स्वातंत्र्यवीर सावरकर : हिंदूंसाठी हाडांची काडे केलेला आधुनिक ‘दधिची’ !
सर्वांत आधी धर्मांध मुसलमानांनी, नंतर ब्रिटिशांनी आणि स्वातंत्र्यानंतर काँग्रेसने सदैव अपमानित केलेल्या हिंदु समाजाला, हिंदु संस्कृतीला आणि हिंदु धर्माला पुन्हा एकदा मानाचे दिवस यावेत, यासाठी हाडांची काडे केलेल्या आधुनिक दधिची स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गौरव यात्रा सर्वत्र निघत आहे. या पार्श्वभूमीवर सावरकर यांनी वेळोवेळी व्यक्त केलेले काही विचार पाहूया !
संकलक : श्री. संजय दि. मुळ्ये, रत्नागिरी
१. सिंहगड घेतांना औरंग्याचा प्रतिनिधी होता का ?
२ ऑगस्ट १९४७ या दिवशी सावरकर यांचे पुणे येथे परशुरामभाऊ विद्यालयाच्या पटांगणावर भाषण झाले. सावरकर यांनी आपल्या भाषणातून १ लाख श्रोत्यांपुढे घणाघाती विचार मांडले. मागील काही वर्षांत हिंदूंच्या हातून झालेल्या चुका त्यांनी दाखवून दिल्या. ‘‘हिंदु जात म्हणू्न ज्यांना जिवंत रहावे असे वाटत असेल, त्यांच्यासाठी माझे आजचे भाषण आहे’’, असे त्यांनी प्रारंभीच सांगितले. भाषणात त्यांनी अन्य मुद्यांसह मुसलमान सैनिक सैन्यात असण्याच्या प्रश्नाला हात घातला. ते म्हणाले, ‘‘हिंदुस्थानची गंमत कशी आहे, ती पहा. ‘एकतरी मुसलमान आमच्या सैन्याच्या तुकडीत असलाच पाहिजे’, या आपल्या आग्रहामुळे पाकिस्तानविरुद्ध युद्ध होईल, तेव्हा निर्णायक वेळी आमच्या सैन्यात घोटाळा उडणार ! आपल्या सैन्यात निर्भेळ हिंदूच असले पाहिजेत; पण ‘इंडिया’ या शब्दाखाली (काँग्रेसला) एकतरी मुसलमान हवा ना ! त्यासाठी सारी धडपड ! त्याविना कसे चालेल ? सिंहगड घेतांना औरंगजेबाचा प्रतिनिधी जर घेतला असता, तर सिंहगड जिंकता आला असता का ?’’
जेव्हा जेव्हा सैन्यात कमी असलेल्या मुसलमानांच्या प्रमाणाबद्दल कुणाला पुळका येईल, तेव्हा तेव्हा सावरकरांनी उपस्थित केलेले सिंहगडचे उदाहरण आपल्या डोळ्यांसमोर आले पाहिजे ! पाकिस्तानच्या सैन्यात किती हिंदू आहेत ? सैन्य सोडाच, चेंडू-फळीच्या (क्रिकेटच्या) संघात असलेला एक हिंदुही तेथील जनतेला आवडत नाही !
२. हिंदूंनो, पोकळ निधर्मीपणा ओळखायला शिका !
१३ डिसेंबर १९५३ या दिवशी रमणबाग (पुणे) येथे सावरकर यांचे ‘धर्मांतर म्हणजे राष्ट्रांतर’, या विषयावर भाषण झाले. त्या वेळीही अन्य विषयांबरोबर सैन्यातील मुसलमानांच्या भरतीच्या प्रश्नावर त्यांनी मार्गदर्शन केले. सावरकर म्हणाले, ‘‘नुकतीच वार्ता आली आहे की, भारताच्या सैन्यात मुसलमानांची संख्या कमी झाली आहे. हे त्यांना (शासनकर्त्यांना) कसे कळले ? कुठून तरी धार्मिक नोंदणी केलीच असेल ना ? …. सैन्यामध्ये मुसलमानांची भरती करावी, ही आज्ञा म्हणजे भारताच्या उरात खुपसलेली सुरीच होय ! ‘भारतीय सैन्यात मुसलमानांची भरती कमी होत आहे, त्याला उत्तेजन द्यावे’, या सरकारच्या आदेशाचा मी धिक्कार करतो. हा आदेश म्हणजे सरकारचा निधर्मीपणा किती पोकळ आहे, ते दाखवणारे मोठे उदाहरण आहे. जाती-धर्माची चौकशी न करता सैन्यात मुसलमान कमी आहेत, हे कसे समजले ? पाकिस्तानच्या सैन्यात एक तरी हिंदु आहे का ? स्वातंत्र्य मिळाल्याबरोबर १० वर्षे तरी भारतीय सैन्यात एकही मुसलमान नको; म्हणून त्या वेळी मी किर्लोस्करना लिहिले होते. एक मुसलमान काय करू शकतो ? असफअलीने अमेरिकेत भारताचा राजदूत असतांना काय केले ? चुकीचा पत्ता लिहून शस्त्रास्त्रांनी भरलेले भारताचे पहिले नौकायान कराचीला पाठवले. राजदूत आमचा, पैसे आमचे आणि नौकायान पोचले कराचीला. हा आहे धर्माचा परिणाम !’’
काँग्रेस संस्कृतीचे मुसलमान या विषयाशी असलेले संबंध जुने आहेत. नेहरूंचे, म्हणजे भारताच्या पहिल्या पंतप्रधानाचे काळीज स्वतंत्र भारताच्या सैन्यात जागोजागी मुसलमान दिसले नाहीत; म्हणून कळवळले होते ! धर्मांध मुसलमानांमुळे झालेल्या फाळणीचे पाप डोक्यावर असलेल्या काँग्रेसी नेत्यांचे डोळे अजूनही उघडलेले नाहीत !!
३. माझा हिंदु धर्म दुबळा नाही !
ब्राह्मण जातीत जन्माला आलेल्या सावरकर यांनी अस्पृश्यता निवारणाचेही मोठे कार्य केले आहे. अस्पृश्यता निवारणाचे त्यांचे हे कार्य भावनेच्या पातळीवर नव्हते. पूर्वी कुणी कोणावर तरी अत्याचार केला; म्हणून आज त्या तथाकथित गुन्ह्याचे परिमार्जन करण्यासाठी तसाच दुसरा गुन्हा केला जावा, हे त्यांना मुळीच मान्य नव्हते. म. गांधींसारखे अनेक राजकारणी त्या वेळच्या अस्पृश्यांना ‘हरिजन’ म्हणत. सावरकर म्हणत ‘हरिचे’ तर सगळेच आहेत. गांधीसारखे शब्दांचे खेळ न करता सावरकर अशांना ‘पूर्वास्पृश्य’ म्हणत !
वर्ष १९५२ मधील १० मेच्या पवित्रदिनी सावरकर नाशिकला गेले होते. त्यांच्या हस्ते तेथे ‘अभिनव भारत मंदिराची स्थापना आणि विजयप्रवेश’ असा समारंभ ठेवण्यात आला होता. या निमित्ताने सावरकर भगूर या आपल्या जन्मगावी जाऊन आले. ज्या कुलदेवीसमोर त्यांनी १४ व्या वर्षी ‘मारिता मारिता मरेतो झुंजेन’, अशी स्वातंत्र्यासाठी शपथ घेतली होती, त्या देवीचे दर्शनही त्यांनी घेतले. प्रकृती बरी नसतांनाही रात्री पेट्रोमॅक्सच्या उजेडात ते पूर्वास्पृश्यांच्या २ वाड्यांकडे चालत गेले. दोन्ही वाड्यांतील पूर्वास्पृश्य तेथे जमले होते. त्यांपैकी एका पूर्वास्पृश्य भगिनीने सावरकर यांना ओवाळले. तिला त्यांनी १० रुपयांची ओवाळणी घातली आणि तेथील मुलांना समारंभाचा प्रसाद म्हणून पेढे वाटले. तेथील चर्चेच्या वेळी दोघा पूर्वास्पृश्यांची भाषणे झाली. ते दोघे म्हणाले, ‘‘आईपाशी आपली गार्हाणी मुलांनी सांगू नयेत, तर कुठे सांगावीत ? नुसती शिवाशिव बंद होऊन उपयोग नाही. आम्हाला आर्थिक, सामाजिक आणि राजकीय सत्ता हवी.’’
डॉ. आंबेडकर यांनी केलेल्या धर्मांतराच्या घोषणेची प्रत्यक्ष कार्यवाही अजून व्हायची होती. तरीही निर्भीड सावरकर या वेळच्या भाषणाच्या समारोपात म्हणाले, ‘‘तुम्हालाच काय हिंदुस्थानातील प्रत्येक हिंदूला जातीनिरपेक्षपणे आर्थिक, सामाजिक आणि राजकीय समता असावी, हेच तर मी आजवर एकसारखा सांगत आलो आहे. तुम्हालाच काय पण तुम्ही ज्या पूर्वास्पृश्यांना तुमच्यापेक्षाही खालचे मानत होता त्या मद्रासमधील परया, फोक्कस, भंगी, धेड या जातींनाही राजकीय अधिकारात समानता दिली पाहिजे, असे माझे आग्रहाचे म्हणणे आहे. केवळ जन्माने कोणतीही जात श्रेष्ठ किंवा कनिष्ठ मानली जाऊ नये आणि राज्यातल्या सर्व चाकर्या, अधिकार अन् नागरिक जीवन हे केवळ गुणांवरच अधिष्ठित असावेत. समता हवी पण ती गुणनिष्ठेत हवी. तुमच्या भाषणांत हिंदु धर्माविषयी काही आक्षेप घेण्यात आले. त्याची चर्चा करण्यास आता वेळ नाही; पण मी स्पष्टपणे तुम्हास सांगतो की, जर तुम्हापैकी कुणाला असे वाटत असेल की, हिंदु धर्म सोडून परधर्मात गेल्याने तुमची उन्नती होईल, तर तुम्ही सुखनैव हिंदु धर्म सोडून दुसर्या धर्माचा आश्रय करावा ! आपल्या उन्नतीच्या आड मी कधीही येऊ इच्छित नाही. दुसर्याच्या दयेवर जगू पाहण्याइतका माझा हिंदु धर्म दुबळा नाही. पुन्हा अनेक प्रकरणी घडते, त्याप्रमाणे जर आपण दुसर्या घराचा अनुभव घेतल्यानंतर पुन्हा कोणीही आपल्या वाडवडिलांच्या घरी येऊ इच्छित असेल, तर हिंदु धर्माचे शुद्धीचे द्वार आता सताड उघडे आहे.’’
हिंदु हितरक्षक सावरकरांनी प्रसंगानुरूप केलेले मार्गदर्शन परत परत अभ्यासणे आणि ते कृतीत आणणे, हे प्रत्येक हिंदूचे कर्तव्य ठरते !