सद्गुरु स्वाती खाडये आणि पू. (कु.) दीपाली मतकर यांच्या सहवासाचा लाभ करून घेऊन तो आनंद अन् चैतन्य कुटुंबियांना अनुभवायला देणारी अकलूज (जिल्हा सोलापूर) येथील कु. प्रीती चोरमले (वय २३ वर्षे) !
‘माझी मुलगी कु. प्रीती हिचा आज चैत्र पौर्णिमेला वाढदिवस आहे. ती काही दिवसांसाठी सोलापूर येथील सेवाकेंद्रात रहायला गेली होती. तिथून ती घरी परत आल्यावर तिच्याशी बोलतांना मला जाणवलेली सूत्रे आणि तिच्यात जाणवलेले पालट येथे दिले आहेत.
कु. प्रीती चोरमले हिला २३ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा !
१. ‘प.पू. गुरुदेवांच्या आठवणी ऐकतांना भावजागृती होऊन दैवी लोकात आहे’, असे वाटून आनंद मिळणे
पू. (कु.) दीपालीताई रात्री झोपतांना प्रीतीला प.पू. गुरुदेवांच्या आठवणी सांगत असत. घरी परत आल्यावर प्रीती आम्हाला त्या आठवणी सांगत असतांना आमची भावजागृती होत होती. तेव्हा ‘आम्ही घरात नसून दैवी लोकात आहोत’, असे वाटून आम्हाला पुष्कळ आनंद मिळाला.
२. संतांविषयी अनुभूती सांगतांना घरात चैतन्य पसरणे
प्रीती आम्हाला सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु स्वाती खाडये) आणि पू. (कु.) दीपालीताई (पू. (कु.) दीपाली मतकर) यांच्याविषयी सांगायची, ‘तेव्हा घरामध्ये पुष्कळ चैतन्य पसरत आहे’, असे मला जाणवायचे. तिला सद्गुरु स्वातीताई आणि पू. दीपालीताई यांच्याविषयी पुष्कळ आदरभाव जाणवत आहे.
३. प्रीतीमध्ये जाणवलेले पालट !
३ अ. आध्यात्मिक सौंदर्यामुळे सुंदर दिसणे : प्रीती सेवाकेंद्रातून घरी परत आल्यापासून तिचा चेहरा आध्यात्मिक सौंदर्यामुळे पुष्कळ सुंदर दिसत आहे. ‘जणूकाही छोटी दीपालीताई घरी आली आहे’, असे मला वाटते.
३ आ. नम्रता आणि सहजता यांत वाढ होणे : प्रीतीचे बोलणे मृदू झाले आहे. तिच्यातील नम्रपणा वाढला आहे. सेवा आणि स्वयंपाक करतांना तिच्यात सहजता वाढली आहे. प्रीतीचे बोलणे, चालणे आणि वागणे पूर्वीपेक्षा अधिक चांगले वाटते.
३ इ. अभ्यास अणि सेवा सांभाळून आईला साहाय्य करणे : प्रीती तिचा अभ्यास आणि सेवा सांभाळून माझ्याही सेवा तिच्या भ्रमणभाषवरून करून देते. त्यामुळे मला सेवा आणि घरकाम यांसाठी तिचा आधार वाटतो.
३ ई. ‘प्रीतीला होणारा आध्यात्मिक त्रास पुष्कळ न्यून झाला आहे’, असे मला वाटते.
‘हे गुरुदेवा, प्रीती नामक हे मोगर्याचे पुष्प आपल्या सुकोमल चरणांवर लवकर अर्पण करून घ्या’, अशी मी शरणागतभावाने प्रार्थना करते.’
– सौ. अश्विनी चोरमले (प्रीतीची आई), अकलूज, जिल्हा सोलापूर. (२.५.२०२१)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |