चैत्र यात्रेसाठी लाखो भाविक उपस्थित !
पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांसाठी विविध सुविधा !
कोल्हापूर – पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या वतीने भाविकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पोलीस विभागासाठी ठिकठिकाणी टेहळणी मनोरे, स्वतंत्र ध्वनीक्षेपण यंत्रणा, श्रीफळ फोडण्यासाठी मंदिर परिसरात विशेष स्टँड, डोंगर पायथ्याच्या वाहनतळापासून डोंगरावर जाण्यासाठी ४० विनामूल्य बसची सुविधा, यात्रा कालावधीत कोणतेही वाहन बंद पडल्यास आणि इतर अत्यावश्यक सेवेसाठी २ क्रेन, ३० बिनतारी संदेशवहन यंत्रणा, दर्शन मंडप ठिकाणी रांगेतील भक्तांना थेट प्रक्षेपण, शिवाजी चौक आणि सेंट्रल प्लाझा येथील स्क्रिनद्वारे थेट प्रक्षेपण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. चैत्र यात्रेसाठी पहिल्या दिवशी लाखो भाविक उपस्थित होते.
संपूर्ण परिसरात लक्ष ठेवण्यासाठी १४० ध्वनीचित्रक बसवण्यात आले असून जे भाविक येऊ शकणार नाहीत, त्यांच्यासाठी फेसबुक, यू ट्यूब यांद्वारे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. श्री जोतिबाच्या दर्शनासाठी भाविकांची पावले आता जोतिबा डोंगराकडे वळत असून शहरातून वाजत-गाजत सासनकाठ्या डोंगराकडे जात आहेत. अनेक सेवाभावी संस्थांच्या वतीने अन्नछत्र, विनामूल्य पाणीवाटप, वाहनांचे विनामूल्य पंक्चर काढून देणे, रुग्णवाहिका, तसेच अन्य सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
‘यात्रेच्या निमित्ताने श्री महालक्ष्मीदेवीच्या दर्शनासाठी आणि श्री क्षेत्र जोतिबा येथे येणार्या भाविकांसाठी श्री महालक्ष्मी अन्नछत्राची वेळ १ घंटा वाढवण्यात आली आहे. प्रतिदिन सुमारे ७ सहस्र भाविक विनामूल्य अन्नछत्राचा लाभ घेतील, अशी व्यवस्था आहे’, असे अध्यक्ष श्री. राजू मेवेकरी यांनी सांगितले.