पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणच्या आयुक्तांचा ‘पी.एम्.पी.’ संचालक मंडळामध्ये समावेश !
पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पी.एम्.पी.) संचालक मंडळामध्ये पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पी.एम्.आर्.डी.ए.च्या) आयुक्तांच्या समावेशाचा राज्य सरकारने आदेश काढला आहे. त्यामुळे ‘पी.एम्.आर्.डी.ए.’कडून पी.एम्.पी.ला संचालन तूट अल्प करण्यास साहाय्य होणार आहे.
पी.एम्.पी.कडून पी.एम्.आर्.डी.ए.च्या परिसरामध्ये ११३ मार्गांवर ४९० बसगाड्यांनी सेवा दिली जाते. ग्रामीण भागात सेवा देण्यामुळे संचालन तुटीमध्ये वाढ होत होती. परिणामी पी.एम्.पी.चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी ही ग्रामीण भागातील सेवा रहित केली होती. ग्रामीण भागातील सेवा बंद केल्यावर पी.एम्.पी.वर टीका होऊ लागली होती. ग्रामीण भागातील सेवा पूर्ववत् चालू करावी, यातून होणार्या तुटीतील काही रक्कम देण्याचे पी.एम्.आर्.डी.ए.ने मान्य केले होते; परंतु त्यासाठी पी.एम्.आर्.डी.ए.च्या आयुक्तांना संचालक मंडळामध्ये सहभागी करणे आवश्यक होते. त्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे दिला होता. त्यावर आता निर्णय झाल्याने पी.एम्.पी.च्या संचालक मंडळामध्ये संचालक आणि सदस्य यांची संख्या १४ होणार आहे.