सकल जैन समाजाकडून आयोजित रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद !
गेवराई (जिल्हा बीड), ५ एप्रिल (वार्ता.) – जगाला अहिंसेचा संदेश देणारे भगवान महावीर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जिल्ह्यासह गेवराई शहरात विविध कार्यक्रम पार पडले. महावीर जयंतीच्या निमित्ताने शहरात जैन समाजबांधवांकडून भव्य शोभायात्रा काढण्यात आली, तर सांस्कृतिक कार्यक्रमासह अन्नदान, भव्य रक्तदान शिबिर, तसेच व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी बालक आणि युवा यांना व्यसनमुक्तीची शपथ देऊन त्यांचे व्यसन सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले.
गेवराई किराणा व्यापारी संघटना आणि ‘आसरा फाऊंडेशन’ यांकडून बॅनरद्वारे व्यसनमुक्तीसाठी जागृती करण्यात आली. या वेळी समस्त राजस्थानी समाज, दिंगबर समाज आणि श्वेतांबर समाज यांचे प्रतिष्ठित उपस्थित होते. बीड शासकीय रुग्णालयाकडून रक्तपेढीची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली. रक्तदान शिबिर आणि व्यसनमुक्ती शिबिर यशस्वी करण्यासाठी सर्वश्री अभिजित काला, अमर गंगवाल, कल्याण पैठणे आदींनी परिश्रम घेतले.