पुणे येथील संगमवाडी नदीपात्रात सापडलेले शिवपिंड २५० वर्षांपूर्वीचे ! – इतिहास अभ्यासक समीर निकम
पुणे – येथे ‘नदी सुधार प्रकल्पा’च्या अंतर्गत येथील संगमवाडी परिसरातील मुळा-मुठा नदीचा संगम असलेल्या ठिकाणी खोदकाम चालू असतांना २५० वर्ष जुनी शंकराची पिंड सापडली आहे. यासमवेतच ब्रिटीशकालीन धातूची बंदूकही आढळली आहे. या खोदकामाच्या दरम्यान सापडलेले शिवलिंग प्राचीन आहेत. काही अंतरावरच संगमेश्वर मंदिर होते. वर्ष १९६२ मध्ये हे मंदिर पुराच्या पाण्यात वाहून गेले होते. त्याच मंदिराचे हे अवशेष आहेत. साधारण २५० ते ३०० वर्ष जुने हे शिवलिंगाचे अवशेष आहेत, असे इतिहास अभ्यासक समीर निकम यांनी सांगितले.
इतिहास अभ्यासक समीर निकम यांनी सांगितलेली अन्य सूत्रे
१. मागील अनेक वर्षांपासून समीर निकम आणि इतिहास अभ्यासक मंदार लव्हाटे हे अवशेष शोधण्यासाठी पाठपुरावा करत आहेत; मात्र ‘नदी सुधार प्रकल्पा’च्या अधिकार्यांनी हे अवशेष शोधण्यात साहाय्य करणार असल्याचे अभ्यासकांना सांगितले. त्यामुळे प्रतिदिन खोदकामाच्या दरम्यान या अवशेषांकडे लक्ष ठेवले जात आहे.
२. पुरातत्व विभागाकडे अशा प्रकारचे अनेक अवशेष सापडू शकतात, असे सांगून त्यांच्याकडे मागील १५ वर्षांपासून पाठपुरावा चालू आहे; मात्र अजूनही पुरातत्व विभागाचे अधिकारी अवशेष सापडलेल्या ठिकाणी पहाणी करण्यासाठी आलेले नाहीत. त्यामुळे हे सगळे सापडलेले अवशेष इतिहास संशोधक मंडळाकडे सुपूर्द करत असल्याचे निकम यांनी सांगितले आहे.
(राज्यात पुरातत्व विभाग सक्षमपणे कार्यरत नसल्याचे हे उदाहरण आहे. काळाच्या ओघात गडप झालेल्या वास्तू किंवा साहित्य यांच्या विषयीचा सत्य इतिहास समोर आणण्याचे कार्य पुरातत्व विभागाने करणे अपेक्षित आहे; मात्र भारतातील पुरातत्व विभाग त्या दृष्टीने काहीच करतांना दिसत नाही, हे चिंताजनक आणि दुर्दैवी आहे ! – संपादक)