचाळतात. या किंचाळण्याचा अर्थ असतो की, ‘त्यांना गायन आवडले आहे.’ काही परीक्षक गाणे चालू असतांनाच मध्येच किंचाळतात. एखाद्याचे गायन चालू असतांना ते पूर्ण न ऐकता मध्येच काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करणे, हे संयम नसल्याचे लक्षण आहे. ‘मध्येच किंचाळल्यामुळे तो गायक विचलित होऊ शकतो’, असे मला वाटले.
२ आ. वय आणि अनुभव यांनी मोठे असणार्या परीक्षकांनी समोरच्या पटलावर उभे राहून विविध प्रकारे कृती करून प्रतिसाद देणे : काही स्पर्धांमध्ये असे आढळले आहे की, परीक्षक स्वतः आपल्या समोरील पटलावर उभे रहातात आणि टाळ्या (Standing Ovation)(उभे राहून कौतुक करणे) वाजवतात किंवा सलाम (Hats Off) केला जातो.
– कु. म्रिणालिनी देवघरे, भरतनाट्यम् विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२८.५.२०२१)
(क्रमशः)