खासगी ट्रॅव्हल्सकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी दिलेल्या आदेशाची तत्परतेने कार्यवाही करा !
कोल्हापूर प्रादेशिक परिवहन अधिकार्यांना सुराज्य अभियानाच्या वतीने निवेदन
कोल्हापूर, ५ एप्रिल (वार्ता.) – सण, उत्सव, उन्हाळ्याची सुटी, दीपावली या कालावधीत खासगी प्रवासी टॅ्रव्हल्सकडून भरमसाठ तिकीटदर आकारून प्रवाशांची आर्थिक लूट चालू आहे. हिंदु जनजागृती समितीने सुराज्य अभियानाच्या अंतर्गत खासगी प्रवासी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून होणारी प्रवाशांची आर्थिक लूट रोखली जावी, याविषयी गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री, परिवहनमंत्री, तसेच परिवहन आयुक्त यांच्याकडे तक्रारी नोंदवल्या आहेत. प्रवाशांची आर्थिक लूट रोखण्यासाठी परिवहन आयुक्तांनी २५ ऑगस्ट २०२२ या दिवशी याविषयी करावयाच्या कार्यवाहीचे निर्देश सर्व प्रादेशिक आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना निर्गमित केले आहेत. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यात तत्परतेने कार्यवाही व्हावी, या मागणीचे निवेदन सुराज्य अभियानाच्या वतीने कोल्हापूर येथे साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय इंगवले यांना देण्यात आले. विजय इंगवले यांनी या संदर्भात योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले.
या वेळी हिंदु जनजागृती समितीप्रणित सुराज्य अभियानाचे श्री. बाबासाहेब भोपळे, हिंदु जनजागृती समितीचे श्री. मधुकर नाझरे आणि श्री. शिवानंद स्वामी, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, हिंदुत्वनिष्ठ श्री. शरद माळी, भ्रष्टाचारविरोधी जनजागृती समितीचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष श्री. आनंदराव पवळ, भाजप दिव्यांग आघाडी सरचिटणीस श्री. वीरभद्र येडुरे उपस्थित होते.