पालघर येथील साधू हत्याकांडाची होणारी पुनरावृत्ती टळली !
पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे दोन्ही साधू सुखरूप !
ठाणे, ५ एप्रिल (वार्ता.) – पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील वनई चंद्रनगर येथे २ साधू मुले पळवायला आले आहेत, अशी अफवा पसरली. ही अफवा पसरल्यानंतर नाथजोगी समाजाच्या २ साधूंवर आक्रमण होण्याच्या आधीच गावातील एका पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे त्यांनी साधूंना सुरक्षित ठिकाणी हलवले. पोलीस वेळीच घटनास्थळी पोचल्याने पुढील अनुचित प्रकार टळला. डहाणू तालुक्यातील गडचिंचले येथे यापूर्वी गैरसमजातून २ साधू आणि एका वाहनचालकाची हत्या करण्यात आली होती. त्याची पुनरावृत्ती डहाणू तालुक्यात होण्याच्या आधीच पोलीस मित्राच्या सतर्कतेमुळे ही घटना टळली.
२ एप्रिल या दिवशी दुपारी ११.३० वाजता नाथजोगी समाजाचे बापूनाथ सटबाजी शेगर आणि प्रेमनाथ सटबाजी शेगर हे भिक्षा मागण्यासाठी डहाणू तालुक्यातील वणई चंद्रनगर मार्गे शिवोन या गावी जात होते. ‘वाणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत वनई चंद्रनगर या गावात त्यांच्याविषयी लोकांमध्ये मुले पळवणारी टोळी आली’, असा गैरसमज पसरला. त्यानंतर गावातील लोकांनी त्यांना घेरले असता गावातील पोलीस मित्र हरेश्वर घुटे यांनी या साधूंना गावातील दुकानात नेऊन बसवले. त्यानंतर वाणगाव पोलिसांनी तत्परता दाखवल्याने पुढील अनर्थ टळला. मुले पळवणारी कोणतीही टोळी सक्रीय नसून, केवळ गैरसमजातून अफवा पसरतात. त्यामुळे ‘कुणीही अशा अफवांवर विश्वास ठेवू नये’, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
संपादकीय भूमिकाहिंदु साधूंना अपकीर्त करून त्यांची हत्या करणार्या टोळीच्या मागे कोण आहे ? हे शोधणे आवश्यक ! |