वाल्मिकराव दळवी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रहित !
|
छत्रपती संभाजीनगर – जिल्ह्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाच्या पदवी परीक्षेत चक्क सामूहिक कॉपी चालू असल्याचा प्रकार एका विद्यार्थिनीने समोर आणला होता. या वेळी पदवी परीक्षेत विद्यार्थ्यांकडून ३०० ते ५०० रुपये घेऊन उत्तरपत्रिका पुन्हा लिहिण्यास देण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. या सर्व प्रकरणाची विद्यापीठ प्रशासनाने गंभीर नोंद घेतली असून कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांनी जिल्ह्यातील शेंद्रा येथील वाल्मिकराव दळवी महाविद्यालयाचे परीक्षा केंद्र रहित करण्याचे आदेश दिले आहेत, तर या सर्व प्रकरणाच्या चौकशीसाठी विद्यापीठ प्रशासनाने डॉ. भालचंद्र वायकर यांच्या अध्यक्षतेखाली त्रिस्तरीय चौकशी समिती गठीत केली आहे.
वाल्मिकराव दळवी कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्राशेजारी सामूहिक कॉपी चालू असल्याचा आरोप एका विद्यार्थिनीने केला होता. महाविद्यालय परिसरातील फोटो स्टुडिओ आणि झेरॉक्स दुकानदार यांच्याकडून हे सर्व पेपर दिले जात असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. सकाळी पेपर लिहितांना कोरा ठेवायचा आणि पैसे देऊन पुन्हा तोच पेपर संध्याकाळी कॉपी करून लिहून द्यायचा, असे येथे चालू होते.